हरवलेलं संगीत (भाग 1)- याद किया दिल ने कहाँ हो तुम?

>> शिरीष कणेकर

टीव्हीवर प्रश्नमंजुषा कार्यक्रम चालू होता. तरुण मुला-मुलींचं सामान्य ज्ञान तपासलं जात होतं. ‘‘शंकर-जयकिशन कोण होते?’’ विचारण्यात आलं.
तरुणाई गोंधळात पडली. कोण होते शंकर-जयकिशन? ही दोन नावं होती की एकच नाव होतं? मुळात होते कोण?…
हा कार्यक्रम मी डोळय़ांनी पाहिला नसता तर माझा या घोर अज्ञानावर विश्वासच बसला नसता. शंकर-जयकिशन माहीत नसतील तर एस. मोहिंदर व व्ही. बलसारा माहीत असण्याची सुतराम शक्यता नव्हती. मला इतकं डिप्रेशन आलं की, वाटून गेलं आणखी पंचवीस-तीस वर्षे थांबा. तेव्हाची पोरं विचारतील, ‘‘लता मंगेशकर कोण?’’, सॉरी, ते इंग्लिशमधून विचारतील, ‘‘हू द डेव्हिल इज लता मंगेशकर?’’
पूर्वसुरींची सर्व चित्रपट-संगीत पुण्याई नवीन पिढी पुसून टाकायला निघाली असेल तर कोणाकोणाच्या नावानं म्हणून टिपं गाळायची? शंकर-जयकिशन जर माहीत नसतील तर त्यांना नौशाद, मदन मोहन, एस. डी. बर्मन, रोशन आणि सी. रामचंद्र काय फतरे ठाऊक असणार? अन् अनिल विश्वास, सज्जाद व विनोद? ‘बालगंधर्व रंगमंदिर’ यावरून प्रेरित होऊन बालगंधर्व हे नाव ठेवण्यात आलं असावं अशीही त्यांची धारणा असू शकेल. अरे हो, पण मुळात त्यांना बालगंधर्व कशाला माहीत असतील?

शंकर-जयकिशन माहीत नाहीत? माफ करा, पण यातून बाहेर यायला मला खूप वेळ लागतोय, खूप क्लेश होतायत. शंकर-जयकिशन परमेश्वरासारखे चराचरात भरून राहिलेत असं वाटायला लावणारा काळ मी अनुभवलाय. रेशनच्या धान्यावर, डालडा तुपावर, नेहरूंच्या शब्दांवर व शंकर-जयकिशनच्या गेय सुरांवर आमची पिढी वाढली. तशा तीन पिढय़ा शंकर-जयकिशनवर पोसल्या गेल्या. आमच्या आधीची पिढी ‘बरसात’मध्ये सचैल भिजून निघाली. आम्ही पहिल्यावहिल्या फुलपँटीत ‘ये मेरा दिवानापन है’ गुणगुणलो. पुढली पिढी ‘परदे में रहने दो’वर उसळत होती. पहावं तिथं, जावं तिथं आपले शंकर-जयकिशन वाजत असायचे (वाचा ‘यादों की बारात’).

मधभऱया चालींनी ठासून भरलेलं एक अवाढव्य कोठार त्यांच्या मालकीचं होतं. दामाजीसारखं त्यांनी ते रसिकांना मनसोक्त लुटू दिलं. वर्षामागून वर्षे त्यांनी हृदयाचा ठाव घेणाऱया दिलचस्प संगीताची लयलूट केली. रेडिओ उघडला की, लता ‘मनमोहना बडे झूटे’ अशी लटकी तक्रार करायची. ऑर्केस्ट्राला गेलं की, तिथं कोणीतरी ‘याल्ला याल्ला दिल ले गयी’ बजवायचं. सत्यनारायणाच्या पूजेला ‘तू प्यार का सागर है’ वाजायचं. कॉलेजकुमार सायकलवर टांग मारून ‘ऐ मेरे दिल कहीं और चल’ गुणगुणायचे. सभासंमेलनातून ‘मैं रंगीला प्यार का राही’मध्ये लता लाऊड स्पीकरवरून खळखळून हसायची. संध्याकाळी पाय मोकळे करायला बाहेर पडावं तर मालेगावच्या मोसम नदीच्या एका तीरावर ‘नैन मिले चैन कहाँ’ सुरू झालेलं असायचं आणि दुसऱया तीरावर तेच गाणं ‘एक सुख पायां मैने, सौ दुख सहेके’ पोहोचलेलं असायचं. ‘ऐ प्यासे, दिल बेजुबाँ’ व ‘मेरी जाँ मेरी जाँ’ एखाद्या महापुराच्या लाटेसारखं यायचं व आमची सारी रसिकता शंकर-जयकिशनमय होऊन जायची.

शंकर-जयकिशननं संगीत सोपं केलं. हातगाडीवाले आणि हमाल यांच्या ओठांवर खेळू शकतील अशा चाली बांधल्या. त्यांचं मोठेपण यात आहे की, सर्वसामान्य श्रोत्यांना क्लिष्ट व अनाकलनीय वाटणारी रागदारी त्यांनी थेट पानवाल्याच्या ठेल्यापर्यंत पोहोचवली. ‘जा जा रे जा बालमवा’ आणि ‘आये बहार बनके’ची महती ही अशी आहे. ‘मेरी जा मेरी जा’ ही चाल जयकिशनची होती, तर त्यातलं मारू ‘वय-वय-वय’ शंकरचं होतं.
त्यांच्या अफलातून संगीताची संततधार, व्याप्ती पहा –
साल 1951 – ‘आवारा’, ‘बादल’, ‘काली घटा’, ‘नगीना’.
साल 1952 – ‘दाग’, ‘पर्बत’, ‘पूनम’.
साल 1953 – ‘आह’, ‘आस’, ‘औरत’, ‘नया घर’, ‘पतिता’, ‘शिकस्त’.
साल 1955 – ‘सीमा’, ‘श्री 420’.
साल 1956 – ‘बसंत बहार’, ‘चोरी चोरी’, ‘हलाकू’, ‘नई दिल्ली’, ‘पटरानी’, ‘राजहठ’, ‘किस्मत का खेल’.
साल 1957 – ‘बेगुनाह’, ‘कठपुतली’.
साल 1959 – ‘अनाडी’, ‘छोटी बहेन’, ‘कन्हैया’, ‘लव्ह मॅरेज’, ‘मैं नशे में हूँ’, ‘शरारत’, ‘उजाला’.
साल 1960 – ‘कॉलेज गर्ल’, ‘दिल अपना और प्रीत परायी’, ‘एक फूल चार कांटे’, ‘जिस देश में गंगा बहेती है’, ‘सिंगापूर’.

उपेक्षित संगीतकारांवर लिहायला म्हणून मी लेखणी उचलली होती, पण नवीन पिढीनं शंकर-जयकिशननाच उपेक्षित ठरवलेलं पाहून आता माझी सटकली. मूळ विषय बाजूलाच राहिला व मी शंकर-जयकिशनमय झालो. नॉट बॅड, चला रे म्हणू या – ‘आंसू की आग लेके तेरी याद आयी’…

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या