लेख – सामान्य पोलीस हाच पोलीस दलाचा कणा!

प्रातिनिधिक फोटो

>> जयजित सिंह

महाराष्ट्रात अलीकडे घडलेल्या काही घटनांनी  मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस दलाबद्दल काही प्रश्नचिन्ह उभे राहिले असले तरी हे सावट पोलीस दलालाच प्रामाणिकपणे प्रयत्न करून दूर करावे लागेल. शिवाय एकदोन घटनांमुळे पोलीस दलाला सरसकट दोषी ठरवणेही योग्य नाही. मुळात मुंबई महाराष्ट्राच्या पोलीस दलाची स्वतःची स्थिर आणि स्थायी रचना तसेच व्यवस्था आहेया रचनेत जसे अस्वाभाविक काम करणारे काही अधिकारी आहेत तसेच एका निष्ठेने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणारे सर्वसामान्य पोलीसही आहेत. हे सामान्य पोलीसच पोलीस दलाचा खरा कणा आहेत.

मुंबई पोलिसांवरील विश्वासास काही घटनांनी तडा गेला असून त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान लगेच भरून निघण्याजोगे नाही. जनसामान्यांच्या नजरेत पोलीस व्यवस्थेबाबत अविश्वास स्पष्टपणे दिसू लागला आहे. पोलीस दलाच्या प्रतिमेस अपरिमित हानी पोहोचली असून ती भरून काढण्यासाठी आज तरी समोर कोणताही तत्काळ उपाय दिसत नाही. त्यामुळेच हे सर्व मळभ हटविण्यासाठी प्रामाणिकपणे, विनम्रपणे व चिकाटीने आपले काम नियमितपणे करणाऱया सर्वसामान्य पोलिसास केंद्रस्थानी ठेवूनच पुढील मार्गक्रमण करणे क्रमप्राप्त झाले आहे.

बदलत्या काळानुसार सर्वसामान्य जनतेच्या मनातील पोलिसांची प्रतिमा ही एकतर ‘गुन्हेगार पोलीस’, ‘दिखाऊ पोलीस’ किंवा ‘असामान्य शक्तिशाली पोलीस’ अशी बनत गेली आहे. त्यामुळे दुर्दैवाने एकतर उतावीळ किंवा थेट अतिमानवी क्षमता असलेला असामान्य शक्तिशाली असा सुपरकॉप असे पोलिसांच्या प्रतिमेचे सरळ सरळ दोन विरुद्ध टोकांमध्ये विभाजन झालेले दिसते.

परंतु सुदैवाने या देखाव्याच्या पलीकडे मुंबई-महाराष्ट्राच्या पोलीस दलाची एक अतिशय स्थिर व स्थायी अशी रचना आणि व्यवस्था आहे. पोलीस दलातील विविध स्तरांवर शांतपणे, दृढतेने व अविचलपणे कार्यरत असणारे, परंतु कधीही प्रकाशझोतात न येणारे व थेट नजरेत न भरणारे अनेक सर्वसामान्य पोलीस अधिकारी व अमलदार हे या स्थिर व स्थायी पोलीस व्यवस्थेचे खरे आधारस्तंभ आहेत. हे सर्वसामान्य पोलीस कधीही तत्काळ उपाय शोधण्याच्या नावाने नियमांचा भंग करीत नाहीत किंवा स्वतःच्या गौरवासाठी अथवा स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी कोणत्याही चुकीच्या भानगडीत पडत नाहीत. त्यांनी कधीही एखादी देदीप्यमान कामगिरी केलेली नसते, परंतु हेच सर्वसामान्य पोलीस अढळपणे व सातत्याने आपले नियमित कर्तव्य पार पाडून मुंबईसारख्या अफाट व गुंतागुंतीच्या शहरातील आर्थिक, धार्मिक व जातीय विषमता, आर्थिक चढाव-उतार तसेच उच्चभ्रू गुन्हेगारी टोळय़ांच्या कारवाया यामधून मार्ग काढत या महानगरीचे चक्र सदैव फिरते ठेवण्यात असामान्य योगदान देत असतात.

