सदाबहार फार्स

153

>> क्षितिज झारापकर 

‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ बबन प्रभूंचे सदाबहार नाटक… ही कसदार नाटकं पुनरुज्जीवीत होऊन आल्याने नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहेत.

मराठी नाटय़रसिकांचा ‘फार्स’ हा आवडता नाटय़ प्रकार आहे. मराठी रंगभूमीवर आजपर्यंत अनेक फार्स झाले अणि बहुतेक सगळे गाजले. याचं मुख्य कारण म्हणजे फार्स पाहताना आपल्याला चार घटका आपल्या विवंचना विसरून निखळ मनोरंजन प्राप्त होतं. मुळात फार्स हा प्रकार अतिरंजित पात्ररचनेचा अणि घटनाक्रमाचा, पण या अतिरंजकतेला थोडीशी आपल्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टींची झालर दिली की, मग सगळा प्रकार आपल्या पचनी पडू लागतो. हे जुळवणं हेच फार्स लेखकाचं खरं कौशल्य. यात मराठी नाटय़ लेखकांमध्ये खूप नावं सापडतात. या सगळ्यात अग्रगण्य नाव आहे ते बबन प्रभू यांचं. सावळ्या चेहऱ्याच्या मुद्राभिनयाने प्रेक्षकांना लोटपोट करू शकणारे बबन प्रभू यांनी मराठी रंगभूमीला अनेक उत्कृष्ट फार्स दिले आहेत. हे गणित त्यांना जमलं होतं. बबन प्रभू लिखित एक फर्मास फार्स ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ ज्येष्ठ नाटय़ निर्माते गोपाळ अलगेरी यांनी आपल्या वेद प्रॉडक्शन्स या नाटय़ संस्थेतर्फे यंदाच्या हंगामात रंगमंचावर आणलं आहे.

फार्स हा प्रकार गतिमान असावा लागतो. तो तसा नसला तर प्रेक्षक त्यात तर्क शोधू लागतात आणि मग नाटक फसतं. ही गती सांभाळणं सर्वस्वी नाटकातील कलाकारांच्या हाती असतं. कारण प्रेक्षकांसमोर सादरीकरण कलाकार करीत असतात. दिग्दर्शकाने जरी तालमीमध्ये लय ठरवून दिलेली असली तरी ती लय प्रयोगात साधणं हे कलाकारांनाच करायचं असतं. ‘दिनूच्या सासूबाई राधाबाईं’च्या या आवृत्तीमध्ये प्रमुख नट अणि दिग्दर्शक संतोष पवार आहे. इथेच ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ने बाजी मारलीय. या फार्सची लय आणि ताल संतोषने फारच उत्तम पद्धतीने सांभाळलेला आहे. एका प्रतिष्ठत आणि प्रस्थापित माणसाच्या घरी त्याची अतिऍग्रेसिव्ह सासू येते अणि मग जो गोंधळ होतो ते कथानक म्हणजे ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’. आता मुळात एका माणसाच्या घरी त्याची सासू येणं आणि त्याचा त्याला त्रास ही मानवजातीची एक परंपराच म्हणावी लागेल. ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ इथेच प्रेक्षकांच्या मनात बसतं. आता त्यात बबन प्रभूंनी घेतलेली पात्रं या हंगाम्यात अधिकच भर टाकतात. ज्यादा शहाणा दिनू, अत्यंत ऍग्रेसिव्ह सासूबाई, पिचलेला ज्याला ‘हेन पॅक्ड’ म्हणतात तसा सासरा कन्हैया, पडेल ते काम करणारा दिनूचा मित्र गुरांचा डॉक्टर नाय, सिनेमाचं प्रचंड वेड असलेली दिनूची मेहुणी आणि दिनूवर खूप प्रेम करणारी त्याची बायको ही सगळीच अतिरंजित पात्रं नाटकात समज-गैरसमजाचा धुमाकूळ घालतात.

