ठसा – प्राचार्य गोपाळराव मयेकर

>>  प्रशांत गौतम

प्राचार्य गोपाळराव मयेकर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने साहित्य आणि राजकारणाच्या क्षेत्रात वेगळी नाममुद्रा उमटवली. मूळ मुंबईकर असलेले गोपाळराव नंतरच्या काळात गोवेकर झाले. गोपाळराव  साहित्यिक, कवी, ज्ञानेश्वरीचे व्यासंगी अभ्यासक होते. एवढेच नव्हे तर गोव्यातील मराठी भाषक आणि तेथील सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वाचा आधारस्तंभ होते. महाराष्ट्र गोमंतक पक्षाच्या विचारधारेशी कायम प्रामाणिक असणाऱया गोपाळरावांनी माजी आमदार, खासदार, मंत्री अशा नात्यांनी राजकारणाच्या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली. तेथील राजकारणाशी त्यांचा पंचवीसेक वर्ष संबंध होता. 10 मार्च 1934 रोजी मुंबईत जन्म झालेल्या गोपाळरावांचे प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथेच झाले. याच काळात ते संघपरिवाराशी जोडले गेले. शिरोडकर हायस्कूलच्या वसतिगृहातून 1950 साली त्यांनी दहावी पूर्ण केली. मुंबई विद्यापीठातून 1958 साली बी.ए. पूर्ण केले. अर्थात त्यांच्या अभ्यासाचा विषय मराठीच होता. 1960 साली एम.ए. केले तेव्हा त्यांनी अभ्यासाचा विषय संस्कृत घेतला. कॉलेज, नोकरी असा अनुभव घेतल्यानंतर एम.ए.ला शिकवत असतानाच्या काळात त्यांचे सामाजिक क्षेत्रातील कामही सुरू झाले. देवगडच्या महाविद्यालयात प्राचार्य असताना त्यांना गोमंतक पक्षाचे आकर्षण वाटू लागले. गोवामुक्तीनंतर तीन-चार महिन्यात ते पणजीच्या ढेपे महाविद्यालयात मराठीचे विभागप्रमुख झाले. बांदेकर वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य पदही त्यांनी भूषवले. तेव्हाचा काळ पिर्सोलकर, प्रियोळकर अशा अभ्यासकांच्या वक्तृत्वशैलीने भारावून टाकणारा होता. याच काळात गोपाळराव ज्ञानेश्वरीकडे आकर्षित झाले. संत  ज्ञानेश्वरांचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव राहिला. त्या प्रभावातून आणि भारलेपणातून त्यांची ज्ञानेश्वरीवरची रसाळ प्रवचने, निरुपणं गाजू लागली. त्यावर आधारित त्यांनी एक पुस्तकही लिहिले. गोपाळरावांचे अनेक कवितासंग्रह प्रकाशित झाले. कवी बा.भ. बोरकर यांच्या कवितेचा प्रभाव असला तरी स्वतंत्र प्रभावाने त्यांनी अनेक कविता लिहिल्या. यातीलच एक महत्त्वाचा कवितासंग्रह म्हणजे ‘स्वप्नमेघ’ होय. तो 1987 साली प्रसिद्ध झाला. त्याला गोवा कला अकादमीचा महत्त्वाचा पुरस्कारही लाभला. विशेष म्हणजे यातील ‘चंद्र वाटेवरी एकटा चालतो’ ही कविता अनुराधा पौडवालांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाली. 1969 साली महाराष्ट्र गोमंतक पक्षातर्फे त्यांनी म्हापसा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. दयानंद बांदोडकर मंत्रिमंडळात मंत्री झाले, तेव्हा त्यांनी पस्तीशी गाठली होती. 1989च्या निवडणुकीत उत्तर गोव्याचे खासदार झाले. मुंबईत 1955ला विद्यार्थी संघटनेने त्यांचा सत्कार केला होता. याच कार्यक्रमात त्यांना आलेल्या वैयक्तिक पत्रसंग्रहाचे प्रकाशन झाले. 2008 साली ‘श्री ज्ञानेश्वरीचे संकीर्तन आणि परब्रह्म ज्ञानेश्वर’ या डी.व्ही.डी. संग्रहाचे प्रा. शंकर वैद्य यांच्या हस्ते प्रकाशन झाले. मुंबईत विद्यार्थी असण्याच्या काळात त्यांना अरविंद देशपांडे, रत्नाकर मतकरी यांच्यासारखे मित्र लाभले. त्यांच्या मित्रमंडळींनी ‘ज्योती’ या नियतकालिकाचे संपादन केले होते. म.अ. करंदीकर, शंकर वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा साहित्यप्रवास सुरू राहिला. या सर्व राजकीय, साहित्यिक प्रवासाचे सविस्तर वर्णन त्यांनी आपल्या ‘मज दान कसे हे पडले’ या आत्मचरित्रात केले आहे. ‘समष्टीचिंतन’ व ‘ज्ञानदेवसृष्टी’ही त्यांची दोन पुस्तके महत्त्वपूर्ण समजली जातात. गोवा हिंदू असोसिएशनचे अध्यक्ष, गोमंतक मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे उपाध्यक्ष, साहित्य अकादमीचे मराठी विषयाचे सल्लागार, अशा विविध माध्यमांतून गोपाळरावांचे कार्य साहित्य आणि राजकारणाच्या क्षेत्रात बहरत गेले. 1965 साली ग.दि. माडगूळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात त्यांनी ‘ज्ञानेशांच्या समाधीपाशी’ ही कविता सादर केली. नंतर ती उमाकांत ठोंबरे यांच्या आग्रहावरून ‘प्राक्तन’ या मासिकात पाठवली व त्यात प्रसिद्धही झाली. मयेकर हे गोमंतक मराठी अकादमीचे माजी अध्यक्ष होते. लोभस आणि प्रासादिक शब्दकळा लाभलेले कवी होते. ज्ञानेश्वरीचे व्यासंगी अभ्यासक तथा तत्त्वचिंतक होते. तेजस्वी वक्ता अशी त्यांची ओळख होती. गोव्याचे माजी शिक्षण मंत्री होते. यासंदर्भात मयेकर यांच्याविषयी आठवण सांगताना गोव्याच्या लेखिका चित्रा क्षीरसागर म्हणाल्या, ‘‘गोव्यात मराठी राजभाषा व्हावी म्हणून मयेकरांनी आंदोलनात सहभाग घेतला. त्यांच्या साहित्य आणि राजकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना ‘पद्मश्री’ मिळायला हवा होता.’’

आपली प्रतिक्रिया द्या