>> डॉ. मुकुंद कुळे
चाळीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेलं आणि गाजलेलं ‘छिन्न’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे आजही ते तेवढंच अंगावर येतं. कारण वामन तावडे यांच्या ‘छिन्न’चं वेगळेपण हेच आहे की, ते केवळ माणसांची गोष्ट सांगत नाही, तर ते लैंगिकतेसारख्या मानवी भावनेची गोष्ट सांगत आदिम आसक्तीचं दर्शन घडवतं.
एकूणच जगाच्या पाठीवर नातं ही सगळ्यात गुंतागुंतीची गोष्ट आहे. कुठल्याही दोन व्यक्ती एकत्र आल्या की, समाज लगेच त्यांच्यातील नात्याचा शोध घ्यायला सुरुवात करतो. मग त्या व्यक्ती समलिंगी असोत वा भिन्नलिंगी. जणू काही ‘नातं’ म्हणजे कुणीही दोन व्यक्ती एकत्र येण्याला मिळालेली सामाजिक कायद्याची चौकट. या सामाजिक चौकटीतूनच आज अस्तित्वात असलेली जगातली सगळी नाती पवित्र मानली जातात. मग ते नातं आई-मुलाचं असो, वडील-मुलीचं असो, भावा-बहिणीचं असो किंवा सासरा-सुनेचं, सासू-जावयाचं असो वा इतरही कुठलं असो… तरीही या सर्वच नात्यांच्या पलीकडे त्यांच्यात असलेल्या स्त्राr-पुरुषाच्या नात्याकडे मात्र आपण कायमच दुर्लक्ष करतो. किंबहुना ते नातं ठाऊक असतानाही केवळ पवित्र मानलेल्या नात्यांच्या आड ते नातं येऊ नये म्हणून आयुष्यभर खटाटोप करत राहतो, पण हा खटाटोप कायमच यशस्वी होतो असं नाही. उलट कधी कधी केवळ स्त्राr-पुरुष हीच मानवाची ओळख अधिक बलवत्तर ठरते आणि मग आपल्याला वर्तमानपत्रांत बापाने मुलीवर, भावाने बहिणीवर किंवा सासऱयाने सुनेवर शारीरिक अत्याचार केल्याच्या बातम्या वाचायला मिळतात. तसंच सासू-जावई किंवा दीर-भावजय यांच्यात लैंगिक संबंध असल्याच्या बातम्याही कधी कधी उघड होतात. अर्थात अशा अपवादात्मक घटना घडतात तेव्हा आपण अशी कृती करणाऱयांकडे अतिशय घृणेने पाहतो. ते साहजिकही असतं. कारण काळाच्या ओघात मानवी संस्कृतीच्या विशिष्ट टप्प्यावर निर्माण झालेल्या कुटुंब संस्थेने हे संबंध त्याज्य किंवा गर्हणीय मानलेले आहेत.
मात्र कुटुंब संस्था, त्यातून आकाराला आलेली लग्न संस्था आणि या लग्न संस्थेतूनच नंतरच्या काळात निर्माण झालेले नातेसंबंध या साऱयाच्या आधीचाही मानवी अस्तित्वाचा-जगण्याचा काळ मोठा आहे. मुख्य म्हणजे त्या काळात आज आपण जी नाती मानतो किंवा जपतो ती अस्तित्वातच नव्हती. म्हणजेच प्रागैतिहासिक काळात माणूस जेव्हा भटक्या अवस्थेत होता, त्या काळात जगाच्या पाठीवर केवळ स्त्राr-पुरुष हे एकच नातं अस्तित्वात होतं आणि इतर कोणत्याच नात्यांची त्या काळात जाण नसल्यामुळे तेव्हा शरीरसंबंधांच्या बाबतीत कोणताही विधिनिषेध मानला जात नव्हता. मनात लैंगिक भावना निर्माण झाली की, कुणीही स्त्राr-पुरुष एकत्र येत होते आणि एकमेकांत रममाण होत होते. अर्थात मानवी भावना त्याही काळात अस्तित्वात असल्यामुळे कदाचित व्यक्तिगत आवडीनिवडीचा भाग त्याही काळात उपस्थित असेलच. मात्र समोरची व्यक्ती आपल्याच रक्तामांसाची याबद्दल किंवा त्यातून येणाऱया विशिष्ट हक्क, प्रेम आणि अशा संबंधांबद्दल असलेली तुच्छतेची भावना तत्कालीन व्यक्ती वा समूहात नव्हती.
