>> डॉ. मनोहर देसाई
कठपुतली या कला प्रकारातील विविधता हिंदुस्थानच्या विविध भागांत पाहायला मिळते. कथा सादर करण्याची ही आगळी कला त्यातील सादरीकरणामुळे आजही तितकीच लोकप्रिय ठरली आहे.
मनोरंजनासाठी आज आपल्याकडे अनेक साधने आहेत. हल्ली लहान मुलांना टोमणे मारत, सतत टीव्ही आणि मोबाइल किंवा कॉम्प्युटरवर तुम्ही गुंतून राहता. त्यापेक्षा काहीतरी आणखी वेगळे पहा, असे सांगणारे पालक हातातील मोबाइलवर मेसेज पुपुसरकवत उपदेश करताना दिसतात. आपल्या देशात मनोरंजनासाठी अनेक माध्यमे उपयोगात आणली गेली. त्यापैकीच एक म्हणजे कठपुतलीचा खेळ. पूर्वी राजेमहाराजे यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या मनोरंजनासाठी हा खेळ कलाकार मंडळी सादर करत असत. काही राजांकडून युद्धभूमीवर सैनिकांच्या मनोरंजनासाठीसुद्धा या खेळाचा वापर केला जात असे. या खेळाच्या माध्यमातून कलाकार सैनिकांमध्ये स्फुरण देत असत. राजाचा हेतू साध्य करण्यासाठी या कलाकारांच्या माध्यमातून सैनिकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन व युद्धभूमीवर शौर्य गाजवण्यासाठी प्रेरणा देणाऱया कथा सादर केल्या जात असत.
उपजीविकेसाठी हे कलाकार गावोगावी फिरून गावच्या जत्रांमध्ये सुद्धा कठपुतलीचे खेळ सादर करत असत व आजही काही जत्रांमध्ये हे खेळ सध्याच्या नव्या कथा आणि गाण्यांवर सादर केले जात आहेत. एखादी कथा सादर करण्यासाठी त्यातील सर्व पात्रे ही बाहुल्यांच्या स्वरूपात मंचावर असतात. या स्थिर बाहुल्यांना हलते करण्यासाठी त्यांच्या विविध अवयवांना दोरे बांधून ते दोरे वरखाली करून या अवयवांची हालचाल होण्याचा भास निर्माण केला जातो. समोरून पाहणाऱयांना या बाहुल्या त्यामुळे जिवंत वाटतात. यात कथा सादर करणारा कथा सांगत असतो व त्याला सोबत करण्यासाठी काही वाद्येसुद्धा वाजवली जातात. कथेत एखादे गाणे असेल तर ते गाणे गात असताना त्यातील शब्दांच्या अर्थाप्रमाणे मंचावरील भावल्या हालचाल व हावभाव करताना दिसतात. सध्या प्रचलित असणारी नवनवीन गाणी ही या कलाकारांनी स्वीकारली असून नव्या प्रेक्षकांसाठी त्या गाण्यांवर कला सादर करताना ते काळाबरोबर बदलत असल्याची जाणीव करून देतात. नवा प्रेक्षक त्यामुळे या मनोरंजनाचा सहज स्वीकार करतो.
राजस्थानमध्ये कठपुतलीसाठी लाकडाचा वापर केलेला दिसतो. लाकडात घडवलेले चेहरे व शरीराचा काही भाग तर आतील शरीराच्या भागासाठी काठय़ांवर कापड गुंडाळूनसुद्धा अवयवांचा भास निर्माण केला जातो. वर रंगीबेरंगी कपडे शिवून सजवतात. अवयवांची हालचाल होण्यासाठी दोन्ही हात, डोके व पाय तसेच काही पात्रांची कंबर हलवण्यासाठी तेथेसुद्धा दोरे लावून ते वर काठीला बांधून त्या काठीच्या माध्यमातून बाहुल्यांची हालचाल घडवणारा कलाकार त्याची भूमिका बजावत असतो. हा खेळ सादर करण्याकरिता तयार केलेल्या मंचावर खालील बाजूस एक छोटी पडदा पट्टी, तर दोन्ही बाजू झाकण्यासाठी विंग आणि वर बाहुल्यांची हालचाल करण्यासाठी बसलेला कलाकार प्रेक्षकांना दिसू नये याकरिता लावलेला वरच्या बाजूचा पडदा. समोरून चौकट पाहताना प्रेक्षकांना फक्त या बाहुल्याच दिसतात, तर पार्श्वभागामध्ये गडद रंग असल्यास या बाहुल्यांचे दोरेसुद्धा दिसत नाहीत. कठपुतलीचे प्रमुख चार प्रकार पाहायला मिळतात.
