
>> सीए संतोष घारे
पंधरा वर्षांपूर्वी म्हणजे सप्टेंबर 2008 मध्ये अमेरिकेतील लेहमन ब्रदर्स या वित्तसंस्थेची दिवाळखोरी जाहीर झाली आणि जागतिक आर्थिक मंदीचा प्रत्यक्ष घंटानाद झाला. या आर्थिक मंदीचे तडाखे पुढील कितीतरी वर्षे जाणवत राहिले. त्यानंतरच्या काळात बँकिंग प्रणालीत आणि व्यवस्थापनात, आर्थिक ध्येयधोरणांमध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या गेल्या, परंतु त्यामध्ये आजही किती उणिवा आहेत, हे सिलिकॉन व्हॅली बँकेच्या दिवाळखोरीने दाखवून दिले आहे. कारण एसव्हीबी ही अमेरिकेतील बुडालेली 16 वी बँक आहे, हे लक्षात घ्यावे लागेल.
अमेरिकेची मोठी बँक सिलिकॉन व्हॅली बँक (एसव्हीबी) दिवाळखोरीत निघाल्याने बँकिंग क्षेत्रावरच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. दुसरीकडे अमेरिकी अर्थव्यवस्था सुरक्षित राहण्यासाठी आणि बँकेवरचा विश्वास ढळू नये यासाठी बायडेन प्रशासनाकडून उपाय केले जात आहेत. मात्र यानिमित्ताने पुन्हा एकदा सजगतेचे महत्त्व सिद्ध झाले आहे. बँकेच्या ग्राहकांनी चौकस राहण्याबरोबर बँकेच्या हालचालींवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.
एका आठवडय़ातच काहीही होऊ शकते हे 11-12 मार्चच्या आठवडय़ात दिसून आले. कारण गेल्या आठवडय़ात सिलिकॉन व्हॅली बँकेच्या (एसव्हीबी) बातम्या येऊ लागल्या, तेव्हा काहीतरी बिघडतंय असे संकेत मिळू लागले. नेमके जे व्हायला नको, तेच झाले. स्टार्टअप कंपन्यांना अर्थपुरवठा करणारी सिलिकॉन व्हॅली बँक डबघाईला आली आणि खातेधारकांचे धाबे दणाणले. एसव्हीबी ही स्टार्टअपसाठी एक लोकप्रिय बँक होती अणि प्रामुख्याने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणि मागील काही काळात या बँकेने स्टार्टअपमध्ये मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केली. हिंदुस्थानचा विचार केल्यास ‘वन-97’ ही पेटीएमची जुनी आवृत्ती होती. या स्टार्टअपला एसव्हीबीने अर्थसाह्य केले होते. वास्तविक एसव्हीबीला या उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीने बराच फायदा मिळाला. अर्थात जिंकणाऱ्या उपक्रमांवर सट्टा लावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बँकेचा शेवट काही चुकीच्या पावलांमुळे जवळ येईल याची भनक कोणाला लागली नाही. एसव्हीबीचा इतिहास आणि त्याचे कार्यक्षेत्र पाहिले तर या बँकेचे पतन ही नक्कीच मोठी घटना आहे. व्यावसायिक पातळीवर बँक चांगली कामगिरी करत होती. काळजीचे कोणतेही कारण नव्हते. तरीही समोर येणाऱ्या आव्हानांमुळे आणि समस्यांमुळे बँकेची पडझड झाली. तंत्रज्ञान क्षेत्रात प्रभावहीन कामगिरी करणाऱ्या कंपन्यांना केलेले फंडिंग आणि परताव्यावर दीर्घकाळापर्यंत केरोनाचा राहिलेला प्रभाव ही एक महत्त्वाची समस्या होती. यापेक्षाही मोठा धक्का होता आणि तो म्हणजे केंद्रीय बँकेने केलेली व्याज दरवाढ. हा एक महागाई नियंत्रित करण्यासाठी केलेला प्रयत्न होता.
