
>> सनत्कुमार कोल्हटकर, [email protected]
दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या ब्रिक्सच्या दोन कार्यक्रमांना अनुपस्थित राहिल्यानंतर शी जिनपिंग यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. त्या सुमारास चीनची शांग क्लास पाणबुडी (टाईप 0-9-3) ही तैवान आणि यलो सी यामधील सामुद्री क्षेत्रातील आखातात बुडाल्याच्या बातम्या जगातील माध्यमात चर्चिल्या गेल्या होत्या. त्यानंतर तैवानकडून अशी कोणती पाणबुडी बुडाली असल्याच्या घटनेचे खंडन केले होते. यलो सीमधील उथळ प्रदेशात पाणबुडीचा अपघात झाल्याची चर्चा होती, पण चीनकडून कोणतेही अधिकृत वृत्त दिलेले नाही. ही पाणबुडी बुडण्यामागे घातपात होता काय हेही गूढच आहे.
भारताचा त्रासदायक शेजारी असणाऱ्या चीनमध्ये सध्या एखाद्या हॉलीवूडमधील हिचकॉक चित्रपट कथेत शोभेल अशा रहस्यमय आणि गूढ घटनांची जंत्री सुरू आहे असे म्हणता येते. आधीच चीनचा जागतिक लौकिक आहे अपारदर्शक असा चीनमधील कारभार.
गेल्या काही महिन्यांपासून चीनचे सध्याचे सर्वेसर्वा शी जीनपिंग यांच्या विश्वासातील अनेक अधिकारी नुसते त्यांच्या पदावरून दूरच केले गेलेले नाहीत, तर त्यांचा ठावठिकाणाही कोणाला माहीत नाही. प्रथम चीनचे परराष्ट्रमंत्री शिन गँग हे चीनच्या परराष्ट्रमंत्रीपदावरून नुसते दूर केले गेले नाहीत, तर ते जून महिन्यानंतर जनतेसमोरच आलेले नाहीत. त्यांना त्यांच्या परराष्ट्रमंत्रीपदावरून हटविण्यामागच्या अनेक सुरस कथा जागतिक माध्यमात चर्चिल्या गेल्या होत्या. शिन गँग यांच्या जागी चीनचे जुने परराष्ट्रमंत्री वांग यी यांचीच पुनर्नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर झाले होते.
त्यानंतर चीनमधील अंतराळ विभाग आणि रॉकेट फोर्सचे प्रमुख यांनाही त्यांच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले होते. नुकतेच चीनचे संरक्षणमंत्री ली शांग फू यांनाही त्यांच्या मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यांच्या व्हिएतनाम आणि इतर देशांबरोबर ठरलेल्या मागील महिन्यातील बैठकांना ते उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्याबद्दल चीनच्या सरकारच्या अधिकृत प्रवक्त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्या प्रवक्त्यांनी ली शांग फू यांच्याबद्दल त्यांच्याकडे काहीही माहिती नसल्याचे आश्चर्यजनक उत्तर दिले होते. ली शांग फू हे संरक्षण मंत्रीपदावर आरूढ होण्यापूर्वी तेथील संरक्षण खरेदी विभागाचे प्रमुख होते. त्यांच्या त्या कार्यकाळात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यांची अंतर्गत चौकशी सुरू असल्याने त्यांना त्यांच्या पदावरून दूर केले गेले असल्याचे सांगितले जाते, पण त्यांच्या संरक्षण मंत्रीपदावर अजूनही कोणाची नियुक्ती झालेली नाही.
अमेरिकेचे जपानमधील सध्याचे राजदूत एरी इमानुएल यांनी ली शांग फू यांच्या ठावठिकाण्याबद्दल प्रथम ट्विटरवर टिपणी केली होती, ज्यामुळे ही गोष्ट जगासमोर आली. शी जिनपिंग आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षामध्ये बेबनाव सुरू असल्याचा अंदाज अनेक जागतिक आंतरराष्ट्रीय अभ्यासकांकडून व्यक्त केला जातो आहे.
गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या ब्रिक्सच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शी जिनपिंग हे दक्षिण आफ्रिकेमध्ये पोहोचले होते. पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते, पण त्यानंतरच्या दोन कार्यक्रमांना ते अनुपस्थित राहिल्याचे दिसून आले होते. तेथील दोन कार्यक्रमांना अनुपस्थित राहिल्यानंतर शी जिनपिंग यांच्या चेहऱ्यावर तणाव आणि नाराजीचे न लपलेले भाव स्पष्ट दिसत होते. त्या सुमारास चीनची शांग क्लास पाणबुडी (टाईप 0-9-3) ही तैवान आणि यलो सी यामधील सामुद्री क्षेत्रातील आखातात बुडाल्याच्या बातम्या जगातील माध्यमात चर्चिल्या गेल्या होत्या. या अणू ऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीवरील सर्व कर्मचारी मृत्युमुखी पडले असल्याचे सांगितले गेले. ही पाणबुडी समुद्रात बुडण्याचा मुहूर्तही लक्षवेधी होता. या घटनेमुळेच शी जिनपिंग ब्रिक्सच्या दोन कार्यक्रमांना दक्षिण आफ्रिकेत असूनसुद्धा उपस्थित राहिले नाहीत असे बोलले गेले. त्यानंतर तैवानकडून अशी कोणती पाणबुडी बुडाली असल्याच्या घटनेचे खंडन केले गेले होते. यलो सीमधील उथळ प्रदेशात पाणबुडीचा तेथील तळाला धडकल्याने अपघात झाल्याची चर्चा होती, पण चीनकडून याबद्दल कोणतेही अधिकृत वृत्त अजूनपर्यंत दिले गेलेले नाही.
आता ही पाणबुडी बुडण्यामागे घातपात किंवा इतर कोणत्या देशाचा हात होता काय हेही गूढच आहे. पाणबुडी घटनेबद्दल चीनकडून गुप्तता पाळली गेली तरी त्या पाणबुडीवर तैनात असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा या कर्मचाऱ्यांशी संपर्क होत नसल्याची तक्रार चीनमधील समाजमाध्यमांवर केली होती. त्यामुळे अशी काही घटना घडली असल्याबद्दल शंका वाटावी अशी परिस्थिती निर्माण झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
तैवानजवळील सामुद्री आखातात उपस्थित असणाऱ्या अमेरिकेच्या नौदलाच्या जहाजांकडे समुद्रामध्ये पाणबुडीचा अपघात झाला असल्यास जी कंपने तेथील समुद्रीक्षेत्रात पसरतात त्यावरून या गोष्टीबद्दल खात्रीशीर तंत्रज्ञान उपलब्ध असल्याचे सांगतात. त्यांच्याकडूनही असा पाणबुडीचा अपघात झाला असण्याच्या शक्यतेला होकार देण्यात आला होता.
या पाणबुडीच्या अपघाताच्या बातमीचे खंडन करावयाचे असेल तर चीनच्या राजवटीकडे एकच पर्याय उपलब्ध आहे तो म्हणजे ही पाणबुडी उत्तम स्थितीत आहे हे दाखविण्यासाठी या पाणबुडीचे माध्यमांना दर्शन देणे. या पाणबुडीवर तैनात असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना लोकांसमोर घेऊन येणे. अर्थात, चिनी राजवटीकडून अशी कोणती अपेक्षा करण्यात अर्थ नाही हे यापूर्वी घडलेल्या अशाच अनेक घटनांमधून समोर आलेले आहे.
आता या घटनेनंतर अनेक प्रश्नांची मालिका उपस्थित होते आहे. सर्वप्रथम प्रश्न उपस्थित होतो तो चीनमध्ये बनविल्या गेलेल्या पाणबुडीचे आरेखन आणि दोषपूर्ण संरचना. चीनमध्ये बहुतांश संरक्षण साहित्य हे अमेरिकन अथवा रशियन बनावटीच्या संरक्षण साहित्याची नक्कल असल्याचे सांगतात. या दाव्याला बळ देणारी दुसरी घटना म्हणजे म्यानमार या भारताच्या शेजारी असणाऱ्या देशामधील जूनटा यांच्या नेतृत्वाखालील लष्करी राजवटीने चीनकडून काही काळापूर्वी घेतलेली ‘जे एफ – 17’ ही लढाऊ विमाने. या विमानांच्या गुणवत्तेबद्दल जूनटा राजवटीने जाहीरपणे तक्रार केलेली आहे. या विमानांची विक्रीपश्चात सेवा आणि सुट्टय़ा भागांची उपलब्धता याबद्दल म्यानमारच्या राजवटीने जोरदार तक्रार केलेली आहे. गमतीचा भाग म्हणजे या विमानांच्या विक्रीपश्चात सेवा आणि सुट्टय़ा भागांच्या पुरवठय़ाची जबाबदारी पाकिस्तानकडे देण्यात आली असल्याचे म्यानमारच्या राजवटीने सांगितलेले आहे. त्यामुळे चिनी बनावटीच्या लढाऊ विमानांच्या गुणवत्तेबद्दल शंका व्यक्त करण्यास वाव आहे हे निश्चित.