पेट्रोलची बचत : महत्त्वाची गरज

257

>> विलास शिंदे

एक लिटर पेट्रोल जर आपण वाचविले तर बचतीपासून आपणांस सुमारे १० किलो जादा धान्य पिकविता येईल. एकूण वापराच्या २५ टक्के कपात जर आपण केली तर सुमारे ४ लाख २५ हजार टन इतका नॅफ्था आपण मिळवू शकू. या नॅफ्थापासून आपल्याला ८ लाख ५० हजार टन इतका नॅफ्था उपलब्ध होईल. साधारणतः एक टन युरियापासून ६ ते १० टन जादा धान्याचे उत्पादन होते. म्हणूनच इंधनासाठी पेट्रोलची बचत करणे एक राष्ट्रीय कर्तव्य मानले पाहिजे.

पेट्रोलचा उपयोग फक्त इंधनासाठीच नसून विकासाच्या सर्व क्षेत्रांत पेट्रोलचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अरब राष्ट्रे आणि इस्रायलमध्ये ऑक्टोबर १९७३ मध्ये युद्ध झाले आणि या युद्धाचा परिणाम जगावर होण्यास प्रारंभ झाला. तेलसमृद्ध आणि तेलाच्या पैशांवर गब्बर झालेल्या अरब राष्ट्रांनी तेल हे शस्त्र म्हणून वापरण्यास सुरुवात केली. त्यांच्या या धोरणामुळे जग काही काळ चिंताक्रांत झाले. सर्वत्र धोरणाविषयी नवे आराखडे तयार होऊ लागले.

फोर्डसारख्या जगप्रसिद्ध कंपनीने सोळा हजार कामगारांना तीन महिने सक्तीची सुट्टी जाहीर केली. हिंदुस्थानसारख्या विकसनशील राष्ट्रांमध्ये पेट्रोलच्या किमती दुपटीने वाढल्या व अजूनही वाढत आहेत. युरोपातील राष्ट्रांनी आठवड्य़ांतील एक दिवस गाड्य़ांचा वापर न करण्याचे ठरविले. खनिज तेलाच्या टंचाईमुळे तेलाला पर्याय म्हणून निरनिराळे शोध सुरू झाले आहेत. हायड्रोजन वायूचा उपयोग करून काहींनी त्याला पर्याय म्हणून वापर करण्यास हरकत नसल्याचे दाखवून दिले. ब्रिटनने तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी जोरदार प्रयत्न चालू केले आहेत. बर्शेन वायूवर गाडी चालविण्याचे प्रकार यशस्वी झाले आहेत. मिशिगन राज्यातील एक गृहस्थ गेली अनेक वर्षे स्वतःसाठी लागणारे पेट्रोल कचऱ्यापासून तयार करीत आहेत. जर्मनीमध्ये ज्याप्रमाणे प्रचंड दाबाने व उष्णतेने गाडल्या गेलेल्या अवशेषांपासून पेट्रोल तयार होते त्याच पद्धतीने ते गृहस्थ पेट्रोल तयार करीत आहेत.

अणुशक्ती संशोधनात अग्रेसर असणाऱ्या काही राष्ट्रांनी सूर्यापासून मिळणाऱ्या शक्तीचा उपयोग करून नवीनच पर्याय शोधून काढला आहे. कोळशापासून वायू तयार करून त्याचासुद्धा उपयोग करण्यास सुरुवात झाली. हिंदुस्थानमध्ये कोळशाचे भरपूर साठे असून त्यावर आज सुमारे ५० वीज केंद्रे चालू आहेत. जर कोळशाचा पर्याय म्हणून वापर सुरू केल्यास ते सुलभ होईल ही एक समाधानाची बाब आहे. हिंदुस्थान तेलाला पर्याय शोधण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. कारण भारताला लागणाऱ्या तेलापैकी ८० टक्के तेल आयात केले जाते. सध्या जगातील सर्व राष्ट्रे तेलाचे नवे साठे शोधण्यासाठी २२५० कोटी रुपये दरवर्षी खर्च करीत आहेत.

खनिज तेलाला पर्याय म्हणून अनेक गोष्टींचा शोध लागला असला आणि ती प्रक्रिया सुरूच असली तरी हे पर्याय फक्त इंधन म्हणून वापरात येणाऱ्या खनिज तेलाच्या भागापुरते मर्यादित आहेत. खनिज तेलांना स्वतंत्र असे स्थान आहे. खनिज तेले व त्यापासून मिळणाऱ्या अनेक पदार्थांवर आज जगातील सर्व औद्योगिक विश्व अवलंबून आहे. तसेच दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची निर्यात अवलंबून आहे. खनिज तेलाचे जगातील सर्व राष्ट्रांच्या आर्थिक आणि औद्योगिक परिस्थितीवर दूरगामी परिणाम झालेले आहेत.

