धूमकेतूंचा ध्यास!

गेल्या आठवडय़ात आपण, हिंदुस्थानी वंशाची अवकाशवीर कल्पना चावला हिच्या अवकाश – पराक्रमाविषयी थोडक्यात माहिती घेतली. दुर्दैवाने कल्पना अल्पायुषी ठरली. कोलंबिया यानात अवकाशातच तिचा अंत ओढवला. अंतराळात जाणं तसं धाडसाचंच. एकदा का पृथ्वीच्या कक्षेबाहेर गेलं की रिमोट कंट्रोलने पृथ्वीशी संपर्क राहातो. अर्थात यानातील अचूक कार्य करणारी आणि पृथ्वीवरून दिलेली आज्ञा पाळण्याची शिकवण दिलेली यंत्रणा खूप तावून – सुलाखूनच अंतराळ पाठवणीसाठी तयार केलेली असते. त्यातही यानात माणसं असतील तर जबाबदारी कैक पटींनी वाढते.

इतकी काटेकोर काळजी घेऊनसुद्धा कधीतरी काहीतरी गफलत होतेच. कधी मानवी चुका किवा आकस्मिक अपघात यामुळे अनेक अंतराळवीरांना प्राण गमवावा लागला आहे. रशियाच्या सोयूझ-११ मधील तीन अंतराळवीर पृथ्वीवर परतले होते तो क्षण जगाला हादरवणारा होता.

असं असलं तरी माणसाची साहसी वृत्ती स्वस्थ बसत नाही. विज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना तर नित्य नवा ध्यास खुणावत असतो. खगोलाच्या अभ्यासातून विराट विश्वात काय दडलंय याचा दुर्बिणी आणि नंतर अवकाशयान यांच्या मदतीने मागोवा घेण्याचा प्रयत्न १६१० पासून गतिमान झाला. गॅलिलिओच्या दुर्बिणीने ही क्रांती घडवली.

अवकाशाच्या या अभ्यासात महिलांचाही सक्रिय सहभाग होता. आपल्याकडे अवकाशातील सप्तर्षी तारकासमूहात वसिष्ठांबरोबर त्यांची पत्नी अरुंधतीचाही समावेश आहे. थेट खगोलीय संशोधन, प्राचीन काळी किती महिलांनी केलं याचा तपशील उपलब्ध नसला तरी स्त्र्ायांचाही सहभाग असणार असा अंदाज गार्गी, मैत्रेयीसारख्या विद्वान महिलांच्या कर्तृत्वावरून बांधता येतो. खगोलविद् भास्कराचार्य (दुसरे) यांनी त्यांची कन्या लीलावती हिला गणिताचं ज्ञान दिलं होतं. कदाचित तिने खगोल अभ्यासही केला असेल.

आधुनिक काळात यांत्रिक क्रांती पाश्चात्य देशात वेगाने झाली. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात यंत्राने स्थान मिळवलं. दुर्बिण किंवा टेलिस्कोपचा वापर सुरू झाल्यावर अवकाशाचा वेध घेण्याचा प्रयत्न अनेक महिलांनीही केला. त्यापैकीच एक कॅरोलिन हर्शेल. तिला धूमकेतूंचा धांडोळा घेण्याचा ध्यास होता. मदतीला दुर्बिण आणि रात्र रात्र जागून अवकाशाचा वेध घेण्यासाठी लागणारे अथक परिश्रम करण्याची तयारी यातून कॅरोलिनने अनेक धूमकेतू शोधले.

युरेनसचा शोध लावणाऱ्या विल्यम हर्शेलची धाकटी बहीण असलेल्या कॅरोलिनचा काळ १७५० ते १८४८ असा आहे. तिला ९८ वर्षांचं प्रदीर्घ जीवन लाभलं आणि तिने ते सत्कारणी लावलं. तिच्या नावे हर्शेल – रिगोलेट नावाचा धूमकेतू आहे. कॅरोलिन हर्शेलचं वैशिष्टय़ म्हणजे लंडनच्या रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचं सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली महिला! १८२८ मध्ये तिला हे पारितोषिक मिळालं आणि १८३५ मध्ये ती मेरी सॉमरविलसह या संस्थेची सन्माननीय सदस्य झाली. १८३८ मध्ये रॉयल आयरिश ऍकॅडमीनेही कॅरोलिनला सदस्यत्वाचा बहुमान दिला. तिच्या ९६व्या वाढदिवशी प्रशियाच्या सम्राटाने तिचा सुवर्णपदक देऊन (१८४६ मध्ये) गौरव केला.

१७५० मध्ये जर्मनीतील हॅनोव्हर येथे जन्मलेली कॅरोलिन, भावंडांमधली आठव्या क्रमांकाची मुलगी होती. बालपणी आजाराने एक डोळा गमावलेल्या अवघ्या चार फूट तीन इंच उंचीच्या या मुलीने खगोल संशोधनातून गगनाला गवसणी घातली. १७८३ मध्ये तिने मेसिअरच्या यादीत नसलेला एक तेजोमेघ (नेबुला) शोधून काढला. १७८६ ते ९७ या काळात कॅरोलिनने तब्बल आठ धूमकेतू शोधले! १९०२ मध्ये रॉयल सोसायटीने तिचा कॅटेलॉग प्रसिद्ध केला. आजही या ‘न्यू जनरल कॅटेलॉग’ मधल्या अवकाशस्थ वस्तू ‘एजीसी’ क्रमांकाने ओळखल्या जातात. यापुढच्या काही लेखांमधून अंतराळ कर्तृत्व गाजविलेल्या महिलांविषयी माहिती घेऊया.