बहुग्रहीय वास्तव्याकडे झेप!

39

>>सुजाता बाबर

नासा संस्थेने पार्कर सोलर प्रोब या वर्षी २०१८ साली जुलै महिन्यात सूर्याकडे झेपावणार अशी घोषणा केली आणि अंतराळ सफरींबाबत चर्चेला उधाण आले. या अनुषंगाने अंतराळ मोहिमा व प्रयोगांचा वेध घेणारा हा लेख.

ब्रह्मांड! एक अंतहीन साम्राज्य! याला ना अंत ना सीमा! असे हे ब्रह्मांड आणि आधुनिक विज्ञानाच्या भाषेतले विश्व, अंतराळ. विश्वाच्या निर्मितीचे अनेक सिद्धांत आहेत तसे त्याच्या अंताचेदेखील अनेक सिद्धांत आहेत. आपल्या जीवनकालासाठी मात्र ते अनंत आहे. त्याला सीमा नाहीत. ते तर पसरत चालले आहे. आपल्याला सर्वात जवळची अवकाशीय वस्तू म्हणजे चंद्र, त्यानंतर मंगळ आणि मग इतर ग्रह आणि सूर्य हे आपले कुटुंब असे मानले तर आपण यातील सर्वात प्रबळ अशा सूर्याजवळ जाण्याच्या तयारीत आहोत.

नासा संस्थेने पार्कर सोलर प्रोब या वर्षी २०१८ साली जुलै महिन्यात सूर्याकडे झेपावणार अशी घोषणा केली आहे. या प्रोबवर आपली नावे नोंदवावीत आणि तीही मानवतेच्या दृष्टीने, मानवतेच्या हितामध्ये म्हणून एक अभियानदेखील चालवले आहे. अशी अभियाने मंगळ मोहिमांसाठी जसे, द इनसाइट लॅंडर, इनसाईट, ओरायन यासाठीदेखील चालवलेली आहेत. याचा हेतू हा केवळ अधिकाधिक लोकांपर्यंत ही माहिती पोहोचावी आणि जागरुकता वाढावी असे म्हटले आहे. सूर्याकडे अशी मोठी मोहीम प्रथमच जात आहे. सूर्याजवळ आपण जाऊ शकणार नाही, आपले नाव तरी जावे असे अनेकांना वाटणे साहजिकच आहे. यात करोडो लोक सहभाग घेतीलही. विविध सामाजिक माध्यमांमधून खगोलशास्त्र्ा आणि त्यातील मोहिमांची माहिती चटकन सर्वांपर्यंत पोहोचते आहे आणि एकूणच या विज्ञानाबद्दल जागरुकता वाढली आहे याचे हे एक द्योतक आहे.

अंतराळ संशोधन हे वेगाने अत्यंत प्रगत होत जाणार आहे. अमानवी मोहिमा तर असंख्य असतीलच, पण आता मंगळावर मानवी मोहीम लवकरच जाईल. चंद्र तर जणू आपल्या हातात गवसला आहे असेच म्हटले जाते. शिवाय आपण आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासारखे स्थानक पृथ्वीपासून अवघ्या ३२२ किलोमीटर अंतरावर उभे केले आहे. अशी अनेक स्थानके भविष्यात उभी राहतील. खगोलशास्त्रात अनेक शाखा विकसित होत आहेत. अनेक इच्छुक आणि विद्वान वैज्ञानिक आणि विद्यार्थी यांच्यासाठी हे क्षेत्र आता मोठय़ा प्रमाणात खुले झाले आहे. अनेक देश यामध्ये आघाडी घेऊ पाहत आहेत. अनेक शहरांतील आणि गावांतील महाविद्यालयांमध्ये अंतराळ प्रोब बनविण्याच्या स्पर्धा घेतल्या जातात. त्यातील खरेच उत्तम असलेल्या मॉडेल्सच्या उड्डाण चाचण्यादेखील केल्या जातात.

प्रत्येकाचं एक स्वप्न असतं ते म्हणजे स्वतःचे एक तरी लहानसे घर असावे, पण आता माणसाला अनेक ग्रहांवर घरे असावीत असे वाटू लागले आहे. यात स्पेस एक्स या कंपनीचे एलन मस्क यांनी फॉल्कन हेवी नावाचे एक रॉकेट नुकतेच अंतराळात पाठविले आहे आणि विशेष म्हणजे यात त्यांनी एक लहान कार पाठवली आहे. याशिवाय सूक्ष्म गुरुत्वाकर्षण असलेल्या एका विमानात सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामधील पहिली डान्स पार्टी साजरी झाली. अंतराळ विज्ञानातील तंत्रज्ञानाच्या सहाय्याने असे प्रयोग अजून केले जातील. अंतराळ पर्यटन हा एक उदयास आलेला नवीन व्यवसाय म्हणावा लागेल. यासाठी अंतराळात जाऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांना खास प्रशिक्षण घ्यावे लागेल. आज जर अंतराळात जायचे असेल तर अंतराळवीरांना पाच वर्षांच्या महाकठीण अशा प्रशिक्षणामधून जावे लागते. त्यासाठी विशिष्ट ज्ञान, विशिष्ट कौशल्ये आणि प्रवृत्तीची आवश्यकता असते. त्यामुळे अंतराळ पर्यटन जरी उदयास आलेले नवीन क्षेत्र म्हटले तरी त्यासाठी जाणाऱया पर्यटकाला प्रचंड कष्ट घ्यावे लागतील आणि अंतराळ सफरीमध्ये होणाऱया आणि पृथ्वीवर परत आल्यावर होणाऱया शारीरिक, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे आज तरी प्रचंड श्रीमंत आणि धाडसी लोकांपर्यंत हे मर्यादित आहे.