हे स्थानिक पातळीवर काम करणारे तळागाळातील सर्वसामान्य पोलीस त्यांचे फक्त दैनंदिन कर्तव्येच पार पाडत नाहीत, तर अविरत कष्ट घेऊन पोलीस दलाचा लौकिक व त्याची वर्षानुवर्षांची उज्ज्वल परंपरा अबाधित ठेवून ती आपल्या खांद्यावर पेलत पुढे नेत असतात. हे सर्वसामान्य पोलीस झोपडपट्टय़ांमधील अरुंद, कोंदट व अंधाऱया गल्ल्या, अनधिकृत वेश्या व्यवसायासाठी बदनाम झालेले इलाखे व जुगाराच्या अड्डय़ांचा अतिशय चिवटपणे व एका संशोधकाच्या उत्साहाने शोध घेत असतात. त्याचवेळी ते सफेतपोष उच्चभू गुन्हेगारांच्या क्लृप्त्याही समजून घेत असतात. धार्मिकदृष्टय़ा संवेदनशील कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये म्हणून ते सामान्य माणसाच्या अंतर्मनातील सांस्कृतिक, पारंपरिक व भावनिक बारकाव्यांचाही अचूक वेध घेत असतात. ते तळागाळातील लोकांशी नित्यनवीन वैयक्तिक संबंध जोडत असतात. खबऱयांचे जाळे तयार करून ते जोपासत असतात व पोलीस कामातील ज्ञान वृद्धिंगत करीत आपले कर्तव्य व्यावसायिक रीतीने चोखपणे पार पाडत असतात. कोणताही ‘सुराग’ मिळाल्यानंतर त्यानुसार पुढील कारवाई करताना अपयश येऊनही त्यातून काहीतरी शाश्वत हाती लागेपर्यंत ते काळवेळेचा व वैयक्तिक असुविधेचा विचार न करता त्याचा अविरत पाठपुरावा करीत असतात. असे करताना ते त्यांच्या आठ तासांच्या कर्तव्यकाळाचा कधीही बागुलबुवा करीत नाहीत. त्यांच्या या अविरत कष्ट करण्यामध्ये पैसा किंवा प्रसिद्धी ही प्रेरणा कधीही नसते. हे सर्व ते फक्त त्यांची कामाप्रति असलेली निस्सीम श्रद्धा व पोलीस दलाच्या कामामध्ये त्यांना वाटणारा अभिमान यासाठी करीत असतात.

आयपीएस तसेच राज्य संवर्गातील अनेक अधिकारी हेदेखील कठीण परिस्थितीत अचूक निर्णय घेऊन चांगले नेतृत्वगुण दाखवून अनेक अभियानांमध्ये स्वतः उतरतात. त्यातील अतिवरिष्ठ अधिकारी हे पोलीस दलास दळणवळणाच्या व इतर आवश्यक  सुविधा, गणवेश व शस्त्रास्त्रे पुरविणे, पोलिसांची राहण्याची व आरोग्याची व्यवस्था करणे इ.साठी कराव्या लागणाऱया नियोजनांमध्ये सातत्याने तासन्तास आखणी करीत असतात. त्याचे मूल्यांकन व दुरुस्ती करीत असतात. असे अधिकारी अभावानेच वार्ताहर परिषदा घेताना किंवा रक्षणकर्ते, तारणहार म्हणून शेखी मिरवताना दिसतात, परंतु तरीही ते पोलीस दलासाठी महत्त्वाची भूमिका निभावत असतात. पोलीस दलाच्या विनाअडथळा अविरत कामकाजामध्ये नित्य महत्त्वपूर्ण योगदान देत असतात.

बऱयाचदा चाकोरीबाहेरील अस्वाभाविक काम करणारे अपवादात्मक पोलीस अधिकारी व अमलदार हेच प्रसारमाध्यमांच्या केंद्रस्थानी असतात, परंतु त्यासोबतच प्रामाणिक, विनम्र व चिकाटीने तळागाळातील नियमित काम करणारे सर्वसामान्य पोलीस हेच या पोलीस दलाचा खरा कणा आहेत हे कधीही विसरून चालणार नाही. तेही मनुष्यप्राणी आहेत व त्यांच्याही हातून चुका होणारच, परंतु पोलीस दलाच्या संस्थात्मक रचनेशी त्यांची असलेली निष्ठा व वैयक्तिक इच्छा, आकांक्षा व आत्मगौरवापेक्षा पोलीस दलाच्या कामाचेच त्यांच्यासाठी असलेले अनन्यसाधारण महत्त्व त्यांना नसून दिलेल्या कर्तव्यापासून शक्यतो भरकटू देत नाही. या सर्वांची संयत, वरकरणी अदृश्य व एकदम डोळय़ांत भरणार नाही अशी पोलीस दलातील उपस्थिती व अविरत कष्टच पोलीस दलास त्याची गत विश्वासार्हता मिळवून देतील. पोलीस दलाचा विश्वास तारून नेतील. पोलीस दलाच्या अव्याहत, नित्य व तत्पर कर्तव्यपूर्तीमध्ये याच सर्वसामान्य पोलिसांचा खरा सहभाग आहे. स्वतःच्या वैयक्तिक आत्मगौरवाचा व कौतुकाचा कधीही विचार न करता आपले काम प्रामाणिकपणे करणारा हा सर्वसामान्य पोलीसच सध्याच्या संकटावर मात करून पोलीस दलाची सर्व प्रतिष्ठा त्यास परत मिळवून देऊ शकतो हे निश्चित!

(लेखक महाराष्ट्र पोलीस कॅडरमधील वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत.)

  • शब्दांकन :  ज्ञानेश्वर रायभान वाघ, पो.नि. एटीएस, मुंबई 
आपली प्रतिक्रिया द्या