हवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम?

प्रातिनिधिक

>> निवेदिता खांडेकर

हवामान बदलामुळे वातावरणात अचानक बदल होतो, ज्याचा परिणाम शेती क्षेत्रापासून शहरी भाग असा सर्वच ठिकाणी होतो. जगातील अनेक देशांनी याबाबत उपाययोजना अमलात आणल्या आहेत. ‘वेदर रेडी नेशन’ ही त्यापैकी एक संकल्पना. याचा मागोवा घेताना हिंदुस्थान नेमका कुठे आहे? या अकस्मात होणाऱया हवामान बदलाचा सामना करण्यासाठी आपली यंत्रणा कितपत सक्षम आहे? जगभरात याबाबत काय स्थिती आहे? अशा अनेक प्रश्नांची उकल करणारा लेख.

काही दिवसांपूर्वी माझे एक स्नेही मोटरसायकलने अरुणाचल प्रदेशची यात्रा करायची तयारी करू लागले आणि माझा त्या राज्यात नेहमी प्रवास होतो म्हणून टिप्स मागायला मला फोन केला. माझा पहिला प्रश्न, ‘‘आता (म्हणजे त्यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्याचं नियोजन केलं, तेव्हाची वेळ) पाऊस सुरु झाला असेल तिकडे, यावेळी का जाताय?’’ तर त्यांनी ‘‘आताच? अजून कुठे पाऊस?’’ म्हणून आश्चर्य व्यक्त केलं. मी त्यांना भारतीय हवामान खात्याची `Customised Rainfall Information System (CRIS) म्हणजेच ‘सानुकूलित पर्जन्य माहिती प्रणाली (सीआरआयएस)’ (http://hydro.imd.gov.in/hydrometweb/(S(royo4l45y14ktluaje1sbv55))/landing.aspx) या वेबसाईटविषयी सांगून त्या राज्याच्या कोणत्या जिह्यात किती पाऊस पडतो ते स्वतःच तपासायला सांगितलं. त्यांची त्या माहितीमुळे प्रचंड मदत झाली आणि यात्रा सुखरूप पार पडली. त्यांची प्रतिक्रिया, “बरं झालं मला हे सांगितलं, इतकी भरपूर माहिती आहे, पण मला आणि अनेकांना या संकेतस्थळाची माहितीच नव्हती.’’

पण म्हणून हे सगळं इतकं सोपं पण नाही. त्याच संकेतस्थळाला पुन्हा भेट द्या.भरपूर माहितीची उपलब्धता आहे आणि त्यामुळेच कुणा नागरिकाला नक्की काय व कुठे शोधावं हे कळत नाही. हे उदाहरण तर स्वान्त-सुखाय निघालेल्या मुसाफिराचं, पण जलवायू परिवर्तनामुळे अधिक ठसठशीतपणे जाणवणारे पूर, गारपीट, उष्णतेची लाट इत्यादी आपत्ती आल्यावर काय करावे हे माहीत असणे गरजेचे आहे. ही जबाबदारी आणि भूमिका एकटय़ा वेधशाळेची नाही तर समाजातल्या सगळ्या थरांतून आणि जवळ जवळ सगळ्या विभागांचा एकत्रित सहभाग त्यात अपेक्षित आहे.

‘वेदर रेडी नेशन’ म्हणजे कुठल्याही प्रकारची आपत्ती, हवामानाची आणीबाणी समर्थपणे सांभाळणारी यंत्रणा, तसे लोक आणि तसे सरकारी विभाग. अपेक्षा अशी की, वेधशाळेनी सांगितलेले अंदाज सामान्य जनता आणि प्रसारमाध्यमे पुढे प्रसारित करतील. त्यापुढे प्रत्यक्ष काही करायची वेळ येईल तेव्हा मुळात लोकांना माहिती हवी.

