लेख : सावरकर घराण्याचे क्रांतिकार्यातील योगदान

>> नेहा जाधव

सावरकर बंधूंनी देशासाठी सर्वच प्रकारचा त्याग केला. कारण त्यांच्या पत्नी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या सोबत खंबीरपणे उभ्या होत्या. ‘मातृभूमी तुजला मन वाहियेले’ या कर्तव्यभावनेनेच सावरकर बंधूंच्या पत्नींनी क्रांतिकार्यात आपल्या परीने हातभार लावला. बाबाराव सावरकर यांच्या पत्नी यशोदा म्हणजेच येसू वहिनी, स्वातंत्र्यवीर सावरकरांची पत्नी यमुना म्हणजेच माई तर बाळाराव सावरकरांची पत्नी शांताबाई म्हणजे ताई या तिघींनी स्वतः क्रांतिकार्य केले आणि इतर महिलांनाही क्रांतिकार्यात सहभागी करून घेतले.

पतिव्रता नेणे आणिकाची स्तुती ।
सर्वभावे पति ध्यानी मनी ।।

कोवळय़ा वयात स्वातंत्र्याची शपथ घेऊन संपूर्ण आयुष्य भारतमातेच्या चरणी अर्पण करणाऱया सावरकर बंधूंच्या पत्नींनी लग्नानंतर सासरचे माप ओलांडताना आपल्या पतीचे राष्ट्रकार्य स्वीकारले. त्याचसोबत देशसेवा करण्याचा निश्चय केला. तो ध्यास चित्तात उतरवून ‘हे मातृभूमी तुजला मन वाहियेले’ हे व्रत अंगीकारले. बाबाराव सावरकर यांच्या पत्नी यशोदा म्हणजेच येसू वहिनी, स्वातंत्र्यवीर सावरकरांची पत्नी यमुना म्हणजेच माई तर बाळाराव सावरकरांची पत्नी शांताबाई म्हणजे ताई या तिघींनी केवळ स्वतः क्रांतिकार्य केले नाही तर इतर महिलांनाही क्रांतिकार्यात सहभागी करून घेतले. राष्ट्रभक्तीचे चटके काय असतात हे ताईंना ठाऊक होते, किंबहुना राष्ट्रप्रेम मनात लहानपणापासून असल्याने त्यांना लग्नानंतर ते स्वीकारणे कठीण गेले नाही, परंतु येसू वहिनी आणि माईंना पतीविरह, उपासमार आणि हालअपेष्टा पावलोपावली सहन कराव्या लागल्या.

खरे पाहता येसू वहिनी आणि क्रांतिकार्याचा संबंध केवळ फडके आडनावाशीच होता. त्या वासुदेव बळवंत फडके यांच्या कुळातील इतकाच काय तो संबंध. त्यामुळे तो त्रास सोसणे हे त्यांना फार कठीण होते, परंतु बाबाराव जस जसे आपले कार्य वाढवत गेले तस तशा येसू वहिनीही कार्यात गुंतल्या. बाबाराव पकडले गेले की रात्री-बेरात्री इंग्रज घराची झडती घेत, पण त्या अंधारातही त्या दिवा बनल्या. सावरकर घराण्यातील वादळासारख्या येणाऱया संकटांवर मात करणारी ती देवताच जणू. सासू-सासऱयांच्या पश्चात तात्याराव, बाळाराव या लेकरांना मायेचा पदर दिला, देवाने मात्र तिच्या गर्भातलं आणि मांडीवर खेळणारे मूल हिरावूनच घेतले. तशात त्यांनी बाबारावांना डोळ्यात अश्रू न येण्याचे दिलेले वचन जन्मभर पूर्ण केले. तात्यारावांनी मित्रमेळा स्थापन केला त्यावेळी ते पाहून त्यातून स्फूर्ती घेऊन येसू वहिनींनी ‘आत्मनिष्ठ युवती संघ’ स्थापन केला. या संघात अनेक स्त्रियांना देशभक्तीपर गीते शिकवणे, राष्ट्रकार्यात स्वदेशीचे धडे देणे तसेच सर्व महिलांना हळदी-कुंकू, गप्पा-टप्पामार्फत संघटित करण्याचे काम करीत. जेणेकरून राष्ट्रसेवेत उतरण्यासाठी स्त्रिया आपल्या नवऱयांना प्रेरित करतील. स्वदेशीचं वहिनींना वेडच लागलं होतं. तात्यारावांनी पुण्यात विदेशी कापडाची होळी केली हे ऐकून नाशिकमधील तरुणही पुढे सरसावले. बाळारावांनी तरुणांना एकत्र करून होळी करण्याचं ठरवले. त्यावेळी आम्ही बायकाही हातभार लावू असे जेव्हा येसू वहिनींनी सांगितले त्यावेळी बाबारावांनी गमतीने म्हटलं तुझ्या हातातला दह्याचा सेट चिनी मातीचा आहे. येसू वहिनी उद्गारल्या ‘हो, मी विसरलेच. त्यांनी तो जोरात जमिनीवर आपटला आणि विदेशी होळीला घरातून प्रारंभ झाला. पुढे इंग्रजांनी घरावर जप्ती आणून ताबा मिळवला. माईंना माहेरी पाठवून येसू वहिनी स्वतः मामाच्या घरी गेल्या त्यावेळी, ‘अर्ध्या रात्री माझ्या घरची पायरी ओलांडू नकोस. तुझ्या नवऱयासकट दिरालाही गिळलंस. माझ्या घरावर सावली पडली तर माझी चार पोरं पण याच कामात उतरतील, निघून जा’ असे बोलून मामीने हाकलले. हे शब्द ऐकून जमिनीचं ताट आणि मोडक्या मडक्याची भांडी करून पाणी पिऊन घर चालवले. मामींचे ते शब्द कठोर होते, पण त्या शब्दातून समजते की, तात्याराव, बाबाराव आणि बाळाराव सावरकर क्रांतिकारक होण्यामागे येसू वहिनींचाही तितकाच हात आहे