दिनूच्या भूमिकेत संतोष पवार आपला ट्रेडमार्क परफॉर्मन्स देतो. संतोषची पठडीच मुळात ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ला समर्पक अशी आहे. स्वतःचं दिग्दर्शन असल्याने त्याला इथे मनोरंजक थैमान घालण्याची मुभाच आहे. त्याचा तो संपूर्ण उपयोगही करून घेतो. संतोषसमोर सासूच्या रूपात उभ्या ठाकल्या आहेत त्या साक्षात नयना आपटे. मंझे हुए कलाकार म्हणजे नेमकं काय ते नयनाताईंच्या इथल्या अभिनयातून दिसतं. समोर संतोष पवार ऐन बहरात असताना नयनाताई नेमक्या टायमिंगने टोला हाणतात आणि नाटक दिनूच्या सासूबाईचं राधाबाईंचं आहे याची पदोपदी जाणीव करून देतात. कलाकाराचं कौशल्य यातून दिसतं. या दोघांच्या जोडीला आहे ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’मधला तिसरा भरभक्कम सपोर्ट विनय येडेकर. विनयमुळे आणि नंतर येणाऱ्या सिनेमा नटीच्या भूमिकेतल्या इरावती नाडगौडामुळे ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ हे एक मल्टिस्टारकास्ट नाटक झालंय. विनय येडेकरचा डॉ. नाय हा एकाच वेळी भाबडा आणि छद्मी आहे. येडेकरांनी हे अजब पात्र अत्यंत सिन्सिअरली रंगवलंय आणि त्यातच याची गंमत आहे. केवळ चेहऱ्यावरच्या मुद्राभिनयाने विनय प्रेक्षकांकडून रिऍक्शन वसूल करतो आणि न जाणताच आपल्याला लेखक बबन प्रभूंची याद देऊन जातो. इरावती नाडगौडा हिने सिनेमा नटी भडक आणि चंचल अशी उत्तम उभी केली आहे. मोठी पात्ररचना असलेली नाटकं हल्ली मराठी रंगभूमीवर येत नाहीत. ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ हे याला अपवाद म्हणावं लागेल. गोपाळ अलगेरी यांनी इतकी वर्षे नाटय़ निर्मितीचा अनुभव गाठीशी असल्याने ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’चं धाडस केलं आहे. नाटकातली सगळी कलाकार मंडळी उत्तम काम करतात. हा फार्स कलाकारांच्या कामगिरीमुळेच रंजक होतो.

‘दिनूच्या सासूबाई राधाबाईं’चं नेपथ्य अत्यंत कल्पक आहे. दिनूचं घर प्रासादिक आहे. घराचा दिवाणखाना दर्शनीय आहे. त्याचबरोबर घरासारख्या असंख्य खोल्या आहेत, ज्या गोंधळ वाढवण्याच्या कामी येतात, पण केवळ एवढंच नाही तर नाटकात बगिचा, गॅरेज, आऊटहाऊस आणि कुक्कुटपालनाची जागा अशीही स्थळं आहेत. नेपथ्याचं कौतुक असं की, हे सगळं एकाच वेळी रंगमंचावर दाखवण्यात आलेलं आहे. निर्मिती मूल्यांमध्ये ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ कुठेही कमी पडत नाही.

‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ हे बबन प्रभूंनी साधारण सत्तरीच्या दशकात लिहिलेलं नाटक आहे. आज ते सादर करताना संतोष पवार कवी निर्मात्यांनी त्यात स्ट्रक्चरल बदल करून ते आजचं करण्याचा प्रयत्न केलेला नाही हे स्तुत्य आहे. तसं काल असतं तर कालांतराने जगात झालेले बदल त्यात आणावे लागले असते अणि मग फार्सचा डोलारा कोलमडून नाटक उघडं पडण्याची शक्यता होती. ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या आवृत्तीत हे प्रकर्षानं टाळलं गेलंय. पात्रांची वेशभूषादेखील त्या काळाला चपखल बसेल अशीच करण्यात आलेली आहे. सत्तरीला शोभणारे भडक रंगाचे अतरंगी पोषाख ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या फार्सचं दृष्यरूप अधिक रंगतदार करतात आणि सतत आपल्याला नाटकाच्या काळाची आठवण करून देतात. वेद प्रॉडक्शन्सने एक धमाल, मजेदार पण पीरियोडिकल आणि एव्हरग्रीन मराठी नाटक म्हणून ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ हे आपल्या भेटीला आणलेलं आहे.

  • नाटक : दिनूच्या सासूबाई राधाबाई
  • निर्मिती : श्री विश्वर्स्मे प्रॉडक्शन व वेद प्रॉडक्शन्स
  • नेपथ्य : प्रसाद वालावलकर
  • पार्श्वसंगीत : साई-पीयूष
  • शीर्षक संगीत : डॉ. अभिनय देसाई
  • दिग्दर्शक : संतोष पवार
  • कलाकार : नयना आपटे, विलास देसाई, विनय येडेकर, संतोष पवार
  • दर्जा : अडीच स्टार
आपली प्रतिक्रिया द्या