निरामय – बटाटा, सुरण इ. इ.

>> शमिका कुलकर्णी

उपवास म्हटलं की बटाटा, रताळी, कंद यांना पर्याय नाही. सर्वच आवडीने खातात. यात पिष्ठमय पदार्थांचा समावेश अधिक असल्यामुळे ते ऊर्जादायी असतात.

कोनफळ – हे कंद अतिशय आरोग्यदायी असल्याने त्याचा समावेश उपवासात आवर्जून करावा. यात उपयुक्त कर्बोदके, तंतुमय पदार्थ असतात. त्याचबरोबर क जीवनसत्त्वाचे प्रमाण अधिक असते. जांभळ्या रंगाचे असल्याने अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते. कोनफळाचे काप, उकडवलेल्या फोडी करतात.

बटाटा – बटाटय़ामध्ये कर्बोदके, क, ब जीवनसत्त्व, त्याचबरोबर तंतुमय पदार्थ असतात. बटाटय़ाचा समावेश साबुदाणा खिचडी, बटाटा कीस, बटाटा चिप्स, उपवासाचे पॅटिस किंवा थालीपीठ, भाजी या पदार्थांमध्ये करता येतो.

रताळे – रताळे अनेक जण बटाटय़ाऐवजी वापरतात. चवीला गोडसर असले तरी त्याचे अनेक फायदे असतात. रताळ्यात कर्बोदकांसह अनेक जीवनसत्त्व आणि खनिजे आणि तंतुमय पदार्थ असतात. रताळ्याचा कीस, चाट, काप, उकडवलेले रताळे असे अनेक प्रकार खाल्ले जातात.

सुरण – सुरण अतिशय आरोग्यदायी कंद आहे. त्याचे अनेक फायदे असतात. उपवासाव्यतिरिक्तही याचा समावेश आहारात करावा. त्यात कर्बोदकांसह अनेक जीवनसत्त्व आणि खनिजे आणि तंतुमय पदार्थ असतात. सुरणाचा समावेश भाजी, काप, उकडून मीठ लावून, चाट असे अनेक पदार्थ केले जातात.

आलं – आल्याचा समावेश आपण रोजच्या रोज आहारात करत असतो. आलं अतिशय गुणकारी असतं आणि त्याचबरोबर त्यात असलेले गुणधर्म आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. आलं सांसर्गिक रोगांपासून संरक्षण देतं, त्याचबरोबर सर्दी, खोकला, घसा खवखवणे यावर उत्तम उपाय आहे. सध्याच्या दिवसांत आलं अतिशय महत्त्वाचे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या