…वेगळा शशी कपूर!

107

>> धनंजय कुलकर्णी

मागच्या आठवड्यात रसिकांना अलविदा करून गेलेल्या चार्मिंग ‘शशी कपूर’वर मागच्या काही दिवसांत भरपूर लिहून आले. त्याच्या भूमिका, त्याचा अभिनय, त्याच्या नायिका आणि त्याच्यावर चित्रित झालेली गाणी!

समाजमाध्यमातून त्याच्या आयुष्याचा विविधांगी आलेख चितारला गेला. मुख्य प्रवाहातून तब्बल तीस वर्षे बाहेर पडूनही त्याचा चाहता वर्ग अजूनही त्याला आठवतच नव्हता तर त्याला आपल्या दिलात सामावून घेत होता हे विशेष! तीन सुपरस्टार (राजेंद्रकुमार, राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन) यांच्या लोकप्रियतेच्या कालखंडात स्वतःला सिनेमागणिक सिद्ध करणे त्याला जमू शकले. मल्टी स्टारर सिनेमातही शशीने आपले वेगळेपण यशस्वी करून दाखवले. अमिताभसोबत तब्बल १२ चित्रपटांतून तो चमकला. आणि प्रत्येक वेळी तो अमिताभसमोर कुठेही कमी पडला नाही. ज्यावेळी अमिताभ आणि रेखा ही जोडी यशाच्या शिखरावर होती त्या वेळी जया भादुरीला एका पत्रकाराने खवचटपणे विचारले होते की ‘अमिताभची जोडी सध्या कोणत्या कलाकारासोबत परफेक्ट जमते असे आपल्याला वाटते?’ यावर जयाने प्रश्नकर्त्याच्या कावेबाजपणाला मुत्सद्दी उत्तर दिले ‘सध्या अमिताभची जोडी परफेक्ट जमते ती केवळ शशी कपूर सोबतच!’ आणि जयाचे विधान अक्षरशः खरे होते. हे सर्व जरी खरे असले तरी त्याच्या इंग्रजी सिनेमा आणि पुरस्कारप्राप्त चित्रपटांवर काहीच लिहिले गेले नाही याची खंत वाटते. शशी कपूरला जागतिक रंगभूमी आणि सिनेमाची चांगली जाण होती. त्या प्रवाहात त्याने स्वतःला झोकून दिले होते. लोकप्रिय गोष्टी रसिकांना ठाऊक असतात, पण एखाद्या व्यक्तीचे, कलावंताचे सर्वांगीण मूल्यमापन करावयाचे असल्यास त्याच्या या गुणी पण काहीशा अप्रसिद्ध पैलूंवर चर्चा व्हायला हवी.

पृथ्वीराज कपूर यांचं पहिलं प्रेम नाटकावर होतं. या रंगभूमीच्या प्रेमाने ते झपाटलेले असायचे. साऱ्या देशभर त्यांचा दौरा चालू असायचा. पित्याचे हे नाट्यप्रेम शशी कपूरमध्ये उतरले होते. त्याला साथ मिळाली ती त्याची अर्धांगिनी जेनिफरची. तिचे कुटुंब असेच नाटय़प्रेमी. शेक्सपियरच्या नाटकांवर अतोनात प्रेम करणारे. या दोन रंगकर्मींची गाठ पन्नासच्या दशकात पडली. प्रेमात पडले आणि विवाहाच्या बंधनात अडकले. जेनिफरमुळेच शशीचा कलाकृतीकडे पाहण्याचा पारंपरिकसाठी दृष्टिकोन बदलला. व्यावसायिक चित्रपट करताना त्याची नाळ जुळली जागतिक पातळीवरील समांतर आणि साहित्याशी निगडित अशा चित्रपटांशी. आज त्याच्या अशाच काही अनोळखी पण उत्कृष्ट कलाकृतींवर नजर टाकूया.

