आभाळमाया – परताऱ्यांच्या ग्रहमाला!

>> वैश्विक  

आपली  पृथ्वी म्हणजे आपला ग्रह. त्यामुळे आपल्या ग्रहमालेतले इतर ग्रहसुद्धा आपल्यासाठी परग्रहच. त्यांच्यावर जीवसृष्टी आहे का याचा शोध आता बऱ्यापैकी संपलाय. सूर्यमालेतील या ग्रहांपैकी केवळ मंगळावर थोडीफार शक्यता होती, पण तिथेही काही नाही. उगाचच ‘झऱ्या’सारखा फोटो किंवा ‘कालवे’ असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होतात. ‘ऑप्टिकल इल्युजन’ किंवा दृष्टिभ्रमापलीकडे त्यात काही तथ्य नसतं हे आता अनेकदा सिद्ध झालंय. बाकी, भयंकर उष्ण आणि थंड असलेला बुध, सल्फरचे ढग असलेला शुक्र, वायुरूप गुरू, शनी आणि अतिशीत युरेनस-नेपच्यूनवर सूक्ष्म जीव सापडले तरी ‘जीवसृष्टी’ वगैरे भारदस्त नाव देण्यासारखं काही नाही. काही चॅनलवरच्या कंठाळी बातम्या किंवा वृत्तपत्रातले भडक मथळे तेवढे त्यातून सजतात. त्यात वैज्ञानिक तथ्य नसतं.

मग जीवसृष्टी इतरत्र म्हणजे आपल्या सूर्यमालेबाहेर कुठे असेल का? शक्यता नाकारता येत नाही, पण ठोस पुराव्यावाचून विज्ञान त्याला दुजोराही देत नाही. आपल्या आकाशगंगा दीर्घिकेत (गॅलॅक्सी) सुमारे 200 अब्ज तारे असतील तर त्यात सूर्यासारखेही हजारो असतील आणि त्यातल्या काही हजार ताऱ्यांभोवती आपल्या सूर्याप्रमाणेच ग्रहमालासुद्धा असतील. त्यातला एखादा ग्रह सजीव वस्तीचा आणि कदाचित आपल्यापेक्षाही प्रगत असू शकतो. मात्र त्याचा ‘शोध’ लागणं आज तरी कठीण आहे. याचं कारण म्हणजे एक्स-रे, गॅमा-रे वगैरे दुर्बिणीद्वारे विश्वातील दूरस्थ वस्तूंचं अस्तित्व समजलं तरी त्यावरची संपूर्ण स्थिती लक्षात यायला वेळ लागतो. तशा आपल्याच गॅलॅक्सीत अनेक ग्रहमाला आपल्याला आढळल्या आहेत आणि अशा अब्जावधी गॅलॅक्सींचं विराट विश्व बनलं आहे.

आपणही याच विश्वाचा अविभाज्य भाग आहोत आणि ज्या अर्थी आपण अस्तित्वात आहोत तसंच ‘मॉडेल’ विश्वात इतर कोठे नसेल असं समजण्याचं कारण नाही. सध्या तरी आपण जी जीवसृष्टी जाणतो ती पृथ्वीवरचीच आहे. असे प्रगत ‘एलियन’ सापडलेत किंवा ते आपल्यावर ‘वॉच’ ठेवून आहेत अशा कल्पनांच्या अनेक कथा आणि प्रभावी चित्रपट आलेत, परंतु एखादी गोष्टी प्रभावी असली तरी सत्य असतेच असं नाही. त्यामुळे परग्रहमालेतलं ‘कोणीतरी’ इकडे येईल असा ‘फोबिया’ निर्माण करण्यात काही अर्थ नाही. शिवाय माणसाला (बहुधा स्वतःच्या स्वभावावरून) हे परग्रहमालावासी आपला नायनाट करायलाच येतील असं का वाटतं आणि तसलेच सिनेमे बॉलीवूडही का काढतं हे अगम्य आहे. त्यातलं एखादं ‘अस्तित्व’ (एन्टिटी) आपल्यापेक्षा ‘प्रगत, उदात्त, कनवाळूही  असू शकतं. त्यांना आपल्याला जाणून घ्यायला किंवा आपल्याशी मैत्री करायलाही आवडेल, परंतु या साऱ्या ‘जर-तर’च्या बाता. प्रत्यक्षात असं काही सापडलंय का, तर नाही. मग सापडलंय काय, तर असे परग्रहमालेतले ग्रह.