अशुद्ध खनिज तेल हे अनेक रासायनिक पदार्थाचे मिश्रण आहे. पेट्रोलियम धंद्यामध्ये अशुद्ध पेट्रोल तेलाचे मुख्यतः भागशः ऊर्ध्वपातन करून वेगवेगळे भाग मिळविले जातात. नैसर्गिक वायू- या भागामध्ये मुख्यतः मिथेन नावाचा वायू अधिक प्रमाणात असतो व त्याचा उपयोग पाइपलाइनमधून नेऊन जवळील शहरांना इंधन म्हणून केला जातो. द्रवरूप पेट्रोलियम वायू – या भागामध्ये मुख्यतः प्रोपेन, ब्युटेन हे पदार्थ असतात. हे वायुरूप पदार्थ द्रवीभवन करून ते लोखंडी सिलिंडरमध्ये वापरतात. अशा प्रकारे केलेल्या द्रवरूप भागाचा उपयोग घरोघरी स्वयंपाक करण्यास होत आहे. आपण वापरत असणारा बर्शेन हा ब्युटेन वायू आहे. केरोसीन – केरोसीनचा उत्कलन बिंदू १४०-३०० सें.ग्रे असून यामध्ये असणारे बेंझीन व सल्फर हे पदार्थ वेगळे करावे लागतात. केरोसीनचा इंधन म्हणून उपयोग केला जातो. डिझेल- डिझेल हा त्यानंतरचा भाग. तो इतर द्राव भागापेक्षा थोडासा घट्ट असून त्याचा उपयोग इंधन म्हणून होतो, त्याचप्रमाणे डिझेल इंजिने तसेच जड वाहनासाठी केला जातो हे सर्वांच्या परिचयाचे आहे.

डिझेल इंजिनाच्या शोधामुळे या तेलाची उपयुक्तता वाढली. गॅसोलिन – भागशः ऊर्ध्वपातनापासून मिळणारा हा तिसरा भाग म्हणून निरनिराळ्या द्रव पदार्थांचे मिश्रण असून त्याचा उत्कलन बिंदू ३०-२०० से.ग्रे.असतो. गॅसोलिनचा उपयोग मुख्यतः विमान आणि मोटारीचे इंधन म्हणून केला जातो. फ्युएल तेल – हे जहाजासाठी इंधन म्हणून वापरतात. यानंतर मिळणारे पदार्थ म्हणझे लुब्रिकंटस, वॅक्सेस व अस्फाल्ट हेही अशुद्ध तेलांचे भागशः ऊर्ध्वपतन करून जे निरनिराळे भाग मिळतात. त्याचा दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तू बनविण्यासाठी उपयोग केला जातो. द्रावके व त्यांचे उपयोग – मिथेन आणि पाण्याची वाफ यापासून कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन तयार होतो आणि त्यापासून पुढे मिथाईल अल्कोहोल व मिथेन व क्लोरिन यांच्या रासायनिक क्रियेतून क्लोरोफॉर्म व त्यांच्या गटातील क्लोराईड द्रावके तयार होतात. मिथेनपासून पुढे ऍसिटिलिन व त्यापासून बेंझिन तयार होते. द्राव्याचा उपयोग रंगाच्या तसेच रासायनिक कारखान्यामध्ये द्रावक म्हणून केला जातो. कृत्रिम रबर – पहिल्या महायुद्धात जर्मनीस होणारा रबराचा पुरवठा दोस्त राष्ट्रांनी थांबविला म्हणून कृत्रिम रबराचा शोध जर्मनीने ब्युटाडाईनपासून ब्युनारबर तयार करून दाखवला. सध्या कृत्रिम रबराचे अनेक प्रकार पाहावयास मिळत आहेत. नैसर्गिक रबरापेक्षा कृत्रिम रबर हे टिकण्यास व इतर अनेक दृष्टीने उपयुक्त आहे. मोटारीचे टायर वगैरेसारख्या वस्तू म्हणून कृत्रिम रबरापासून करतात.

या सर्व माहितीवरून दिसते आहे की, पेट्रोल फक्त वाहनासाठी उपयोगी नसून देशांच्या आर्थिक विकासातील एक महत्त्वाचा मूलभूत घटक आहे. कोणत्याही प्रकारचे रसायन व कृत्रिम रासायनिक पदार्थ करण्याचे पायाभूत मूलभूत घटक म्हणून खनिज तेल व कोळसा होय. समाजाच्या सर्व जीवनावश्यक गरजांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध खनिज तेल व कोळसा यांच्याशी पोहोचतो. विकसनशील देशांची औद्योगिक कारखानदारी, विद्युत पुरवठा व आर्थिक भरभराट म्हणजे खनिज तेलापासून उपलब्ध होणारे अन्य दुय्यम पदार्थ यांचा भरपूर पुरवठा होण्यावर अवलंबून असून अनेक प्रकारची औषधे, कारखानदारीतील रासायनिक द्रव्ये – कीटकनाशक द्रव्ये शेतीसाठी लागणारी कृत्रिम खते, कापड गिरण्या सर्व उद्योगसमूहांसाठी खनिज तेलापासून अन्न पदार्थ मिळणे ही एक महत्त्वाची बाब आहे. वाहनांसाठी पेट्रोलला पर्याय काढले असले तरी अन्य गरज पेट्रोलशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही म्हणून दळणवळणावरील पेट्रोलचा भरमसाट अपव्यय टाळून ते काटकसरीने व नियोजन करून वापरले पाहिजे. विचारवंतांनी व आकडे शास्त्र्ाज्ञांनी असे म्हटले आहे की, एक लिटर पेट्रोल जर आपण वाचविले तर बचतीपासून आपणांस सुमारे 10 किलो जादा धान्य पिकविता येईल. एकूण वापराच्या 25 टक्के कपात जर आपण केली तर सुमारे 4 लाख 25 हजार टन इतका नॅफ्था आपण मिळवू शकू. या नॅफ्थापासून आपल्याला 8 लाख 50 हजार टन इतका नॅफ्था उपलब्ध होईल. साधारणतः एक टन युरियापासून 6 ते 10 टन जादा धान्याचे उत्पादन होते. म्हणूनच इंधनासाठी पेट्रोलची बचत करून रासायनिक खते तयार करण्यासाठी नॅफ्थाची जास्तीतजास्त निर्मिती करण्याची संधी दिली पाहिजे व ते एक राष्ट्रीय कर्तव्य मानले पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या