लेख – युवाशक्तीः देशाचे खरे भांडवल !

>> दिलीप देशपांडे  

आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. तो करीत असताना या प्रश्नाकडे गंभीरपणे पाहणे आणि विचार करणे अतिशय आवश्यक आहे. युवा दिन साजरा करताना शासनाने-राजकीय पक्षांनी गोष्टी प्रामुख्याने विचारात घ्यायला हव्यात. युवाशक्तीला, युवा संघटनांना विधायक वळण द्यायला हवे. युवक हेच देशाचे खरे भांडवल आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही आणि म्हणूनच त्यांच्या समस्यांकडे त्यांना शिक्षणाप्रमाणे रोजगार संधी मिळेल याकडे लक्ष दिल्यास युवकही परदेशी शिक्षणाकडे आकर्षित न होता देशातच राहून आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला देतील यात शंका नाही.

देशाच्या प्रगतीचे सुकाणू युवकांच्या हाती आहे असे म्हटले जाते. हिंदुस्थान हा जगातील सगळय़ात मोठा तरुणांचा-युवकांचा देश आहे. हिंदुस्थानात 65 टक्के युवकांची संख्या आहे असे म्हटले जाते. युवा पिढीचे क्षमतेवर, ताकदीवर हिंदुस्थानही जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहात आहे. आजच्या परिस्थितीत काही ठरावीक युवा पिढीत नवीन शिकण्याची आवड आहे, जिद्दही आहे. देशाच्या विकासात त्यांचा सहभाग आहे. आज देशाच्या सीमेवर जाऊन आपल्या देशाचे रक्षण करणारा देशभरातील युवकच आहे. त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. जागतिक स्तरावर 12 ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक युवा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. युवकांशी निगडित काही विषयांवर चर्चा घडवून आणली जाते.

लिब्सन येथे 8 ते 12 ऑगस्ट 1998 मध्ये पार पडलेल्या युवकांशी निगडित मंत्र्यांच्या परिषदेत 12 ऑगस्ट जागतिक युवा दिवस साजरा करण्याची शिफारस केली गेली आणि त्यावर 17 डिसेंबर 1999 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने शिक्कामोर्तब केले. तेव्हापासून 12 ऑगस्ट हा दिवस जागतिक युवा दिवस म्हणून साजरा होतो.

युवा दिवस साजरा करत असताना युवकांशी निगडित काही विषय/प्रश्नांची शासकीय आणि युवा पातळीवर चर्चा होणे आवश्यक वाटते. काय आहेत ते प्रश्न?

युवक आणि विद्यार्थी संघटना

युवक आणि राजकीय संघटना

युवक आणि सोशल मीडिया

युवक आणि राजकारण

युवक आणि सामाजिक जाणिवा, जबाबदारी

महाविद्यालयीन स्तरीय युवकांच्या विद्यार्थी संघटना आहेत. एकेका महाविद्यालयात दोन/तीन/चार अशा संघटना बघायला मिळतात. या संघटना कुठल्या ना कुठल्या पक्षाच्या अधिपत्याखाली कार्य करत असतात. त्यामुळेच पक्षा-पक्षातील मतभेद याच्यातही पाहायला मिळतात. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणे, ऍडमिशनमधला मग तो महविद्यालय, होस्टेलमध्ये ऍडमिशन, जादा फी आकारणीकडे लक्ष देऊन विद्यार्थी वर्गाला न्याय मिळवून देणे हे महत्त्वाचे काम विद्यार्थी संघटनांचे आहे, पण यांचा अधिकतर वेळ वादातच जातो. बऱ्याच वेळा पोलिसांपर्यंतही वाद जातात. आजचा युवक इंटरनेट, मोबाईल,  इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सऍप अशा सोशल मीडियाच्या जाळय़ात नको तितका अडकला आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. हवा तेवढा उपयोग न घेता नको तेवढा दुरुपयोग केला जातो. त्यामुळे फार मोठय़ा प्रमाणात युवक त्यात अडकून आत्ममग्न झालाय. चुकीच्या दिशेने वापर होतोय. संवाद कमी होतोय. वाचन कमी झालंय.

नवीन तंत्रज्ञान मिळतंय, सगळं जग जवळ आलंय, पण माणसं हरवली आहेत. मीडियाचा योग्य वापर करण्याची समज नाही… म्हणून वाटते विधायक वळण द्यायला हवे.

राजकीय पक्ष तरुणांचा वापर निवडणूककामी मोठय़ा प्रमाणावर करून घेतो. त्या बदल्यात काय मिळते? रोजगार नसलेले लाखो युवक यात गुरफटले आहेत. समाजातील अत्याचार, भ्रष्टाचाराबद्दल त्यांना काही घेणे देणे नाही. तो पेटून उठत नाही. त्यांच्या जाणिवा बोथट झाल्या आहेत. रोजगार नसल्याने फार मोठय़ा संख्येने युवक अस्वस्थ आहे. ज्या ठिकाणी संधी उपलब्धता असते, तिथे पोहचत नाही किंवा टिकाव लागत नाही.

एकीकडे युवा शेतकरी आहे. सिस्टीममधल्या भ्रष्टाचाराने तो गांजला आहे. खते, बियाणे यातही भ्रष्टाचार, बोगस बियाणे. अनेक प्रश्नांनी तोही त्रासला आहे. अनेक तरुण शेतकरी नाइलाजाने आत्महत्या करीत आहेत.

खरं तर युवाशक्तीत खूप सामर्थ्य नक्कीच आहे. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीलाही आपण राष्ट्रीय युवा दिवस साजरा करतो. त्यांचा युवाशक्तीवर खूप विश्वास होता. युवा शब्दातच वायू म्हणजे गती आहे. त्यांना संस्कारक्षम, कणखर, राष्ट्राप्रति, समाजाप्रति प्रेम असणारा निर्व्यसनी युवक अपेक्षित होता, आहे. युवा दिन साजरा करताना या सर्व गोष्टींची चर्चा, सर्व क्षेत्रातील युवकांना, युवा संघटनांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन व्हायला हवी. युवकांची मन की बात ओळखायला हवी. शासनाने बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यायला हवा आहे. नवनवीन संधी प्राप्त करून द्यायला हव्यातच. हाच त्यावर एकमेव उपाय आहे. नाही तर राष्ट्राची ताकद म्हणून ज्या युवकांकडे आपण पाहतो ती युवा पिढी बरबाद होणार हे निश्चित. काही युवक संघटना चांगले कार्य करत आहेत, असतील. तरी ते खूप तोकडे आहे. आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. तो करीत असताना या प्रश्नाकडे गंभीरपणे पाहणे आणि विचार करणे अतिशय आवश्यक आहे. युवा दिन साजरा करताना शासनाने-राजकीय पक्षांनी गोष्टी प्रामुख्याने विचारात घ्यायला हव्यात. युवाशक्तीला, युवा संघटनांना विधायक वळण द्यायला हवे. युवक हेच देशाचे खरे भांडवल आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही आणि म्हणूनच त्यांच्या समस्यांकडे त्यांना शिक्षणाप्रमाणे रोजगार संधी मिळेल याकडे लक्ष दिल्यास युवकही परदेशी शिक्षणाकडे आकर्षित न होता देशातच राहून आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला देतील यात शंका नाही.

[email protected] com