१९६१ साली शशीचा पहिला नायक म्हणून असलेला ‘धर्मपुत्र’ आणि ‘चार दिवारी’ हे सिनेमे झळकले. त्याच्या पुढच्याच वर्षी त्याचा पहिला इंग्रजी चित्रपट आला ‘द हाउस होल्डर’. हा चित्रपट इस्माईल मर्चंट यांनी दिग्दर्शित केला होता. हा सिनेमा रूथ प्रवेर झबवाला यांच्या १९६० साली प्रदर्शित झालेल्या कादंबरीवर आधारित होता. यात शशीची नायिका लीला नायडू होती. यात दुर्गा खोटे यांचीही भूमिका होती. सत्यजित रे यांनी या सिनेमाकरिता मोलाचे मार्गदर्शन केले होते. दिल्ली शहरात घडणाऱ्या या चित्रपटाला व्यावसायिक यश भलेही मिळाले नसले तरी जागतिक पातळीवर याचे सर्वत्र कौतुक झाले. १९६५ साली इस्माईल मर्चंट यांच्या ‘शेक्सपियरवाला’ या इंग्रजी सिनेमात शशीची नायिका फेलीसिटी कँडॉल होती. कँडॉल कुटुंब जगभर शेक्सपियरच्या कलाकृतींचे नाटय़प्रयोग करीत असायचे. यातील शशीने संजू या गुलछबू तरुणाची भूमिका केली होती. १९६७ साली शशी कपूर एका ब्रिटिश फिल्म ‘प्रेटी पॉली‘ मध्ये चमकला. गे ग्रीन यांनी दिग्दर्शित केलेला हा इंग्रजी चित्रपट नोएल कोवर्ड यांच्या प्रेटी पॉली बार्लो या कथेवर आधारित होता. यात शशी कपूरची भूमिका अमर नावाच्या सिंगापूरस्थित गाईडची होती. १९७० साली जेम्स आयव्हरी दिग्दर्शित ‘बॉम्बे टॉकी’ या सिनेमात पहिल्यांदा शशी कपूर आणि जेनिफर नायक-नायिकेच्या भूमिकेत चमकले. याला शंकर जयकिशन यांचे संगीत होते आणि गाणी रफी, आशा, किशोर, उषा उथ्थप यांनी गायली होती. यात अपर्णा सेन आणि उत्पल दत्त या हिंदुस्थानी कलाकारांच्या भूमिका होत्या. १९७२ साली हर्मंस हेस यांच्या ‘सिद्धार्थ’ या अमेरिकन चित्रपटात शशी कपूर आणि सिम्मी गरेवाल यांच्या भूमिका होत्या. या सिनेमाचे बव्हंशी चित्रण उत्तर हिंदुस्थानात आणि ऋषिकेश येथे झाले होते. हा चित्रपट त्यातील न्यूड सीनमुळे खूपच वादग्रस्त ठरला होता. सेन्सॉर बोर्डाने यावर मोठे निर्बंध घातले होते. या सिनेमाचा अमेरिका आणि इंग्लंड मध्ये भव्य प्रीमियर झाला होता. १८ जुलै १९७३ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची डीव्हीडी २००२ साली आल्यावर पुन्हा एकदा चर्चेत आला होता पण तोवर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. ‘सिद्धार्थ’नंतर पुढची दहा वर्षे शशी कपूर बॉलीवूडमध्ये बिझी राहिला. १९८२ साली पुन्हा इस्माईल मर्चंट, जेम्स आयव्हरी यांच्या ‘हिट अँड डस्ट’ या ब्रिटनच्या सिनेमात शशी कपूरने भूमिका केली. यात त्याच्या समवेत ग्रेटा स्काची ,ज्युली ख्रीष्टी यांच्या भूमिका होत्या. या सिनेमात दोन कालखंड दाखविले होते. १९२० सालच्या ब्रिटिश इंडियाचा आणि नंतर १९८० सालचा स्वतंत्र हिंदुस्थानचा. यात शशीची भूमिका नवाबाची होती. हा सिनेमा रूथ प्रवेर झबवाला यांच्या कादंबरीवर आधारित होता. (या कादंबरीला १९७५ सालचा बुकर पुरस्कार प्राप्त झाला होता.) सिनेमाचा स्क्रीन प्ले तिनेच लिहिला होता . व्यावसायिकदृष्ट्या या सिनेमाला जगभरात व्यापक यश मिळाले. १९८३ सालच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याचा समावेश होता.

