गोदाकाठचे ‘रामदासीबाबा’

>> विवेक दिगंबर वैद्य

माणसाची जात जन्मावर नाही तर गुणांवर ठरते’ असे ठामपणे सांगणाऱया श्रीरामदासीबाबांचा कार्यपरिचय करून देणारा लेख.

अहमदनगर, नाशिक आणि औरंगाबाद या तीन जिह्यांच्या सीमेवर वसलेला कोपरगाव तालुका श्रीजनार्दनस्वामी व श्रीसाईबाबा यांची तपोभूमी तसेच कार्यभूमी म्हणून सर्वत्र सुपरिचित आहे. येथून जवळच, गोदावरीच्या काठावर वसलेल्या ‘कोकमठाण’ गावाचे स्थानमाहात्म्य परमश्रद्धेय श्रीरामदासीबुवा, श्रीजंगलीदास महाराज आणि श्रीश्रद्धानंद महाराज यांच्या पावन वास्तव्यामुळे सर्वदूर पसरले आहे. ‘कोकमठाण’ येथे अवघ्या ‘तीन खणी’ जागेत राहून पंचक्रोशीतील भक्तांना सन्मार्गाचा ‘रामानुभव’ देणाऱया श्रीरामदासीबुवांविषयी आपण जाणून घेऊया.

19 व्या शतकाच्या अखेरीस सांगली जिह्याच्या पलूस तालुक्यातील औदुंबर भिलवडी या गावी श्रीरामदासीबाबा यांचा जन्म झाला. कृष्णातीरावर वसलेले भिलवडी हे ‘श्रीदत्तक्षेत्र’ म्हणून सुप्रसिद्ध आहे. भिलवडी येथील हरिभाऊ कोल्हटकर या सत्शील अन् चारित्र्यसंपन्न अशा ब्राह्मण गृहस्थाच्या पोटी जन्मलेला आणि पंचक्रोशीत व शालेय जीवनात ‘शंकर’ या नावाने ओळखला जाणारा हा संस्कारक्षम सुपुत्र, पुढे ‘रामदासीबुवा’ या नावाने प्रसिद्ध होऊन ‘साधू’पदाला पोहोचेल अशी सात्त्विक कौटुंबिक पार्श्वभूमी त्याला जन्मतःच लाभली होती. ही सात्त्विकता अशी होती की, गावांतील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल गटातील मुले पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून कोल्हटकर कुटुंबीयांनी त्यांची स्थावर मालमत्ता विकली व त्यातून मिळालेले पैसे भिलवडी गावातील माध्यमिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजात शिक्षण घेऊ इच्छिणाऱया विद्यार्थ्यांना ‘शिष्यवृत्ती’च्या रूपाने देऊ केले. ही शिष्यवृत्ती आजही ‘हरिशास्त्राr गोविंद रामदासी’ या नावाने सुरू आहे.

‘शंकर’चे प्राथमिक शिक्षण भिलवडी येथे झाले आणि पुढील शिक्षणासाठी तो पुणे शहरात आला. येथे त्याचे माध्यमिक शिक्षण ‘न्यू इंग्लिश स्कूल’मध्ये आणि आणि इंटर सायन्सपर्यंतचे शिक्षण ‘फर्ग्युसन कॉलेज’मध्ये झाले. पुणे येथील सोमवार पेठेत राहणाऱया निराधार मावशीचे घर ‘शंकर’ला आधार देते झाले. माधुकरीच्या योगाने आपले शिक्षण घेणाऱया ‘शंकर’वर फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना लोकमान्य टिळक, आगरकर, नामदार गोखले आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा जबरदस्त पगडा होता. मराठी, इंग्रजी व संस्कृत भाषेवर उत्तम प्रभुत्व असलेला ‘शंकर’ देशकार्याची प्रखरता, अभ्यासपूर्ण मनोभूमिका आणि नेटके अध्यात्मविचार यांतून घडत गेला.

देशभरात स्वातंत्र्य चळवळीचे वारे वाहात होते. ‘फर्ग्युसन कॉलेज’मधील मित्रपरिवार ‘शंकर’च्या देव-देश आणि धर्मकार्याशी सहमत होता. पुढे काही काळानंतर, ‘वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू’ म्हणून प्रसिद्धीस आलेले प. पू. सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर हे त्याकाळी ‘शंकर’चे सहाध्यायी होते. या दोघांनाही देशकार्याची व समाजकार्याची आवड होती. व्यसनाधीन मंडळींना व्यसनांपासून परावृत्त करणे, गुन्हेगारीकडे वळलेल्या आणि मूळ तत्त्वापासून भरकटलेल्या तरुणांना सन्मार्ग दाखवणे व सुसंस्कारित समाज घडविणे हे त्यांचे स्वप्न होते. याकरिता त्या दोघांनीही जाणीवपूर्वक भक्तीमार्गाची निवड केली. मात्र त्यास प्रत्यक्षात साकारण्यासाठी ‘शंकर’ने ‘समर्थ’ संप्रदायाचा आणि मामासाहेब दांडेकर यांनी ‘वारकरी’ संप्रदायाचा झेंडा हाती घेतला. या दोघांचे मार्ग भिन्न असले तरीही ‘उद्दिष्ट’ एकच होते.
सन 1918. पुण्यामध्ये प्लेगच्या साथीने थैमान घातले तेव्हा ‘शंकर’ आपल्या जन्मगावी भिलवडी येथे आला. मात्र प्लेगबाधित पुणे शहरातून तो आल्याचे समजताच कोतवालाने त्यास गावात प्रवेश करू दिला नाही. हा प्रसंग ‘शंकर’च्या आयुष्याला नवे वळण देणारा ठरला. ‘शंकर’ तिथून निघाला आणि त्याने थेट ‘सातारा’ गाठले. पुढील आयुष्याचे ध्येय समर्थांच्या सान्निध्यात सज्जनगडावर साकारण्याचे ठरवून ‘शंकर’ने बारा वर्षांची कठोर तपसाधना केली आणि त्यानंतर तो संन्यासधर्म स्वीकारता झाला. भिलवडी गावाहून निघालेला शंकर हरिभाऊ कोल्हटकर आता ‘रामदासीबुवा’ ही नवी ओळख धारण करून संन्यासी बनला आणि सर्वत्र संचार करण्यासाठी सिद्ध झाला.

