व्यक्तीवेध- स्त्री आरोग्याचा ‘कायाकल्प’

>>डॉ. ज्योती धर्माधिकारी

हिंदुस्थानी समाजातील शेवटचा घटक म्हणजे खेडय़ापाडय़ांत दुर्गम भागात राहणारा महिला वर्ग. अशा महिलांच्या आरोग्य व प्रजनन समस्याबाबतच्या प्रश्नांवर काम करणारऱया

डॉ. तरु जिंदल यांचे काम महिलांसाठी वरदान ठरले आहे. बिहारमधील खेडे मोतीहार. या गावातले पुरुष पोटापाण्याच्या उद्योगासाठी घराबाहेर राज्याबाहेर राहतात. संपूर्ण गावात महिलाच राहतात अशा गावात महिलांच्या समस्या असाव्यात का? महिलांच्या समस्या दुर्लक्ष, अनास्था आणि अस्वच्छतेमुळे अनारोग्य अशा अत्यंत बिकट आहेत. ‘गाव तिथे रुग्णालय’ या गावांमध्ये शासकीय रुग्णालय आहे, पण गावातील खासगी दवाखान्याचा धंदा जोमात सुरू होता. या गावात डॉ. तरू जिंदल या नावाची नुकतेच वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेली तरुणी स्वेच्छेने येते.

डॉ. तरू आणि त्यांच्या पतींनी डॉ. अभय बंग आणि  डॉ. प्रकाश आमटे यांच्या सहवासात आल्यानंतर त्यांच्याकडूनच प्रेरणा घेतली आणि जी स्वप्ने वैद्यकीय शिक्षण पूर्ण करताना बघितली ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी खेडय़ामध्ये जाण्याचे ठरवले. त्याच वेळी ‘डॉक्टर फॉर यू’ या प्रकल्पांतर्गत डॉ. तरू यांनी मोतीहार गाठले. गावातल्या बहुतांश नागरिक स्त्रिया असूनही स्त्रियांच्या आरोग्याकडे आणि मुख्य म्हणजे गर्भारपण आणि बाळंतपणाकडे अक्षम्य असे दुर्लक्ष होत होते. शासकीय आरोग्य सुविधा असूनही शेवटच्या घटकेला महिलांना खासगी इस्पितळामध्ये नेले जात असे.

मोतीहारचे इस्पितळ म्हणजे घाणीचे साम्राज्य. एखादा चुकार पेशंट दवाखान्यात आला तर दवाखान्यातील लोक त्याला खासगी इस्पितळाचा रस्ता दाखवत असत. डॉ. तरूंना सहा महिन्यांचा कालावधी मिळाला होता. आहे त्या परिस्थितीशी दोन हात करायचे ठरवत त्यांनी स्वत हातात झाडू घेऊन ऑपरेशन थिएटर स्वच्छ करायला लागल्या. स्वत डॉक्टर काम करत असलेल्या बघून तेथील परिचारिका, सेविका, वॉर्डबॉय सोबत आले. तरीही नागरिकांची इस्पितळात येण्याची तयारी नव्हती. त्यातल्या त्यात महिला निसर्गत बाळंत होतात यावर तेथील लोकांचा जास्त विश्वास होता. मात्र एकही महिला निसर्गत बाळंत होत नव्हती आणि शेवटच्या घटकेला तिला खासगी रुग्णालयात न्यावे लागत असे. अनेकदा आई दगावत असे. त्यामुळे जनजागृतीही होणे गरजेचे होते. डॉ. तरू यांनी आपल्या सोबत आपल्या नर्सला घेऊन घरोघरी जाऊन नऊ महिन्यांत घेण्यात येणाऱया काळजीबद्दल माहिती दिली पहिल्या महिन्यापासून दवाखान्यामध्ये औषधोपचार सुरू करायला हवेत, लोहयुक्त गोळ्या आणि सोनोग्राफी अत्यंत महत्त्वाची हेही पटवून दिले.