ग्रामीण जनता, शेतकरी यांच्यासाठी काय?
हे झालं शहरी लोकांसाठी, पण ग्रामीण भागात, खासकरून शेतकऱयांसाठी जितकी आणि जेव्हा माहिती उपलब्ध असायला हवी त्याबाबतीत अजून सुधारणेला भरपूर वाव आहे. शेतकरी सांगतात, पुणे वेधशाळा अंदाज पाठवतात तसेच कृषी विद्यापीठ हवामान अंदाज देत असतात प्रत्येक जिल्हय़ाचा, पण वेळवर आणि किमान तालुका पातळीवर माहिती मिळते का? आम शेतकऱयाला कशी मिळते ती माहिती? याचे उत्तर “तालुका पातळीवर सध्या तरी उपलब्ध नाही.’’ हे आहे. तसं म्हणायला कृषी विज्ञान केंद्रे देत आहेत माहिती थोडय़ा प्रमाणात, पण त्यांच्याकडून साधारण आठवडय़ाचा अंदाज देतात आणि अगदीच खूप मोठा बदल असेल तर दुसरा अंदाज.
“शेतकऱयांना आजही रेडिओ आणि टीव्ही बातम्यांवर अवलंबून राहावे लागते. त्यांच्या वेळा ठरलेल्या. त्यामुळे अपडेटेड माहिती नसते. धनंजय रेड्डी, लिंगधाळ, जिल्हा लातूरचे एक शेतकरी सांगतात, त्यांचे इतर शेतकरी मित्र सांगतात, “हवामान खात्याकडे, त्यांच्या वेबसाईटवर तर माहिती सगळी updated असते, पण ती शेतकऱयांना पोहोचवायची व्यवस्था नाही!’’

पीक किती उभं, किती आडवं होऊन नुकसानीत गेलं यावरून पीक विमा ठरतो. त्यामुळे वेळेवर माहिती मिळणे अत्यंत गरजेचे आहे. लातूर जिह्यातच मागच्या वर्षी अनेक शेतकऱयांचे नुकसान झाले. कारण व्यवस्थेनुसार पेरणी झाली, तण कापणे झाले आणि मग पाऊस गायब झाला, पेरणी फसल्याचं जाहीर करावं लागलं. उपाय एकच. Real time माहिती द्यायची शेतकऱयांना. तेही त्यांच्या त्यांच्या भागाची. नाहीतर ‘आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी’सारखी गत!

सर्वात महत्त्वाची जागरूकता
आजही अनेक गोष्टी बरोबर घडत आहेत आणि अनेक सुधारणांना वाव आहे, पण मुख्य म्हणजे या सगळ्या सुविधा, सेवा, माहिती ज्या आम जनतेसाठी आहे, त्यांना मुळात याविषयी माहिती नसेल, याविषयी जागरूकता नसेल तर फारसा फरक पडणार नाही.

अगदी इतक्यातलं उदाहरण घ्यायचं झालं तर डिसेंबरमध्ये मुंबईवर आलेल्या ओखी चक्रीवादळादरम्यान समाजमाध्यमांचा पुरेपूर उपयोग करून सरकारी यंत्रणेने त्याविषयी माहिती सगळीकडे पोहोचवली, पण हे झालं शहरी भागाकरिता. ग्रामीण भागात अजूनही म्हणावं तसं internet penetration नाही. त्यामुळे कुठलीही संकेतस्थळं बघायला शेतकऱयाला कुठे जमणार? एप्रिलच्या दुसऱया आठवडय़ात अनेक ठिकाणी गारांसकट पाऊस झाला. सगळ्या शेतकऱयांना संकटाची माहिती आधी कळायला मार्गच नव्हता.

मात्र सुरुवात कुठून तरी करावी लागेल. इतर यंत्रणा सज्ज होईल तेव्हा होईल. तूर्तास हवामान खात्याने काय काय सुधारणा अपेक्षित आहे ते केलं तरी भरपूर. सगळ्यात पहिले, शेतकऱ्यांसाठी असलेले programme. ते कमी आहेत. त्यांची संख्या आणि दर्जा वाढवावा लागेल. अर्थात त्यांनी प्रसारित केलेल्या माहितीवरही संस्कार गरजेचे आहे. सोबत हवामान खात्याची केंद्रे वाढवायला हवीत.