एसव्हीबीने बाँडमध्ये पैसे गुंतवले होते आणि बाँड यील्ड तसेच व्याजदर यांचा एकमेकांशी संबंध अगदी विरुद्ध रूपातून आहे. म्हणून ज्याक्षणी केंद्रीय बँकेने व्याजदर वाढविण्यास सुरुवात केली, तेव्हा एसव्हीबी बँकेचे बाँडमधील उत्पन्न कमी होऊ लागले. विशेष म्हणजे ग्राहकांना जादा व्याजदरावर नवीन बाँड मिळू लागले आणि त्यात गुंतवणूक करण्यासाठी लोक पैसे काढू लागले, तेव्हा बँकेची आर्थिक पत ढासळू लागली. हा एक वाईट काळ होता आणि बँकेतून खातेदार पैसे काढून घेऊ लागले. दुसरीकडे त्यांना बँकेच्या आर्थिक स्थितीबाबतच्या बातम्याही ऐकावयास मिळत होत्या. साधारणपणे जी बँक सुरक्षित बाँडमध्ये गुंतवणूक करते, त्यांना आर्थिक समस्येशी सामना करावा लागत नाही. विशेष म्हणजे परिपक्वतेच्या कालावधीपर्यंत बाँड असतील तर बँकेला चिंताच नसते, पण बँकेच्या खातेधारकांकडून रोकड काढण्यास सुरुवात झाली, तेव्हा कमी व्याजदरात बाँड विकण्याची वेळ एसव्हीबीवर आली आणि त्याच्या दरावरही परिणाम झाला.
यादरम्यान, एसव्हीबीची मूळ कंपनी एसव्हीबी फायनान्शियल समूहाने एक घोषणा केली. आपल्या पोर्टफोलिओतून 21 अब्ज डॉलर सिक्युरिटीची विक्री केली जात असून आर्थिक बळ वाढविण्यासाठी 2.25 अब्ज डॉलरचे शेअरची विक्री होणार असल्याचे जाहीर केले, पण अनेक स्टार्टअप्स या बँकेचे ग्राहक असल्याने एसव्हीबीला आणखी एका वेगळय़ाच समस्येचा सामना करावा लागला. अनेक कंपन्यांकडील उद्योग भांडवल (व्हेंचर कॅपिटल) आणि प्रायव्हेट इक्विटीच्या माध्यमातून येणारा भांडवलाचा प्रवाह मर्यादित राहिल्याने त्या बुडू लागल्या होत्या. स्टार्टअपला कोरोनाचे दुष्परिणाम सहन करावे लागत होते. त्यांना भांडवल देणे ‘घाटे का सौदा’ ठरला. परिणामी त्यांच्याकडे केवळ राखीव भांडवल शिल्लक राहिले. अखेर त्यांना नाइलाजाने बँकेतून रोख काढावी लागली.
सिलिकॉन व्हॅली बँकेने दिलेल्या एका जाहिरातीनुसार, डिसेंबर 2022 पर्यंत त्यांच्याकडे एकूण मालमत्तेच्या रूपातून 209 अब्ज डॉलर आणि एकूण जमा निधीच्या रूपातून 175.4 अब्ज डॉलरचे भांडवल होते, पण एखादी बँक आर्थिक अडचणीत आल्यास त्या बँकेतून पैसे काढण्यासाठी निर्बंध घातले जातात. यानुसार एसव्ही बँकेतूनदेखील ग्राहकांना कमाल अडीच लाख डॉलर काढण्याची मर्यादा ठेवण्यात आली. ही मोठी रक्कम नाही. कारण स्टार्टअपसारखे ग्राहक असतील तर त्यांच्यासाठी ही रक्कम कमीच आहे. त्यांना कोणत्या ना कोणत्या कंपनीत पैसे गुंतविण्यासाठी किंवा भागीदारी खरेदी करण्यासाठी पैशांची गरज भासत असते. आता जेव्हा बँकेसाठी स्थिती बिकट झाली, तेव्हा कॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल प्रोटेक्शन ऍण्ड इनोव्हेशनने या बँकेला टाळे ठोकले. तसेच फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पला प्रशासक म्हणून जाहीर करण्यात आले.
