आभाळमाया – आकाशगंगेचा ‘नवा’ आकार

415

>> वैश्विक ([email protected])

विश्वाचा आवाका माणसाच्या बुद्धीच्या आवाक्यात येऊ लागल्याला काही शतकं उलटून गेली. गॅलिलिओच्या दुर्बिणीने तर अवकाशातील वस्तूंचं स्पष्ट दर्शन घडवलं. 1609 मध्ये ही दुर्बिण अवकाशाकडे रोखल्यापासून आजवर त्यात कितीतरी  सुधारणा, बदल होत होत अवकाशातील शक्तिशाली दुर्बिणीपर्यंत आपण पोहोचलो आहोत. या संशोधनात नित्यनवी भर पडत आहे.

एकेकाळी आपल्या पृथ्वीवरच्या देशांचा अचूक नकाशा समजणं हीच एक मोठी गोष्ट होती. विविध प्रकारे भूमापन करून पाश्चात्त्य देशांत पाचेकशे वर्षांपूर्वी जगाचा नकाशा नोंदण्याचे प्रयत्न झाले. हळूहळू त्यात अचूकता आली आणि उपग्रहाने जेव्हा  पृथ्वीचे अवकाशातून काढलेले फोटो पाठवले तेव्हा त्याच्याशी आपल्याकडचे नकाशे ताडून पाहता आले. आपण रेखाटलेले नकाशे बऱयापैकी योग्य असल्याचे त्यातून जाणवलं.

एकोणीसशे पन्नासच्या दशकाअखेरीस माणसाने पृथ्वी सोडून अवकाशात भरारी घेतली. आता एकूणच ग्रहमालेचा एक विशेष अभ्यास सुरू झाला. आधी मांडलेले सिद्धांत प्रत्यक्षात प्रचीती घेण्यासाठी उपयुक्त ठरले. ग्रहरचनेत बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो अशी आधुनिक मांडणी झाली. त्यांची अचूक अंतरं मोजण्याचं तंत्र आलं. सूर्य-पृथ्वी अंतर सरासरी 14 कोटी 56 किलोमीटर असल्याचं समजलं. त्याचवेळी पृथ्वीसह इतर सर्व ग्रहांची सूर्याच्या जवळ आणि दूर असतानाची अंतरं कळली. तीच गोष्ट चंद्र-पृथ्वीबाबत झाली. याचा उपयोग अचूक गणित करून ग्रहमालेत दूरवर कृत्रिम उपग्रह सोडणे आणि जवळच्या ग्रहांवर यानं उतरवण्याचा प्रयत्न करणं शक्य झालं. व्हॉएजर यानं तर सूर्यमाला पार करून पलीकडे गेली. 2004 मध्ये प्लुटोचं ग्रहपद रद्द होऊन त्याला खुजा ग्रह म्हटलं जाऊ लागलं. पारंपरिक ‘ग्रह’ संकल्पनेतला ‘रवी’ किंवा सूर्य हा तारा असून सारी ग्रहमाला त्याभोवती फिरते हे स्पष्ट झालं. त्याचप्रमाणे चंद्राच्या पृथ्वीभोवती भ्रमणाच्या सवापाच अंशाच्या कललेल्या कक्षेमुळे राहू-केतू हे दोन बिंदू असतात हेसुद्धा समजलं. नव्या वैज्ञानिक कल्पनांमुळे ग्रहगणित अचूक साध्य झालं. एवढंच नव्हे तर आधुनिक सूक्ष्म गणिताच्या वापराने भूतकाळात आणि भविष्यकाळात चंद्र-सूर्याची ग्रहणे कशी होती व असतील याचं कोष्टक सहज उपलब्ध होऊ लागलं. बुध आणि शुक्र यांच्या सूर्यबिंबापुढून सरकत जाण्याच्या ‘अतिक्रमणा’च्या तारखा व वेळही निश्चित कळल्याने सामान्य जनांनाही या खगोलीय घटनांचा आनंद डोळे सुरक्षित ठेवणारे खास चष्मे वापरून घेता येऊ लागला.

