बांगलादेशातील हिंदूंचे पुनर्वसन

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
hemantmahajan@yahoo.co.in

बांगलादेश व पाकिस्तानमध्ये अत्याचार झाल्यामुळे तेथील हिंदू हिंदुस्थानात परत येत आहेत. त्यांना अर्थातच आपण हिंदुस्थानचे नागरिकत्व दिले पाहिजे. आसाममध्ये आसामी विरुद्ध बंगाली असा संघर्ष होऊ नये म्हणून त्यांचे आसाम सोडून बाकी हिंदुस्थान-बांगलादेश सीमेवर पुनर्वसन केले पाहिजे. जरूर पडल्यास त्यांना हिंदुस्थानच्या इतर प्रांतात वसवले जावे.

नागरिकत्व कायद्यातील सुधारणांच्या प्रस्तावाने आसाममध्ये खदखद सुरू आहे. बांगलादेशातून येत असलेल्या निर्वासितांमुळे, घुसखोरांमुळे आसाममधील लोकसंख्येचे समीकरणच बिघडत चालले होते. राज्याचा सामाजिक आणि आर्थिक चेहरा विद्रुप होऊ लागला होता. त्याविरोधात पहिल्यांदा तेथे आवाज उठवला अखिल आसाम स्टुडंट युनियनने. पुढे त्यांना तेथील विविध राजकीय गटांनीही पाठिंबा दिला. १९८५ च्या आसाम कराराने ते आंदोलन शमले. त्यावेळचा तो संघर्ष केवळ भूमिपुत्र विरुद्ध स्थलांतरित असा होता. आता नागरिकत्व कायद्यातील प्रस्तावित सुधारणांमुळे तोच संघर्ष पुन्हा सुरू झाला आहे. बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथून येणाऱ्या अल्पसंख्याकांना म्हणजे हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चनांना अनधिकृत स्थलांतरित म्हणता येणार नाही, अशी ही सुधारणा आहे.

२४ मार्च १९७१ च्या मध्यरात्रीनंतर हिंदुस्थानात आलेल्या स्थलांतरितांना आसामातून परतावे लागेल असे आसाम करारात ठरले होते. आता त्यात बदल करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असून त्यानंतर आलेल्या बांगलादेशी हिंदूंना सामावून घेतले जाणार आहे. याला आसाममधील बराक खोऱ्यातील बंगालीभाषक हिंदूंचा पाठिंबा आहे. १९७१ पासून हिंदुस्थानात आलेल्या बांगलादेशी हिंदूंची संख्या १५ ते २० लाख आहे. नागरिकत्व कायद्यातील ही सुधारणा मंजूर झाली तर बांगलादेशातील किमान १ कोटी हिंदू हिंदुस्थानात येतील आणि तसे झाल्यास पुन्हा आसामी विरुद्ध बंगाली आणि त्या आधारावर ब्रह्मपुत्र खोरे विरुद्ध बराक खोरे असा संघर्ष उफाळून येऊ शकतो. फाळणीनंतर पाकिस्तानातील हिंदूंची कत्तल केली गेली किंवा त्यांची धर्मांतरणेही घडवून आणली गेली. परिणामी पाकिस्तानातील त्यांची संख्या जी १९५० मध्ये ८ ते ९ टक्के होती, ती आज १० लाखांवर म्हणजे २ ते ३ टक्क्यांहून कमी झालेली आहे. पूर्व पाकिस्तानात (आताच्या बांगलादेशात) १९५० मध्ये २४ ते २५ टक्के हिंदू होते, २०११ च्या जनगणनेनुसार बांगलादेशात आज केवळ ८.६ टक्केच हिंदू शिल्लक उरले आहेत. त्यांची संख्या आता एक कोटी आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचेही बांगलादेशातील हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येकडे दुर्लक्ष आहे. असाच प्रकार सुरू राहिला तर या देशात हिंदूंची लोकसंख्या शून्याच्या दिशेने गेल्याशिवाय राहणार नाही.