‘एफडीआयसी’ने डिपॉझिट इन्शुरन्स नॅशनल बँक ऑफ सांटा क्लेरा नावाची बँक स्थापना केली आणि त्यात एसव्हीबीच्या ठेवीदारांचे पैसे वळविण्यात आले. सोमवारी सकाळपर्यंत ठेवीदारांना त्याची माहितीदेखील कळली. एसव्हीबी बँकेच्या शाखा देखरेखीखाली खुल्या झाल्या. 11 मार्च रोजी एक नियम जारी करण्यात आला आणि त्यानुसार अडीच लाख डॉलरपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण असल्याचे सांगितले गेले. त्यापेक्षा अधिक रक्कम सुरक्षित राहू शकत नाही किंवा ती रक्कम बुडूदेखील शकते, असे गृहित धरण्यात आले. वास्तविक बँक अपयशी ठरण्याचे हे एक प्रकरण आहे. कारण एसव्हीबीच्या कामकाजाची पद्धत जोखमीची होती. अर्थात बँकेच्या कारभारावर लक्ष असायचे, परंतु ग्राहकांनादेखील जोखमीबाबत कल्पना देणे गरजेचे होते. अशा प्रकारच्या बँकेत पैसे ठेवणे जोखमीचे राहू शकते, हे सांगावयास हवे होते. हिंदुस्थानात अशा प्रकारे बँक बुडल्याचे उदाहरण नाही, पण अशी स्थिती उद्भवल्यास हिंदुस्थानी बँकांची नियंत्रक म्हणजे आरबीआय आणि सरकार ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी पुढे येते. अर्थात अलीकडच्या काळात येस बँक आणि पीएमसी बँक दिवाळखोरीत निघाल्याचे प्रकरण समोर आले आहे.
एसव्हीबीसारख्या विशेष प्रकारच्या बँकांशी जोडलेल्या स्टार्टअपसाठी ‘एसव्ही’ बँक दिवाळखोरी हा एक धडा आहे. अशा बँकांशी जोडणे जोखमीचे ठरू शकते आणि व्यवसाय आणि उद्योग कोसळू शकतो, हे यानिमित्ताने कळून चुकले. बँकेत पैसा ठेवणाऱ्या मंडळींसाठीदेखील हा एक धडा आहे. जोखमीच्या वाटेवर असणाऱ्या बँकेवर अवलंबून राहण्याऐवजी आपल्याकडील पैसा विविध बँकांत ठेवून जोखीम कमी करायला हवी. तसेच सहजासहजी कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या बँकांवर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापेक्षा ग्राहकांनी बँकेच्या व्यवहारावर लक्ष ठेवायला हवे. तसेच ज्या बँकेत पैसा ठेवला आहे, ती बँक सुरक्षित आहे की नाही, हेदेखील पहावे.
पंधरा वर्षांपूर्वी म्हणजे सप्टेंबर 2008 मध्ये अमेरिकेतील लेहमन ब्रदर्स या वित्तसंस्थेची दिवाळखोरी जाहीर झाली आणि जागतिक आर्थिक मंदीचा प्रत्यक्ष घंटानाद झाला. या आर्थिक मंदीचे तडाखे पुढील कितीतरी वर्षे जाणवत राहिले. त्यानंतरच्या काळात बँकिंग प्रणालीत आणि व्यवस्थापनात, आर्थिक ध्येयधोरणांमध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या गेल्या, परंतु त्यामध्ये आजही किती उणिवा आहेत, हे सिलिकॉन व्हॅली बँकेच्या दिवाळखोरीने दाखवून दिले आहे.