मोठ्यांच्या छोट्या गोष्टी – 1

>> शिरीष कणेकर

कोल्हापूरचे विख्यात मल्ल मारुती माने नुकतेच ‘हिंद केसरी’ झाले होते. एवढय़ा मोठय़ा कर्तृत्वानंतर त्यांचे राज्यभर जागोजागी सन्मान होत होते. त्यातला एक पुण्यात ‘केसरी’ वृत्तपत्रातर्फे गायकवाड वाडय़ात करण्यात आला. तेव्हा मी पुण्यात पत्रकारिता करीत होतो. (पुण्यात जो खत्रुडपणा शिकलो तो आयुष्याला पुरून उरला). ‘केसरी’च्या कार्यालयात लायब्ररीत ‘लोकमान्य’ टिळक यांचे नातू व संपादक जयंतराव टिळक यांच्या हस्ते हा गौरव होणार होता.

अखेर माने रिक्षातून आले. ते एकटे जेमतेम एका रिक्षात मावले होते. त्यांचे चेले मागून दोन-तीन रिक्षांतून आले. जयंतराव अस्वस्थ दिसत होते. ते राजकीय कुस्तीशी परिचित होते; पण ही कुस्ती त्यांच्या आखाडय़ाबाहेरची होती. हारतुरे देऊन सत्कार झाला, पण पेहेलवानाशी आता बोलायचं काय? पण काहीतरी बोलावं तर लागणारच होतं. मी मानेंपेक्षा जयंतरावांकडेच बघत होतो. शेवटी तोंड उघडून त्यांनी प्रश्न विचारला-
‘‘कशी काय मारलीत तुम्ही कुस्ती?’’
मारुती माने पुढे सरसावले व डोळय़ाचं पातं लवतं न लवतं तो, त्यांनी जयंतरावांना पकड घातली व खाली खेचलं. ‘हिंद केसरी’पुढे संपादक ‘केसरी’चा काय पाड? मानेंनी पकड ढिली केली व जयंतराव धापा टाकीत बाहेर आले. मृत्यूच्या सापळय़ातून बचावल्याचे भाव त्यांच्या चेहऱयावर होते. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारायला ते तिथं थांबलेच नाहीत.
हे सगळं मारुती मानेंच्या गावी नव्हते. मी खुळचटासारखा का हसत सुटलोय हेही त्यांना कळत नव्हतं. ते मला पकड व पेच दाखवतील या भीतीनं मी तिथून पलायन केलं.

ऐंशीच्या दशकात मी ‘यादों की बारात’ या माझ्या पुस्तकाचं लता मंगेशकरच्या हस्ते थाटामाटात प्रकाशन केलं. निमंत्रण पत्रिकाही मी झोकदार बनवून घेतली होती. ती वाटण्याचं काम मात्र जिकिरीचं होतं. गेलं की बसावं लागायचं. मग चहापाणी व्हायचं. यात वेळ खूप जायचा. एवढी सगळी निमंत्रणं वेळेत कशी वाटून होणार? मी आयडिया केली. मी माझ्या मुलाला हाताशी धरलं. मी त्याला सोबत घेऊन फटफटीवरून निमंत्रण वाटू लागलो. व्हायचं काय, पत्रिका घेऊन मी त्याला पाठवायचो. मी बाहेरच थांबायचो. तो दारातूनच पत्रिका द्यायचा व लगेच परत यायचा. चांगलं चाललं होतं. मी त्याला सुधीर फडकेपुत्र संगीतकार श्रीधर याच्याकडे पाठवलं.
‘दिली?’ मी विचारलं.
‘‘हो. पण ते घरी नव्हते. त्यांच्या वडिलांनी घेतली. मी त्यांना म्हणालो, तुम्ही आलात तर चालेल.’’
मी थिजलो. मोटरसायकलचं इंजिनही बंद पडलं असावं.
‘‘बरोबर केलं ना मी?’’ माझ्या मुलानं आज्ञाधारकपणे विचारले.
‘हो. हो.’ मी घाईघाईनं म्हणालो.
या पत्रिकेच्या जोरावर तुम्ही घुसू नका, असं तो साक्षात ‘बाबुजी’ सुधीर फडके यांना म्हणाला असता तर मी काय करणार होतो?
एक्याण्णव साली मी प्रथम माझ्या एकपात्री प्रयोगांसाठी अमेरिकेला चाललो होतो (पुढे मी अमेरिकेतच शंभर प्रयोग केले). माझ्या फ्लाईटवर सुधीर फडके होते. ओळख नव्हती. भेटायला जावं की जाऊ नये, माझं ठरत नव्हतं. शेवटी मी गेलो आणि त्यांना ‘हॅलो’ केलं.
‘‘अरे, मी येऊन गेलो मघाशी तुम्हाला भेटायला,’’ बाबूजी हसत हसत म्हणाले. ‘‘तुम्ही झोपला होतात. म्हटलं उठवू नये.’’
मी मनोमन खजिल झालो. ही खरीखुरी मोठी माणसं इतकी साधी कशी असतात? मी साधा नाही म्हणून मोठाही होऊ शकत नाही.

पाठीशी दत्तक पुत्राला बांधून झाशीच्या राणीनं (‘ओरिजिनल’ झाशीची राणी, कंगना राणावत नव्हे!) तटावरून घोडा फेकला होता तद्वत माझ्या लहानग्या मुलीला पाठीमागे बसवून मी स्कूटर हाकत होतो. खार-वांद्रे विभागात माझं सहज शेजारी लक्ष गेलं. शेजारच्या गाडीत किशोरकुमार व लीना चंदावरकर होते. गाडी किशोरकुमार चालवत होता. ते पुढे निघून गेले. मला चेव आला. मी जोमानं पाठलाग सुरू केला. माझी धडपड किशोरकुमार व लीना चंदावरकर दोघांच्याही लक्षात आली असावी. समोरच्या आरशातून आमच्याकडे बघत किशोरनं माझ्या मुलीला घट्ट पकडून बसण्याची खूण केली. लीना खुसूखुसू हसत होती.

विक्षिप्त, अत्रंगद, आचरट असे शिक्के बसलेल्या किशोरकुमारची ही मानवी कृती आजही इतक्या वर्षांनंतर माझ्या डोळय़ांपुढून हलत नाही.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या