कळसूत्री बाहुल्या (स्ट्रिंग पपेट)
वर विस्तृतपणे नमूद केलेला हा प्रकार. यात दोऱयाच्या साहाय्याने बाहुल्यांची हालचाल घडवली जाते. हिंदुस्थानात राजस्थान, कर्नाटक, तामीळनाडू, महाराष्ट्र आणि ओडिशा या राज्यांमध्ये ही कला प्रामुख्याने जोपासली गेल्याचे दिसते. महाराष्ट्रामध्ये या प्रकाराला ‘कळसूत्री बाहुल्या’ असे संबोधले जाते.
चामडय़ाच्या बाहुल्या (शॅडो पपेट)
जनावरांच्या चामडय़ाच्या पातळ थराला वाळवून त्याचा कडक कागदासारखा उपयोग या प्रकारात केला जातो. आवश्यक असणारी पात्रे ही या चामडय़ावर रेखाटून व रंगवून तो आकार कापला जातो. हे रंग पारदर्शी असतात. त्याला खालील बाजूने काडी चिकटवून (मोर्चामध्ये पाटय़ा लावलेल्या काठय़ांप्रमाणे) ही पात्रे हलवण्यासाठी उपयोग केला जातो. दिव्याचा प्रकाशझोत या रंगीत आकृतीवर टाकून त्याची रंगीत सावली पुढे पडद्यावर घेतली जाते व यातून कथा सांगितली जाते. हिंदुस्थानात आंध्र प्रदेश, ओडिशा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामीळनाडू या राज्यांमध्ये ही कला जोपासलेली दिसते.
हस्त कठपुतली (ग्लोव्ह पपेट)
या प्रकारात हाताच्या पंजावर एखाद्या पात्रासाठी आवश्यक असणारा मुखवटा व त्याचे कपडे असा एकत्र साज हँडग्लोव्हज्च्या रूपात तयार करून तो हातावर परिधान करून हातातील बोटांच्या व हाताच्या हालचालीद्वारे त्या पात्राला जिवंत असल्याचे भासवले जाते. हिंदुस्थानात तामीळनाडू, केरळ, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या भागात ही कला जोपासलेली दिसते.
हस्त व यष्टी कठपुतली (रॉड पपेट)
हस्त कठपुतलीप्रमाणेच या प्रकारातसुद्धा हातावर एक हॅन्ड ग्लोव्हज्च्या रूपात पात्र तयार करून त्या पात्राची हालचाल करण्यासाठी त्या हाताच्या बरोबरीनेच त्यातील काही अवयवांना पातळ काठीच्या सहाय्याने बांधून ती काठी दुसऱया हाताने हलवत पात्राच्या विविध अवयवांची हालचाल दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. हिंदुस्थानमध्ये पश्चिम बंगाल, ओडिशा, तामीळनाडू आणि त्याचप्रमाणे हिंदुस्थानबाहेर बांगलादेशमध्येसुद्धा हा प्रकार जोपासला जात असल्याचे दिसते.
एकूणच कठपुतली या कला प्रकारातील विविधता आपल्याला हिंदुस्थानच्या विविध भागांत पाहायला मिळते. एखाद्या कथेमध्ये किंवा रोजच्या संवादामध्ये “मला स्वतंत्रपणे जगू दे. मला तू तुझ्या हातातली बाहुली समजू नकोस. माझ्या सर्व हालचाली या तुझ्याकडून नियंत्रित केल्यासारख्या वाटतात. मी काही तुझ्या हातातली कळसूत्री बाहुली नाही’’ अशा प्रकारचा संवाद कानावर पडतो आणि कळसूत्री बाहुली हा प्रकार आपल्या संस्कृतीमध्ये फार जुना असल्याचे दिसते. फार प्राचीन काळापासून हिंदुस्थानमध्ये ही कला जोपासली गेली आहे व आजही यातील कलाकार विविध मंचांवर ही कला सादर करून तिला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या हाताला दोरा बांधला जावा व तो हात वर ओढला जाऊन आपल्या कपाळावर आपल्या हाताचा पंजा टेकावा आणि कथा सांगणाऱयाने सहजच शब्द उच्चारावेत… या कलाकारांना आमचा सलाम!