श्रीमंत श्रावण

106

>> वैजनाथ महाजन

मराठीतील सर्वोत्तम निसर्गकवी असा ज्यांचा रास्त उल्लेख आजपर्यंत होत आला आहे त्या बालकवींची ‘श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे’ ही निसर्गाचे सहजसुंदर रूप आपल्यापुढे उलगडून दाखविणारी एक सदैव मनाला सुखावणारी अशी ओळ आहे. श्रावणाचा आणि निसर्गाचा अनुबंध शतकानुशतकाचा आहे. इतकेच नव्हे तर तो युगायुगाचा आहे असेही म्हणता येईल.

श्रावणमासात रिमझिम अशा झरणाऱ्या पावसाच्या मोहरलेल्या काळातील महिना आहे. या महिन्यात आपले सण आणि सांस्कृतिक उत्सव मोठय़ा थाटामाटात साजरे होत असतात. तसे हे दिवस माणसाचा रोजचा आनंद आणखी द्विगुणीत करणारे असेच असतात. या दिवसांत आजी पूर्वी नातवंडांना श्रावण शुक्रवारच्या म्हणजेच संपत शुक्रवारच्या कथा सांगत असायची. त्यामुळे श्रावणातील प्रत्येक दिवसाबरोबर नातवांकरिता एक-एक गोष्ट आपोआपच समोर यायची. त्यातून मुलांना गोष्टी ऐकण्याचीही सवय लागायची आणि त्याचबरोबर चराचरी सृष्टीबद्दलचे त्यांचे औत्सुक्यही तितकेच वाढीस लागत असे. या दिवसांत एक दिवसआड घरी हमखास गोडधोड होणार याचा बाळगोपाळांना आणखीच आनंद. याच दिवसांत पडणाऱ्या पावसाचे ‘श्रावणात घननिळा बरसला’ असेपण वर्णन करण्यात आलेले आहे. घननीळ पाऊस हा तसा गडद रंगाचा, पण त्याच्यामुळे सर्वत्र हिरवे हिरवे गालीचे आपोआपच पसरले जात. यावर बाळगोपाळांचा मेळा उडय़ा मारून खेळणारा आणि आभाळात उगवलेल्या इंद्रधनुष्याकडे टक लावून पाहणारा असा आपणांस कुठेही भेटतो. असे इंद्रधनुष्य आणि श्रावणाचा पाऊस यांचा जो अपूर्व संगम आभाळी होतो तो माणसांना अक्षरशः वेडावून टाकणारा असतो.

आभाळात इंद्रधनुष्य उगवले तर त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाणारा माणूस म्हणजे तो फक्त नावाचाच माणूस म्हटले पाहिजे. याच दिवसांत मंदिरात सकाळी काकड आरत्या सुरू होतात आणि त्याच वेळी मंदिरातील लहान-मोठय़ा घंटा निनादू लागतात. भाविकांची लगबग सुरूच असते. घरोघरी पूजा करण्याचा आणि त्यातून चार माणसांना जेवू-खाऊ घालण्याचा विचार सुरू होत असतो. पुरणपोळ्यांची देवाण-घेवाण शेजारी-पाजारी सुरू होते आणि प्रत्येकाचे तोंड कसे छान गोड होऊन जाते.

यातच श्रावणातील सोमवार म्हणजे महादेवाच्या मंदिरात गर्दी आणि त्या दिवसाचा उपवास म्हणजे आनंदाची आणखी एक पर्वणी. या साऱयात श्रावण केव्हा भोज्याला जाऊन शिवतो हे पण कळत नाही. कारण तसा हा मास फार झटपट जाणारा आणि तिथून आपणाला वारंवार खुणावणारा असाच असतो.

या दिवसांत माणसांना बऱ्यापैकी देवधर्म करावा असे वाटत असते. कारण ही सारी त्या श्रावणाची किमया असते. त्यामुळे माणसांना सुखाची लयलूट घडवून आणणारा आणि धार्मिक बनविणारा श्रावण मास म्हणजे आपल्या सर्व मासांतील सर्वात श्रीमंत असा आणि वैभवाने भरून येणारा व आपल्या जवळचे सारे तुमच्या आमच्या ओंजळीत ठेऊन जाणारा असा असतो. तो प्रतिवर्षी येणारच असतो, पण तरीसुद्धा त्याच्याबद्दलची आबालवृद्धांच्या मनात असलेली ओढ कधीही तसूभरही कमी होत नाही. ही तर श्रावणाची खरी किमया असते आणि तिची लज्जत पण तितकीच और असते.

 

आपली प्रतिक्रिया द्या