मात्र हजारो वर्षं अशा भटक्या अवस्थेत काढल्यावर कधीतरी माणूस एका जागी स्थिर झाला. प्रामुख्याने नदीच्या काठावर. मग तो शिकारीऐवजी शेती करू लागला, धान्य साठवू लागला. त्याच्यात मालकी वृत्ती निर्माण झाली. ही मालकी वृत्ती मग केवळ साधन संपत्तीपुरतीच मर्यादित राहिली नाही, तर व्यक्तीबद्दलही त्याच्या मनात हक्काची भावना निर्माण झाली. त्यातूनच पुढे कुटुंब संस्था-लग्न संस्था निर्माण झाली आणि मग प्रागैतिहासिक काळात असलेल्या स्वैर मानवी संबंधांना आळा बसत गेला, ते निषिद्ध ठरवले गेले. अर्थात पुढारलेल्या, सुधारलेल्या माणसाने एखादी गोष्ट कितीही त्याज्य ठरवली तरी ती मानवाने नंतरच्या काळात नीतिनियमांनी बांधलेली कृत्रिम बाब असते. तिच्यात नैसर्गिक म्हणजे जन्मजात असलेला अकृत्रिमपणा किंवा सहजता नसते. हा अकृत्रिमपणा किंवा सहजता म्हणजे काय, तर केवळ स्त्राr-पुरुष हे नातं. म्हणून तर फ्रॉईड-जुंगपर्यंतचे अनेक मानसशास्त्रज्ञ मुलगा आणि मुलीच्या मनातील आकर्षणाच्या पहिल्या विरोधी लिंग-प्रतिमा आईवडिलांच्याच असतात असं सांगतात. मात्र नंतर मूल जसजसं वाढत जातं, आपण त्याच्यावर कुटुंब संस्थेचे-नातेसंबंधांचे संस्कार करत जातो आणि मग मूल आपल्या घरातल्यांबद्दल वाटणाऱया आकर्षणातून स्वतला दूर करतं, समाजाच्या नीतिनियमांची बंधनं स्वीकारतं आणि चुकून कधी मनात तशी भावना निर्माण झालीच तर आपल्याकडून एखादं पापकृत्य घडल्यासारखं लज्जित होतं.
…अन् तरीही कधी कधी अशी अस्वीकृत, गर्हणीय ठरवलेली कृत्यं समाजात घडत असतात. अशा कृत्यांचं आजच्या कुटुंब व्यवस्थाकालीन वातावरणात कुणीच समर्थन करणार नाही. मात्र इथे हे लक्षात घ्यावं लागेल की, एखाद्या व्यक्तीने केलेलं असं कृत्य कितीही निंदनीय असलं तरी ते अनैसर्गिक नाही आणि म्हणून जरा सजगपणे आपली संस्कृती, आपली पुराणं, आपला इतिहास चाळला तर आपल्या लक्षात येतं की, अपवादात्मक परिस्थितीत का होईना, पण पूर्वी अशी उदाहरणं घडलेली आहेत. कधी ती स्वीकारली गेली आहेत, तर कधी ती नाकारली गेलेली आहेत, पण आमच्या संस्कृतीत असं कधी काही घडलेलंच नाही, असं म्हणणं हा शुद्ध दांभिकपणा आहे. महत्त्वाचं म्हणजे विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर जुनं काही सुटत असतं आणि नव्याची अधिकची भर पडत असते. मात्र ज्याचा हात आपण मागे सोडून देतो ते पूर्णपणे नष्ट होतच असं नाही. त्यातही मानवाला निसर्गत लाभलेल्या कुठल्याच गोष्टी पूर्णत नष्ट होत नाहीत. विशिष्ट संस्कारांमुळे त्या आपण नजरेआड करत राहतो. आतल्या आत दाबून टाकण्याचा प्रयत्न करतो, पण कालौघात मागे सोडून दिलेली संस्कृती अवशेष रूपाने पुढच्या आयुष्यात शिल्लक राहते. त्यातही ती गोष्ट लैंगिक भूक असेल तर कितीही दाबली तरी ती उफाळून येतेच. तना-मनावर अगदी संयम असेल तर या शारीर भुकेला वेगळं, विचित्र वळण मिळत नाही, पण क्वचित कधी शारीर भुकेचा रेटाच एवढा असतो की, त्यापुढे मग नात्यापासून वयापर्यंत सारेच बंध आपोआप गळून पडतात. कारण अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या जेवढय़ा मूलभूत गरजा आहेत, तेवढीच मूलभूत गरज आहे शरीराची भूक! ही भूक नैतिक मार्गाने मिटली नाही की, मग माणूस अनैतिक मार्गाने ती पूर्ण करून घेण्याच्या मागे लागतो. दिवंगत नाटककार वामन तावडे लिखित ‘छिन्न’ नाटकातील सिंधूही तेच करते. लहानपणापासून आपल्या घरात आश्रितासारखं राहणाऱया श्रीकांतशीच ती संबंध प्रस्थापित करते. एवढंच नाही, तर पुढे आपल्या मुलीचं लग्नही जबरदस्तीने ती श्रीकांतशीच लावून देते. जेणेकरून तो आपल्याला कधीही भोगता यावा म्हणून!
