शारीरिक-मानसिक स्वास्थ्यासाठी प्राणिक उपचार

प्राणिक उपचार म्हणजे प्राणशक्तीवर आधारित व्याधी निवारण उपचार पद्धती. प्राणिक उपचार म्हणजे ऊर्जा व्यवस्थापन म्हणता येईल. आपल्या प्रत्येकाच्या शरीराभोवती ऊर्जावलय असते. या वलयात सृष्टीकडून मिळणारी स्वच्छ ऊर्जा तसेच वापरून निरुपयोगी झालेली ऊर्जा यांचा समावेश असतो. सर्व शरीरभर ऊर्जा सारख्या प्रमाणात नसेल तर तिचे संतुलन करणे म्हणजेच प्राणिक उपचार. इतर शब्दांत सांगायचे झाले तर दूषित ऊर्जा काढून टाकून त्या जागी नवी स्वच्छ ऊर्जा भरणे म्हणजेच प्राणिक उपचार. विनाऔषध, विनास्पर्श उपचार अशी ही पद्धत आहे.

ठाणे येथे राहणारे विनायक गोवित्रीकर बँकेतून निवृत्त झाले. निवृत्तीनंतरचा बराच वेळ हाती होता. या वेळात नेमके काय करायचं याचा मार्ग सापडत नव्हता. आपण आयुष्यात काय मिळवले, याचे उत्तर शोधण्याच्या नादात विनायक गोवित्रीकर यांनी ‘प्राणिक हीलिंग’चे प्राथमिक अभ्यासक्रम करायचे ठरवले. डोंबिवली येथे अमोल जोशी यांच्याकडे दोन दिवसांचा कोर्स पूर्ण केला. खूप वेगळय़ा दुनियेत आलो असे त्यांना वाटायला लागले. नवे विचार मिळाले, आशेचा किरण दिसू लागला. काही महिन्यांनी गोवित्रीकर यांनी प्रगत प्राणिक उपचार अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे प्राणिक उपचार पद्धतीचे एकूण पाच अभ्यासक्रम पूर्ण केले. त्यानंतर त्यांना पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू लागली. गोवित्रीकर यांनी अनेक रुग्णांना प्राणिक उपचार पद्धतीने बरे केले आहे.

ठाण्यात प्राणिक आरोग्यम या केंद्रात प्राणिक उपचारांचे प्रशिक्षण दिले जाते. दोन-दोन दिवसांचे कोर्स असतात. नंतर प्रात्यक्षिक करावे लागते. या केंद्राचे प्रमुख आदित्य राऊळ असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम चालते.

– सर्दी, खोकला असे शारीरिक आजार नव्हे, तर सगळय़ाच मानसिक आजारांवर प्राणिक हीलिंग उपयुक्त आहे. भीती, तणाव, नैराश्य, व्यसनाधीनता, आत्महत्येकडे कल असणे अशा कित्येक गंभीर आजारांना प्राणिक उपचारांचा फायदा होतो. प्राणिक उपचारक भावनांचे दूषित विचारकण विरळ करीत करीत काढून टाकतो आणि नवी ऊर्जा तुम्हाला देतो, असे विनायक गोवित्रीकर यांनी सांगितले.