मूळचे बांगलादेशचे आणि सध्या अमेरिकेत शास्त्रज्ञ म्हणून वास्तव्यास असलेले दीपेन भट्टाचार्य ‘स्टॅटिस्टिकल फ्युचर ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या आपल्या लेखात सांगतात की, “२०२०पर्यंत बांगलादेशात केवळ १.५ टक्के हिंदू उरतील. सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेले बांगलादेशातील राजकीय अभ्यासक प्रोफेसर अली रियाझ त्यांनी त्यांच्या ‘गॉडविलिंगःद पॉलिटिक्स ऑफ इस्लामिझम’ या पुस्तकात असा निष्कर्ष काढला की, ‘गेल्या २५ वर्षांत बांगलादेशातून ५३ लाख हिंदूंनी पलायन केलेले आहे.’
१९७० मध्ये पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकांत मुजीबूर रहमानच्या आवामी लीगचा विजय झाला. त्यांच्या हातात सत्ता जाऊ नये आणि पूर्व पाकिस्तान (बांगलादेश) फुटून निघू नये म्हणून याह्या खान यांनी मोठ्य़ा प्रमाणावर दडपशाही केली. तीस लाखांवर नागरिकांची कत्तल केली आणि एक कोटी निर्वासित हिंदुस्थानात आले. हा इतिहास ‘गॅरी बास यांच्या पुस्तकात दिला आहे. अमेरिकेचे प्रसिद्ध लेखक, पत्रकार गॅरी बास यांच्या २०१४ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘द ब्लड टेलिग्राम : निक्सन, किसिंजर ऍण्ड ए फरगॉटन जेनोसाईड’ या पुस्तकाने जगात खळबळ उडवून दिली. विदेशी लेखकाने बांगलादेश निर्मितीच्या वेळी हिंदूंवर झालेल्या भयानक अत्याचाराला जगापुढे मांडले आहे, तरी त्यावर त्यावेळेच्या हिंदुस्थान सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त झाली नाही. हिंदुस्थानातील वर्तमानपत्रे, संघटना आणि मानवाधिकारवादी नेत्यांनीही या मुद्यावर तिखट आणि प्रभावी प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती. पण असे काही घडले नाही. १९७१ साली हिंदूंच्या नरसंहाराची बाब उजेडात आली असतानाही हिंदुस्थानने या नरसंहाराचे वर्णन बांगलादेशातील नागरिकांवर झालेले ते अत्याचार आहेत, अशा शब्दांत केली आणि हिंदू शब्दाचा उल्लेख टाळला.

बांगलादेशातील ४० टक्के हिंदू कुटुंबे शत्रू संपदा कायद्याने (Enemy Property Act) प्रभावित झाली आहेत. त्यात जवळपास ७ लाख ५० हजार शेतीवंचित कुटुंबे समाविष्ट होती. परिणामी हिंदू कुटुंबांनी गमावलेल्या एकूण जमिनींचा अंदाज १६.४ लाख एकर इतका आहे जी हिंदू समाजाच्या मालकीतील एकूण जमिनींच्या ५३ टक्के आहे. हिंदू हे बांगलादेश लोकसंख्येच्या ८ टक्के असले तरी सत्तेमध्ये त्यांचे प्रमाण शून्यच आहे. जरी ते सर्वात मोठे अल्पसंख्याक असले तरी त्यांचा कुणी प्रवक्ता नाही आणि त्यांची कुठलीही संघटना नाही. बांगलादेश व पाकिस्तानमध्ये अत्याचार झाल्यामुळे तेथील हिंदू हिंदुस्थानात परत येत आहेत. त्यांना अर्थातच आपण हिंदुस्थानचे नागरिकत्व दिले पाहिजे. आसाममध्ये आसामी विरुद्ध बंगाली असा संघर्ष होऊ नये म्हणून त्यांचे आसाम सोडून बाकी हिंदुस्थान-बांगलादेश सीमेवर पुनर्वसन केले पाहिजे. जरुर पडल्यास त्यांना हिंदुस्थानच्या इतर प्रांतात वसवले जावे.

बांगलादेशातील संघटनांच्या माहितीनुसार सुमारे ३० लाख बांगलादेशी हिंदू या नरसंहारात मारले गेले. दुर्दैवाने हिंदुस्थान सरकारने बांगलादेशात मारल्या गेलेल्या हिंदूंच्या बाबतीत दुःख प्रकट करणारा शब्दही काढला नाही. हिंदुस्थानी नागरिक जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात हिंदू, शीख, जैन, बौद्ध यांच्यावर होणाऱ्या आघातांबाबत गप्प कसा काय बसू शकतो? त्यांची दुःख, वेदना, अन्यायाबाबत आमची नैतिक जबाबदारी नाही का?. इंदिरा गांधींनी एक माहिती हिंदुस्थानी जनतेपासून काळजीपूर्वक लपवून ठेवली. ती म्हणजे १९७१ मध्ये हिंदुस्थानात आलेले ९० टक्के निर्वासित हिंदू होते. आज हिंदू हे बांगलादेशाचे अनावश्यक नागरिक ठरले आहेत आणि ज्या सहजतेने तेथे हिंदूंना त्रास दिला जात आहे त्यावरून भविष्यातही अत्याचार होऊ शकतात.