आजच्या ओटीटी युगात कदाचित सिंधूच्या या भावना कुणी समजून घेईलही, परंतु चाळीस वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवर आलेल्या वामन तावडे यांच्या या नाटकाने एकच हल्लकल्लोळ माजवला होता. कारण तोपर्यंत मराठी रसिकांच्या मनावर भुरळ होती ती राम गणेश गडकऱयांच्या ‘एकच प्याला’मधील सिंधूची. गडकऱयांची सिंधू मध्यमवर्गीय पांढरपेशा समाजातली. सहनशील आणि सोशिक. नवऱयाने कितीही अत्याचार केले तरी खालच्या मानेने मुकाट सहन करणारी, पण तावडेंच्या नाटकातील सिंधू होती कामगार वस्तीतली. पिचलेल्या नवऱयाच्या संसाराचा गाडा कसाबसा हाकणारी, तरीही मनातल्या इच्छा मरू न देणारी. त्यामुळेच जेव्हा हक्काच्या नवऱयाकडून शरीरसुख मिळत नाही तेव्हा ती आपल्याच घरात राहणाऱया श्रीकांतला जवळ करते. ती जराही विचार करत नाही नवऱयाचा, मुलांचा अथवा समाजाचाही. कारण तिच्यासाठी तिची शारीर भूक महत्त्वाची आहे. इतरांच्या दृष्टीने असेलही कदाचित ती अनैतिक आणि व्यभिचारी, पण तिच्यासाठी तिची ही शारीर भूक म्हणजे पोटाच्या भुकेइतकीच प्राकृतिक. वामन तावडे यांनी मानवाची ही प्राकृतिक शारीर भूक ‘छिन्न’मधून नेमकेपणी अधोरेखित केली आहे. सिंधूच्या अमर्याद वासनेमुळे तिचं संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होतं. परिणामी कळत नकळत या कौटुंबिक वाताहातीला कळत नकळत सिंधूच कारणीभूत ठरते.
मात्र ‘छिन्न’मधली ही गोष्ट केवळ सिंधूची नाही, ती तिच्या वासनेचीही आहे. एका अतिशय प्राकृतिक अशा मानवी भावनेची आहे. आदिम मानवी प्रवृत्तीची आहे. ही गोष्ट केवळ सिंधूची असती तर ती तिच्याबरोबरच संपली असती. मात्र तसं होत नाही. घर उद्ध्वस्त झाल्यावर सिंधू ताळ्यावर येते. आपल्यामुळे झालेला उत्पात तिला उमगतो. कदाचित तिच्यातला विवेक जागा होतो. मात्र तोपर्यंत अतृप्त वासनेने तिच्या लेकीचा बळी घेतलेला असतो. आता सिंधूची जागा तिची लेक शालू घेते. चाळीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेलं आणि गाजलेलं हेच नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आलेलं आहे. लेखक-अभिनेता असलेल्या अभय पैर यांनी ते दिग्दर्शित केलं आहे. आजही ते तेवढंच अंगावर येतं. कारण वामन तावडे यांच्या ‘छिन्न’चं वेगळेपण हेच आहे की, ते केवळ माणसांची गोष्ट सांगत नाही, तर ते लैंगिकतेसारख्या मानवी भावनेची गोष्ट सांगतं… जणू आदिम आसक्तीचं दर्शन घडवतं!