‘वेदर रेडी नेशन’ म्हणजे काय?
वेदर रेडी नेशन म्हणजे अशा सगळ्या हवामानविषयक सूचना व त्याच्याशी संबंधित सेवा देशाला पुरवणे की, जेणेकरून हवामान आणीबाणीमुळे होणाऱया मोठय़ा नुकसानासंदर्भात सामान्य जनांना अवगत करून सावध करणे. तसेच जिथे शक्य आहे तिथे बचावात्मक पावले उचलून नुकसानीचा प्रभाव कमी करणे. उदाहरणार्थ-‘हीट वेव्ह’ म्हणजे ४-५ दिवसांकरिता तापमान अतिउष्ण होणार असं हवामान खात्याने सांगितले तर लगेच त्याचं आम जनतेला कळू शकणाऱया भाषेत रूपांतरण करून ती माहिती प्रसारित करायला हवी. ज्या दिवशी हे सांगितलं जाईल त्याच दिवशी जर खरंच तीक्र उष्णतेचा तडाखा बसला तर स्थानिक स्वराज्य संस्थांनी नागरिकांकरिता काय काय केले आहे, अशा केसेस पाहून तेथील दवाखाने किती सुसज्ज आहेत हेदेखील पहायला हवे.म

महत्त्वाचे संकेतस्थळ /दुवे
– हिंदुस्थानी हवामान खाते
– कृषी विज्ञान हवामान खाते
– कृषी हवामान शास्त्र विभाग, पुणे यांचा जिल्हानिहाय अग्रो-मेट सल्ला
– प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्र, मुंबई
– प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्र, नागपूर
– जिल्हानिहाय हवामान अंदाज
– राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण

‘वेदर रेडी क्लायमेट स्मार्ट’ देश

जागतिक हवामान, तापमान आणि इतर सगळ्याच मापदंडांचे मोजमाप करणारी, हवामानाचा कल सांगणारी, जल-वायू परिवर्तनाचा अभ्यास करून वेळोवेळी निर्देश देणारी संस्था. युनायटेड नेशन्सच्या अंतर्गत येणाऱया या संस्थेने २३ मार्च २०१८ या ‘जागतिक हवामान खाते’ दिनानिमित्त एक पत्रक (https://public.wmo.int/en/media/press-release/world-meteorological-day-weather-ready-climate-smart) प्रसिद्ध केलं त्याचं थीम होतं, ‘वेदर रेडी क्लायमेट स्मार्ट’ असे देश. याद्वारे दररोजच्या हवामानासाठी आणि शिवाय पूर इत्यादी आपत्ती, ज्याकरिता हवामान परिवर्तनशीलता आणि दूरगामी जल-वायू परिवर्तनाच्या प्रभावांसाठी माहितीपूर्ण नियोजन करण्यास देशांना उद्युक्त करण्यात आलं होतं. “हे स्लोगन निवडून हवामान अंदाज वर्तवणाऱया यंत्रणेची प्रत्ययकारी भूमिकेचा विविध बाबींवर कसा प्रभाव पडतो हे अधोरेखित केलं आहे आणि विविध बाबींकरिता तरी म्हणजे कसं की, आज पाऊस पडेल का? छत्री नेऊ का? त्या वादळात कुठे आसरा घ्यावा लागेल का? की ‘गाव सोडून जावं? एखादं पीक कधी पेरावं आणि / कधी कापणी करावी ? आणि पुढचे दशकभर शहरी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व पुढच्या किमान काही दशकांपूर्वीपासून जल व्यवस्थापन करण्याकरिता परावृत्त करणे.

(लेखिका पर्यावरण विषयावर लेखन करणाऱ्या स्वतंत्र पत्रकार आहेत)
– nivedita_him@rediffmail.com