याव्यतिरिक्त शशी कपूरने निर्माता म्हणून हिंदुस्थानी सिनेमाला जे अनमोल योगदान दिले त्यास तोड नाही. १९७८ साली रस्किन बाँड यांच्या ‘फाइटस् ऑफ पिजन्स’ या कादंबरीवर ‘जुनून’ हा १८५७ च्या बंडाच्या कालखंडावरील सिनेमा शशी कपूरने बनविला . श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्राला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. ३० मार्च १९८९ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे छायाचित्रण गोविंद निहलानी यांचे तर संगीत वनराज भाटीया यांचे होते. अनेक महोत्सवात दाखविल्या गेलेल्या या सिनेमाला अनेक पुरस्कार मिळाले होते. १९८१ साली महाभारतावरून प्रेरणा घेऊन दोन मोठय़ा उद्योग विश्वातील शह-काटशहाचे राजकारण दर्शविणारा ‘कलियुग’ हा चित्रपट शशी कपूरने बनविला (दिग्द. श्याम बेनेगल). या मल्टी स्टारर सिनेमात आधुनिक महाभारत फार सुरेख रीतीने दाखविले गेले. यात शशीची कर्णसदृश भूमिका वाखाणण्याजोगी होती. हा चित्रपट १२ व्या मास्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविला गेला. १९८१ साली त्यांची निर्मिती असलेला ‘३६ चौरंगी लेन’ हा सिनेमा झळकला. यात शशीची भूमिका नव्हती. यात मुख्य भूमिकेत जेनिफर कँडॉल होती. एका अँग्लो इंडियन प्रौढ स्त्राrची भूमिका तिने केली होती. अपर्णा सेनचं देखणं दिग्दर्शन याला होतं. या सिनेमाला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. जेनिफरची भूमिका तिच्या कारकीर्दीचा माइल स्टोन ठरली. १९८२ साली शशीकपूरने आणखी एका महत्त्वाकांक्षी सिनेमाची निर्मिती केली. गोविंद निहलानी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट होता ‘विजेता’. हिंदुस्थानी हवाई दलाच्या नेमक्या हालचालींचे अतिशय सुंदर चित्रण यात होते. या सिनेमाला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. १९८४ साली शूद्रकाच्या ‘मृच्छकटीक‘ या संस्कृत नाटकावर एक भव्य सिनेमा शशी कपूरने बनविला ‘उत्सव’. गिरीश कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा भलत्याच कारणाने चर्चिला गेल्याने त्याचा नेमका संदेश प्रेक्षकांपर्यंत पोचू शकला नाही. ‘मन क्यूं बहका रे बहका’ हे आशा-लताचे गाणे यात होते. चारुदत्तच्या भूमिकेत शेखर सुमन तर वसंतसेनेच्या भूमिकेत रेखा होती. १९८४ साली शशीच्या पत्नीचे जेनिफरचे निधन झाले १९८७ साली मोठा भाऊ राज कपूर निघून गेला. शशी कपूरला हे दोन्ही आघात पचविणे खूप कठीण गेले. १९९१ सालच्या ‘अजूबा’ चा अपवाद वगळता त्याने निर्मिती थांबवली. १९८६ साली प्रदर्शित झालेल्या ‘न्यू दिल्ली टाइम्स’ मधील पत्रकाराच्या भूमिकेकरिता राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता तर ‘दीवार’करिता फिल्म फेयरचा.

आज शशी कपूर आपल्यात नाही, पण त्याच्या कलाकृती आपल्यासमोर आहेत. त्याच्या एकूण कलाजीवनाचे दर्शन घडविताना त्याच्या कलाजीवनाचा अनोळखी पैलू रसिकांसमोर यावा याकरिता हा लेखप्रपंच.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या