>> महेश दुर्वे
मधुताई या काळाच्या किमान तीसेक वर्षे पुढे होत्या. उत्तम लेखिका, दिग्दर्शिका असलेली, चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांची कन्या, पद्मविभूषण, संगीत मार्तंड पं. जसराज यांची पत्नी अशी पार्श्वभूमी लाभलेली ही माऊली इतकी मनमिळाऊ, सहिष्णू आणि निगर्वी होती.
मधुरा जसराज म्हणजेच मधुताई गेल्याचं कळलं नि मी सुन्न झालो.
एक-दोन नव्हे, तर तब्बल एक तप, बारा वर्षे मी या माऊलीच्या घरी, जसराज कुटुंबीयांकडे राहायला होतो. कोणाचा कोण, ना नात्याचा ना गोत्याचा, पण कुटुंबाचा सदस्य असल्यासारखा झालो होतो.
मी राहायला लागलो तेव्हा एसएससीच्या प्रमाणपत्रावर मी सरकारी परीक्षा देऊन मंत्रालयात लागलो होतो. पण मी किमान पदवीधर झालंच पाहिजे असा धोशा मधुताईंनी लावला होता. मी खर्चाची अडचण काढली. तीही त्यांनी सोडवली. माझा नाईलाज झाला. मी चर्चगेट, ‘बी’ रोडला युनिव्हर्सिटी क्लब हाऊसला, करस्पॉन्डन्स कोर्सला अॅडमिशन घेतली. दरवर्षी पास झालो. चौथ्या वर्षी पदवीधर झालो. मधुताईंना काय आनंद झाला होता म्हणून सांगू.
त्या घरात मी सोडलो तर सर्व संगीताचे शागीर्द होते. मी एकटाच साहित्याचा म्हणजे मधुताईंचा लेखनिक होतो. सरस्वती मधुताईंच्या नुसती जिभेवर नव्हे, तर रोमारोमांत भिनली होती.
किती प्रोजेक्ट आम्ही लिहिले होते…पहिला म्हणजे मा. अण्णांचे आत्मचरित्र…‘शांतारामा’. शब्दांकन मधुताईंचं आणि हस्तलिखित त्यांच्या सहायकाचं. त्या ‘लोकसत्ता’साठी एक सदर लिहीत होत्या… ‘प्रभा मंडळाचे नवे मानकरी’. त्या वेळी उदयोन्मुख असलेले पं. राजन साजन मिश्रा, विश्वमोहन भट्ट, शंकर महादेवन या नामांकितांवर लेख लिहिले होते. आणखीही कलाकार होते, पण मला हे लक्षात राहिलेत. खूप लोकप्रिय झाली होती ही मालिका.
मधुताईंची एक हिंदी कादंबरी होती. टंकलिखित बाड तयार होतं, पण बरंच जुनं झालं होतं. मी ते वाचायला घेतलं आणि त्यात इतका रमलो की, काही विचारू नका. इतकी सुंदर व ओघवती भाषा होती ती!
मी मधुताईंना म्हटलं, “ताई, ही छापत का नाही?” त्या म्हणाल्या, “छापू या, आता तुझ्या अक्षरांत नव्याने लिहून काढशील का?” मी नाही म्हणणं शक्यच नव्हतं. त्या कादंबरीचं नाव होतं, ‘रज्जो’. नंतर या हिंदी कादंबरीचं मराठी भाषांतर झालं. अर्थात मधुताईंनीच केलं होतं. ती मराठी ‘रज्जो’ कोल्हापूरच्या मेहता प्रकाशनाने छापली होती. प्रसिद्धीपासून दूर राहण्याच्या त्यांच्या सवयीमुळे ही कादंबरी छापण्यास खूपच विलंब झाला होता. कादंबरीच्या मनोगतात “माझा सहकारी महेश दुर्वे याने लावलेल्या सततच्या लकडय़ामुळे ही छपाई झाली” असं स्पष्ट त्यांनी म्हटलं आहे.
मधुताई या काळाच्या किमान तीसेक वर्षे पुढे होत्या. कल्पनातीत प्रकल्पांची कल्पना करायची आणि ती कागदोपत्री पूर्णत्वास न्यायची हा त्यांचा आवडीचा छंद. अशाच छंदातून निर्माण झालेला प्रकल्प म्हणजे ‘आलोकगंगा’. सानेट ल्युमियर म्हणजे ध्वनी व प्रकाशाच्या माध्यमातून गतकाळाची, स्थळाची, व्यक्तींच्या महानतेची कथा लोकांसमोर जिवंत उभी करायची अशी ही कल्पना.