माई म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पत्नी घरंदाज श्रीमंत होत्या. खरे तर माईंच्या वडिलांनी स्वतः मागणी घातली होती. तात्यारावांनी आपल्या मागे घराला होणारा त्रास हा वहिनींच्या रूपात पाहिला होता. म्हणून ते लग्नास नकार देत होते. अनेकांनी समजूत काढल्यावर ते तयार झाले. मात्र माईंना पतीविरहच जास्त वाटय़ाला आला. अर्थात त्यादेखील नंतर आत्मनिष्ठ युवती संघाच्या कामात मिसळून गेल्या. पतीची वाट पाहणे आणि हिंदुस्थान स्वतंत्र होणे हे माईंसाठी एकमेव ध्येय होते. प्रभाकर जन्माला आला त्यावेळी त्या फार खूश होत्या. त्याचा सांभाळ करताना पतीविरहाचा त्रास कमी वाटायचा, पण बागडणारं तेही मूल गेलं आणि येसू वहिनी आणि माई पुन्हा एकटय़ा पडल्या. ‘मला भारतमातेची काळजी पोखरून काढते गं’ असे तात्याराव जेव्हा सांगायचे त्यावेळी धीर देणाऱया माईच होत्या. स्वा. सावरकरांसोबत शुद्धी चळवळीतही त्या सामील झाल्या. रत्नागिरीच्या वास्तव्यात त्याही तात्यारावांसोबत भेटीगाठी करू लागल्या. सावरकर माईंना सगळ्यांच्या घरी घेऊन जात. एखाद्या विद्वानाच्या घरी गेल्यावर स्वा. सावरकर सांगत की, अस्पृश्यांना तुमच्या घरात जिथंपर्यंत प्रवेश तिथंपर्यंतच माझी बायको आणि मी येणार. मग अशा पद्धतीने दोघांनी उच्च जातीच्या लोकांच्या घरात अस्पृश्यांना प्रवेश मिळवून दिला. शांत, सोज्वळ माई लग्नानंतर पती आणि मी वेगळे नाहीच या विचाराने राष्ट्रकार्यात उतरल्या.

सावरकर बंधूंनी देशासाठी सर्वच प्रकारचा त्याग केला. कारण त्यांच्या पत्नी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या सोबत खंबीरपणे उभ्या होत्या. ‘मातृभूमी तुजला मन वाहियेले’ या कर्तव्यभावनेनेच सावरकर बंधूच्या पत्नींनी क्रांतिकार्यात आपल्या परीने हातभार लावला.

आपली प्रतिक्रिया द्या