मुख्य म्हणजे गर्भवती स्त्रियांना आदराची, प्रतिष्ठेची आणि काळजीपूर्वक वागणुकीची गरज होती  ती वागणूक घरातूनच मिळत नव्हती. त्यामुळे या स्त्रियांना कष्टाची कामे करणे, खानपान, आरोग्याकडे दुर्लक्ष होणे अशा गोष्टींचा सामना करावा लागत होता. डॉ. तरूंनी गर्भवती स्त्रियांसाठी गावातल्या काही महिला एकत्र येऊन त्या महिलेची ओटी भरत असत. तिचे कोडकौतुक करत असत आणि तिला सुलभ प्रसूतीसाठी मदतही करत असत. त्याचा परिणाम असा झाला की, ओटी-भरण कार्पामातून सर्व गर्भवती महिलांना योग्य ती काळजी घरातूनच घेतली जाऊ लागली. पुढे डॉ. तरू यांची सेवाग्राम येथे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली पण समाजसेवेचे व्रत गप्प बसू देत नव्हते. त्याच काळामध्ये बिहारमधील मसारही या गावामध्ये इस्पितळ उभे करायचे ठरले. मोतीहार इथला बदल हा प्रशासकीय हस्तक्षेपामुळे करता आला. मोतीहारचा दवाखाना 2017 आणि 2018 या दोन्ही वर्षी सलग पंतप्रधान मोदी यांच्या ‘कायाकल्प हॉस्पिटल’ पुरस्कारासाठी निवडला गेला. हे काम तरुण डॉक्टर टीमने केले. हे सगळेच डॉक्टर 25 ते 30 वयोगटातले, ऊर्जावान, उत्साही, सेवाभावी असे होते.

गेल्या काही वर्षांमध्ये त्यांचे नाव सुदृढ स्तनपानासाठी गाजत आहे. एकदा डॉ. तरू यांनी एका व्हिडीओमध्ये असे पाहिले की, इतर प्राण्यांप्रमाणे मानवाचेही बाळ जन्मत:च कूस बदलते आणि आईचे दूध स्वत शोधते आणि लुचू लागते हा विलक्षण शोध लागल्यानंतर डॉ. तरू यांनी अधिक माहिती मिळवली. मुख्य म्हणजे स्वतच्याच विभागात त्यांनी हा प्रयोग करून पाहिला जन्मत काही सेकंदांत मूल आईजवळ सोडले तर ते कुशीवर वळून दूध प्यायला लागते. त्यांनी जवळ जवळ शंभर बाळांवर हा प्रयोग करून पाहिला आणि परिणाम चमत्कारिक होते. तेव्हा आपली बाळंतपणाची पद्धत अत्यंत चुकीची आहे आणि नवजात बालकाला जन्मतच आईचे स्तन्य लगेच दिले पाहिजे. माता बाई यांच्यासाठी आवश्यक आहे असा निष्कर्ष मांडला. डॉक्टर्स युनियन आणि नर्सिंग युनियन दोघांनीही प्रचंड गदारोळ केला, पण शेवटी डॉ. तरू यांचे संशोधन महत्त्वाचे ठरले. ‘ब्रेस्ट ाढाsल’ या त्यांच्या उपामाची जगभरात दखल घेतली गेली. मलेशियातील वर्ल्ड लायन्स ऑफ ब्रेस्ट फीडिंग अॅक्शन या ठिकाणी त्यांना व्याख्यान देण्यासाठी बोलावण्यात आले. त्यांना तिथे प्रशिक्षणही देण्यात आले. 2017 मध्ये दोन आठवडय़ांचा स्तनपान कोर्स करून डॉ. तरु यांनी अधिक माहिती मिळवली. दरम्यान, त्यांच्या कार्याच्या काळातच त्यांच्यावर कॅन्सरने घाला केला. मात्र त्या त्यातून जिद्दीने बाहेर पडल्या.

डॉ. तरूंना या संशोधनाबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.  त्यांचे टेड टॉकमध्ये व्याख्यानही झाले. ‘ग्लोबल वुमन अचिवर मोस्ट इन्स्पायरिंग वुमन ऑफ द इयर’ पुरस्कार त्यांना देण्यात आला. इंटरनॅशनल कॉन्फिडरेशन ऑफ एनजीओ आणि युनायटेड नेशन्सद्वारे त्यांना सन्मानित करण्यात आले. डॉ. तरू जिंदल या सेवाभावी डॉक्टरांचे आई आणि मूल यांच्या स्वास्थ्य आणि विकास या कार्पामांमध्ये योगदान महत्त्वाचे ठरत आहे. या लेखाच्या निमित्ताने डॉ. तरु यांचे काम सर्वदूर पोहोचावे.

[email protected]

(लेखिका राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय, जालना येथे इंग्रजी विभागप्रमुख आहेत.)