यापेक्षाही विशेष गोष्ट म्हणजे आपली संपूर्ण सूर्यमाला ज्या आकाशगंगेत आहे त्या  मिल्की वे दीर्घिकेचा आकार कसा आहे याचा अंदाज आला. दोन झांजा परस्परांवर ठेवल्यावर मध्ये फुगीर व सभोवताली चपटा भाग दिसतो तशीच आपली आकाशगंगा असल्याचं लक्षात आलं. गॅलिलिओने 1610 मध्ये गुरू-शनीसारख्या ग्रहांबरोबरच आपल्या आकाशगंगेचंही दर्शन दुर्बिणीतून घेतलं होतं. दुर्बिणीतून आकाशगंगा न्याहाळणारा गॅलिलिओ पहिला माणूस. एरवी आजही सुंदर आकाशगंगा चंद्र नसताना रात्रीच्या निरभ्र आकाशात या क्षितिजापासून त्या क्षितिजापर्यंत पसरलेली स्पष्टपणे दिसते.

अशा या आकाशगंगेचा विस्तार विराट आहे. त्यामध्ये आपल्या सूर्यासारखे सुमारे दोनशे अब्ज तारे आहेत. यापैकी अनेक तारे सूर्याच्या कैक पट मोठे आहेत. इतक्या ताऱयांपैकी किमान 10 हजार ताऱयांभोवती जरी पृथ्वीसारखे सजीव सृष्टी निर्माण करू शकणारे ग्रह असू शकतात. तसे ते असले तर अनेक प्रगत जीवसृष्टी आपल्याच आकाशगंगेत सापडतील. मग संपूर्ण विश्वातील सजीवांची कल्पना करून पहा. कारण विश्वात अशा कोटय़वधी दीर्घिका आहेत.

आपल्या आकाशगंगेच्या केंद्राभोवती आपल्या सूर्यासारखे लाखो तारे एकवटलेले दिसतात. आकाशगंगेच्या इफ्रारेड फोटोतून ते स्पष्ट होतं. आकाशगंगेतलं सर्वाधिक वस्तुमान मात्र त्यातील ताऱयांमध्ये किंवा वायू, धूळ यात सामावलेलं नसून ते ‘डार्क मॅटर’ या स्वरूपात आहे. आकाशगंगेचा विस्तार (लांबी) 1 लाख 60 हजार प्रकाशवर्षे (1 प्रकाशवर्ष म्हणजे 9460 अब्ज किमी), आकाशगंगेची सरासरी रुंदी दोन हजार प्रकाशवर्षे असून मधला फुगीर भाग सहा हजार प्रकाशवर्षे एवढा पसरला आहे. आपली आकाशगंगा सर्पिलाकृती (स्पायरल) असून धनु राशीत तिचं केंद्रस्थान आहे. या स्पायरल दीर्घिकेच्या ‘मृग’ ‘ब्रिज’वर आपली सूर्यमाला असून ती दीर्घिकेच्या केंद्रकापासून 26 हजार प्रकाशवर्षे अंतरावर म्हणजे एकूण विस्ताराच्या तुलनेने केंद्रकाच्या जवळ आहे. आपली सूर्यमाला या दीर्घिकेच्या केंद्रकाभोवती तासाला 7 लाख 90 हजार किलोमीटर या वेगाने फिरत असून सूर्यासकट आपल्या ग्रहमालेला आकाशगंगेच्या केंद्रकाभोवती एक फेरी मारायला 22 कोटी वर्षे लागतात.

अशा या आकाशगंगेबाबत मॅपिंगमध्ये सुधारणा करताना संशोधकांना असं आढळलंय की, आकाशगंगेची टोकं सरळ-सपाट नसून ती काही वाकलेली आहेत. म्हणजे आकाशगंगेचा आकार एखाद्या पिळ्यासारखा (ट्विस्टेड) आहे का? आपलाच शोध आपण नव्या दृष्टीने घेण्याचा प्रयत्न आणि त्यात बदल आढळले तर ते मुक्त मनाने स्वीकारणं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. त्यातून पारंपरिक कल्पनांना छेद गेला तरी आपण सत्याच्या अधिक जवळ जातो हे महत्त्वाचं.

आपली प्रतिक्रिया द्या