त्यांचा शोध मात्र आपण अवकाशात सोडलेल्या शक्तीशाली दुर्बिणींनी गेल्या पाव शतकात लावला आहे. 1 जून 2022 पर्यंत सुमारे 5059 परग्रहमालेतील ग्रह सापडलेले आहेत. आता त्यात भरच पडत जाणार. कारण अंतराळ संशोधन दिवसेंदिवस अधिक यशस्वीतेकडे जातंय.

आपल्या सूर्यपालिकेपलीकडे प्रचंड विश्व आहे. इतर ‘सूर्यां’ना ग्रहमाला आहेत याची कल्पना 100 वर्षांपूर्वी 1917 मध्येच आली होती. मात्र त्यावेळी शक्तीशाली दुर्बिणी नव्हत्या. आता त्या असल्याने अशा 3733 ग्रहमाला आपल्याला माहीत झाल्या असून त्यापैकी किमान 824 ताऱ्यांभोवती आपल्यासारख्या अनेक ग्रह असलेल्या ग्रहमाला आहेत. असा एखादा परसूर्यमालेतला ‘ग्रह’ सापडला की त्याची कठोर छाननी करावी लागते. काही वेळा मोठा अशनी किंवा धूमकेतू चकवा देऊ शकतात. उदा. 1988 मध्ये सापडलेल्या ग्रहावर 2003 मध्ये शिक्कामोर्तब झालं. ट्रान्झिट फोटोग्राफी, डॉप्लर स्पेक्ट्रोमेट्री याद्वारे परताऱ्याचे ग्रह निश्चित करता येतात. या ग्रहाचे 85 टक्के ‘टायडल लॉकिंग झोन’मधले आहेत.

अगदी आपल्या सूर्यासारख्याच वस्तुमानाच्या पाच ताऱ्यांपैकी एका ताऱ्याभोवती पृथ्वीसारखा सजीवाला अनुकूल असा ग्रह असू शकतो. आपल्या आकाशगंगेतील 200 अब्ज ताऱ्यांभोवती 11 अब्ज ‘पृथ्वी’सदृश ग्रह असू शकतात. मात्र त्यावर जीवसृष्टी असण्यासाठीची लक्षणं असतीलच असं नाही. अर्थात, आपण आपल्यासारख्या जीवसृष्टीचं परिमाण लावून विचार करतो. ‘वेगळी’ जीवसृष्टी असेल तर ठाऊक नाही. आतापर्यंत सापडलेला परताऱ्याभोवती फिरणारा सर्वात मोठा ग्रह गुरूच्या 30 पट आहे आणि गुरू आपल्या पृथ्वीच्या 11 पट आहे. यावरून तो महाकाय ग्रह आणि त्याला गरगरत ठेवणारा तेजस्वी तारा याची केवळ कल्पनाच करता येते. वसाहतयोग्य किंवा ‘हॅबिटेब झोन’मध्ये पृथ्वीसारखा ग्रह येतो त्याला ‘गोल्डीलॉक्स झोन’ असंही म्हणतात. काही ‘रोग जायन्ट’ ग्रह कोणत्याही ताऱ्याभोवती फिरत नाहीत हे भटके उटपटांग केवळ गॅस जायन्ट असतात. हे लक्षात घेता आपल्या अस्तित्वाचं अमूल्य स्वरूप लक्षात यायला हवं, पण फुकट मिळाल्यामुळे पृथ्वीवरच्या जीवसृष्टीची माणसाला फिकीर नाही असंच सध्या तरी दिसतं. इतर कुठे छान जीवसृष्टी असेल तर शोधण्यासाठी तरी स्वतःला टिकवूया.

[email protected]