मुद्दा : विरोधकांना धक्का का बसला?

>> मनमोहन रो. रोगे

लोकसभा निवडणुकीसाठी कधी नव्हे ते आपापसातले हेवेदावे-भांडणे विसरून हिंदुस्थानातील आवळा-भोपळा पक्ष एक झाले ते केवळ मोदींविरोधात. प्रसिद्धीमाध्यमांनीही त्याला भरपूर प्रसिद्धी दिली. 2014 मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यापासून विरोधी नेत्यांनी विशेषतः काँग्रेसी नेत्यांनी त्यांना विविध दूषणे दिली. (त्याला प्रत्युत्तर म्हणून कधी मोदींनीही प्रतिक्रिया दिल्या, पण बऱयाच वेळा दुर्लक्षच केले.) दलाल, मौत का सौदागर, चोर अशीही त्यांची संभावना केली गेली. या सगळ्याचा सर्वसामान्य माणसांना राग होता. स्वातंत्र्यापासूनच मुजोर पाकिस्तान सीमेवर रोज हल्ले करून थांबले नाही तर देशातील विविध शहरांमध्ये वेळोवेळी बॉम्बस्फोट केले. मुंबईवर अमानुष हल्ला केला इतकेच नव्हे तर देशाचे नाक समजले जाणाऱया सार्वभौम लोकसभेवर हल्ला करण्याची हिंमत केली तरी त्यावेळच्या सरकारने फक्त निषेध नोंदवण्यापलीकडे काहीही केले नाही याची खदखद सर्वसामान्य हिंदुस्थानीयांच्या मनात होतीच.(पाकिस्तानबरोबरची तीन युद्धे हिंदुस्थान जिंकला तसेच पाकिस्तानचे दोन भाग केले तरी हल्ल्याला प्रतिहल्ला केला गेला नाही.) त्यातच गेल्या दोन वर्षांत उरी आणि पुलवामा येथे जे हल्ले झाले त्याला प्रत्युत्तर म्हणून मोदी सरकारने पाकवर दोन सर्जिकल स्ट्राइक केले.

दोन्ही हल्ल्यांचा सूड घेतला या क्रियेने सर्वसामान्य हिंदुस्थानीयांना प्रचंड आनंद आणि समाधान मिळाले, मात्र तुकडा गँगचे समर्थन करणारे काँग्रेसचे नेते आणि इतर पक्षीयांनी त्याबाबत सरकारचे अभिनंदन केले नाहीच, पण अशा सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागितले तर काही बेजबाबदार नेत्यांनी हिंदुस्थानी प्रतिहल्ल्यात जे पाकिस्तानी अतिरेकी व सैनिक ठार झाले त्याबाबत दुःख व्यक्त केले याची चीड सर्वसामान्य हिंदुस्थानीयांना होती. पाच वर्षांत हिंदुस्थानच्या अंतर्गत भागात पाकिस्तानी अतिरेकी हल्ले करू शकले नाहीत तसेच अरुणाचल प्रदेशवर आपला हक्क सांगून हिंदुस्थानी हद्दीत रस्ते बांधून आपल्या चौक्या उभारणारे चीन मागील पाच वर्षांत तसे करू शकला नाही. चीनची अवाजवी दाखवली जाणारी भीती कमी झाली हे लोकांच्या लक्षात आले.

वर्षानुवर्षे जाहीर होणाऱया सरकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांना मिळत नव्हता. गेल्या पाच वर्षांत मात्र अशा योजना लाभार्थींपर्यंत पोहोचल्या. हिंदुस्थानच्या कोणत्याही पंतप्रधानाला लाभला नसेल इतका मान-सन्मान मोदींना जगभर लाभला. या सर्व गोष्टींचा सर्वसामान्य हिंदुस्थानी जनतेवर प्रभाव पडला. तो लोकांनी दाखवून दिला तरी तथाकथित बुद्धिवादी व विचारवंत यांना तो दिसला नाही. म्हणूनच भाजपला इतके प्रचंड यश मिळेल असे मोजक्या मंडळींनीच सांगितले. सर्वसामान्यांच्या आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हिताचे निर्णय मोदींनी घेतले तरी त्यांची चोर अशी संभावना विरोधकांनी केली. म्हणूनच जनतेने मोदींना पुन्हा पसंत करून तुकडा गँग आणि त्यांच्या समर्थकांना सत्तेपासून दूर ठेवले. इतकेच नव्हे 65 वर्षे सत्ता भोगलेल्या काँग्रेसचे 15-20 राज्यांत नामोनिशाण मिटवले.

आपली प्रतिक्रिया द्या