फळाची आशा न करता काम करत राहावं ही गीतेतील शिकवण मधुताईंनी उपजतच अंगिकारली होती. ‘आलोकगंगा’ प्रोजेक्टवर त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. मेहनतीला लाजायचं नाही, हा धडा मी त्यांना पाहूनच शिकलो. ‘आलोकगंगा’ प्रकल्प खूप नावाजला गेला, पण प्रत्यक्षात उतरला नाही याची सल त्यांच्या मनात कायम होती.
साधारण 1982-83च्या सुमारास भारत सरकारच्या सांस्कृतिक उपामांतर्गत त्या चेकोस्लाव्हाकियाला गेल्या होत्या. लँटर्ना माजिका हा रंगभूमी आणि चित्रपट कला यांचा मेळ साधणारा असा अफलातून करमणुकीचा प्रकार तिथून त्या शिकून आल्या होत्या. हा प्रकार नक्की काय आहे हे समजावून सांगणारा सविस्तर लेख त्यांनी ‘लोकसत्ता’मध्ये लिहिला होता. याचं हस्तलिखित मीच केलं होतं. गमतीने त्या म्हणाल्या होत्या, “माझं इतकं शांतपणे ऐकून घेणारा हिंदुस्थानात तू एकमेव माणूस आहेस.” हा कला प्रकार ज्या काळात त्या शिकून आल्या होत्या, आपल्याकडे त्या काळाच्या पचनी पडणं खूप अवघड होतं. म्हणून म्हणतो, त्या काळाच्या खूप पुढे होत्या.
‘कान कहानी सुन्यो करे’ आणि ‘सुर लय और छंद’ या दोन संगीतिका त्यांनी निर्माण व दिग्दर्शित केल्या होत्या. चित्रपतींचीच मुलगी असल्यामुळे उपजतच मिळालेल्या चित्रपट कौशल्यामुळे त्यांची रंगमंचावरील पात्रेदेखील चित्रफितीसारखी तरल वाटायची. या नाटकांचे प्रयोग जर रिव्हाईव्ह झाले तर मधुताई कदाचित अनंतातून पुन्हा परततील. इतकी प्रिय त्यांना त्यांची निर्मिती होती. ‘फास्टर फेणे’ ही दूरदर्शन मालिका म्हणजे मधुताईंच्या मेहनतीचा, कलागुणांचा व बुद्धिमत्तेचा कस होता.
बऱयाच दिवसांनी एकदा त्यांचा फोन आला. मला म्हणाल्या, “अरे, मी साताऱयाला निघालेय. एका संस्थेच्या कार्पामाची अध्यक्ष आहे मी. मला ‘स्नेह’ या विषयावर बोलायचंय. काय बोलू सांग. काहीतरी खरडून दे. माझं डोकं चालत नाही.”
मी म्हटलं, “ठीक आहे, मला थोडा वेळ द्या.” माझ्या वरचा मधुताईंचा हा विश्वासच मला विश्वरूपी विश्वविद्यालयाने दिलेलं प्रमाणपत्र होतं.
मी पुढच्या दहा मिनिटांतच ओळी लिहिल्या व ताईंना पाठवल्या. तिथला कार्पाम संपल्यावर त्यांचा फोन आला. म्हणाल्या, “अरे, मी भाषणाच्या शेवटी या विषयावरची माझ्या सहकाऱयाची एक कविता ऐकवते आणि थांबते, असं म्हटलं आणि तुझीच कविता वाचली. खूप टाळ्या मिळाल्या.” हे ऐकून मी आनंदलो. छोटय़ा छोटय़ा गोष्टींसाठी दुसऱयाचं श्रेय हिसकावून घेणाऱया जगात ज्याचं श्रेय त्यालाच देण्याची ही वृत्ती किती विरळा आहे नं! माझा साखरपुडा, माझं लग्न, माझ्या मुलीचं बारसं, तिचे सुरुवातीचे वाढदिवस, माझ्या घरचे धार्मिक कार्य या सर्व प्रसंगी मधुताई आवर्जून हजर असायच्या.
स्वत उत्तम लेखिका, दिग्दर्शिका असलेली, चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांची कन्या, पद्मविभूषण, संगीत मार्तंड पं. जसराज यांची पत्नी, सर्जनशील संगीतकार शारंगदेव आणि अष्टपैलू कलाकार दुर्गा जसराज यांची आई… अशी पदोपदी गर्व करता येऊ शकेल अशी पार्श्वभूमी लाभलेली ही माऊली इतकी मनमिळाऊ, सहिष्णू आणि निगर्वी कशी होती, हे तिलाच ठाऊक! मधुताई, तुमचे विस्मरण माझ्या हयातीत मला होणार नाही!