अंतराळ संशोधनाला वैज्ञानिक आणि अभ्यास यांचा भक्कम आयाम आहे, तसेच दुसऱ्या बाजूला त्याला व्यापारी आयामदेखील आहे. यातला समतोल, किंबहुना विज्ञान आणि संशोधन यांचे वर्चस्व राखणे आवश्यक आहे. अंतराळ मोहिमांना सावध होण्याची गरज आहे. याला एक महत्त्वाचे कारण म्हणजे या दोन्ही हेतूंमुळे तयार होणारा अंतराळातील कचरा!

मोहिमांची संख्या वेगाने वाढते आहे तसेच त्यामुळे निर्माण होणारा अंतराळातील कचरादेखील मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. अंतराळ मोहिमांमध्ये प्रचंड मोठय़ा प्रमाणात पैसा असतो. तिथून नेलेली लहानशी वस्तू परत आणणे हेदेखील तितकेच खर्चिक असते. त्यामुळे अनेकदा या वस्तू अंतराळात सोडल्या जातात. यात अगदी वाटाण्याएवढय़ा आकाराच्या वस्तूंपासून, कॉफीच्या कपापासून, स्थानकाचे तुटलेले भाग, बंद पडलेले किंवा मृत उपग्रह अशा अनेक वस्तू असतात. यांना डेब्रस म्हटले जाते. हा कचरा साधारण दोन्ही ध्रुवांपासून २५० किलोमीटर अंतरापासून सुरू होतो आणि सर्वात अधिक कचरा हा दोन्ही ध्रुवांपासून साधारण ८०० ते एक हजार किलोमीटर्स इतक्या अंतरावर सर्वात जास्त पसरलेला आहे.

याचा सर्वात मोठा धोका म्हणजे यातील लहानशा तुकडय़ाची धडक ही बॉम्बस्फोटापेक्षा मोठी असू शकते. त्यामुळे अगदी वाटण्याच्या आकाराचा तुकडादेखील अत्यंत घातक असू शकतो हे लक्षात घेतले पाहिजे. हा कचरा प्रचंड मोठय़ा प्रमाणात आहे आणि त्याच्या धोक्यांविषयी मोठी चिंता शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत. यासाठी हा कचरा नष्ट करण्याचे प्रकल्प आखले जात आहेत. यात दरवर्षी लहानमोठे पाच-सहा उपग्रह नष्ट केले पाहिजेत असे ठरविले जात आहे. शिवाय इतर सगळा लहानसहान कचरा एकत्र गोळा करण्याचे प्रयत्न करायला हवेत असे मान्य झाले आहे, परंतु ही दोन्ही कामे एखादे यान पाठविण्याइतकीच खर्चिक आहेत. अजून एक पर्याय शोधला आहे तो म्हणजे हा कचरा पृथ्वीच्या वातावरणात आणायचा म्हणजे तो आपोआपच पेट घेईल व जळून नष्ट होईल. अर्थातच हे शक्य असले तरी पुन्हा खर्चिक तर आहेच. शिवाय त्यामुळे पृथ्वीवरील प्रदूषण मोठय़ा प्रमाणात वाढेल आणि ते नियंत्रणामध्ये आणण्यासाठी पुन्हा नवीन प्रकल्प बांधावे लागतील. एकूण काय तर अंतराळाला गवसणी घालायचे स्वप्न असलेल्या मानवाचे हात दोन्ही बाजूंनी दगडाखाली आहेत. तरीही मानवाची जिज्ञासा त्याला स्वस्थ बसू देणार नाही. या सगळ्यावर कमी खर्चिक आणि कमीत कमी प्रदूषण आणि मानवहानी न होता अंतराळ संशोधन पुढे कसे नेता येईल याचे प्रयत्न चालूच राहतील. यामधून न भूतो न भविष्यति शोध लागतील आणि कदाचित आपण बहुग्रहीय प्राणी होऊ!

[email protected]
(लेखिका खगोलशास्त्र विषयातील तज्ञ आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या