रामदासीबाबांनी समर्थ स्थापित अकरा मारुतींची दर्शनभेट घेतली. चारधाम तसेच असंख्य तीर्थ व क्षेत्रे पाहिली. तेथून श्रीरामपूरच्या हरेगांव येथून अहमदनगर जिह्यातील महांकाळ वडगाव येथे ते आले. या गावी त्यांनी केवळ वास्तव्यच केले नाही तर येथे मारुतीचे मंदिर उभारून ग्रामस्थांना उपासनेचा मार्ग खुला करून दिला. दुष्काळी परिस्थितीत होरपळणाऱया या गावाला रामदासीबाबांच्या कृपेने जलसंजीवनी लाभली. त्यांच्या वास्तव्याने गावाचा कायापालट झाला. या काळात बापट महाराज, फक्कडबाबा, फौजदारबाबा या समकालीन संतांचे मैत्र स्वीकारून पुढे रामदासीबाबा नाऊर (सराला बेट), जार्वे (संगमनेर), लासलगाव (नाशिक), निफाड, पिंपळगाव, मनमाड, चाळीसगाव व पुणतांबे असे भ्रमण करीत रामदासीबाबा सडे (कोपरगाव) येथे आले. बाबांना येथे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एकदा येथे पडलेल्या दरोडय़ाच्या निमित्तातून निर्माण झालेले वादविवाद न रुचल्याने रामदासीबाबा ‘सडे’ येथून निघाले आणि गावाबाहेर नदीपलीकडे असलेल्या ‘गवळण टेकडी’वर वास्तव्य करते झाले. येथे रामकुंड परिसरात तपसाधना करणाऱया रामदासीबाबांना त्राटक सिद्धयोग तसेच अनेकविध सिद्धींचे ज्ञान प्राप्त झाले. मात्र सिद्धयोग बाजूला सारून त्यांनी भक्तीमार्गाच्या माध्यमातून समाजोद्धार करण्यावर भर दिला. रामदासीबाबांनी उर्वरित आयुष्य धर्मप्रचार आणि प्रसार यामध्ये खर्ची घातले. धर्मभास्कर विनायक महाराज मसूरकर यांचे सद्गुरुपद लाभलेले रामदासीबाबा पुढे परंपरा आणि मूल्यनिष्ठा हरवत चाललेल्या समाजास धार्मिक व सामाजिकदृष्टय़ा जागृत ठेवण्याचे अखंड कार्य करण्यात मग्न राहिले. समाजातील प्रत्येक जीव हा परमेश्वरस्वरूप आहे ही महत्त्वाची शिकवण त्यांनी समाजात रुजवली. समर्थ रामदासांचा कर्ममार्ग, ज्ञानमार्ग व उपासनामार्ग रामदासीबाबांनी स्वतः आचरणात आणून त्यास समाजापुढे प्रभावीपणे मांडण्याचे महत्त्वाचे कार्य केले.

सत्कार्याचा ध्यास घेणे, साक्षर अन् शिक्षित समाज घडविणे, परमार्थाचे मर्म अन् परिश्रमाचा धर्म समजावणे, तरुण पिढीला बलशाली अध्यात्ममार्गाचा परिचय घडविणे, भक्तीमार्गातील चंगळवाद अन् दंभगुरूंचे अवास्तव स्तोम यांवर सडकून टीका करणे यांच्या माध्यमातून प्रखर बुद्धिमत्ता लाभलेल्या रामदासीबाबांनी अध्यात्माला नवी दिशा, प्रगल्भ वैचारिक बैठक आणि पारंपरिक अधिष्ठानही बहाल केले.

पुढे कोपरगावच्या ‘कोकमठाण’ गावातील ‘तीन खणी’ जागेत भक्तांना सन्मार्गाचा ‘रामानुभव’ देणारे श्रीरामदासीबाबा, त्यांच्या निर्मोही विरक्त वृत्तीचा, सिद्धीमार्गाला दूर सारून उपासनेचा पुरस्कार करणाऱया लौकिक देहाचा 02 ऑक्टोबर 1982 रोजी त्याग करते झाले. रंगनाथराव डहाळे यांच्या लेखणीतून साकारलेली ही श्रीरामदासीबाबांची अलौकिक चरित्रगाथा प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशीच आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या