शिरीषायन – बॉम्बगोळा

>> शिरीष कणेकर

आयुष्यात चार तारखा मी कदापि विसरू शकत नाही, विसरू इच्छित नाही. पहिली अर्थातच माझा प्रकटदिन 6 जून 1943. त्या दिवशी जगाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोनच बदलला. दुसरी तारीख 15 मार्च 1966. माझे वडील गेले तो काळाकुट्ट दिवस. माझ्या आयुष्यातील सगळय़ात वाईट दिवस. त्या दिवशी मी काय काय कमावलं, माझ्यातलं काय काय संपलं याची मोजदाद करण्याचीही माझी हिंमत झालेली नाही. तिसरी तारीख 28 ऑगस्ट 1974. माझ्या मुलाचा – अमरचा जन्म. माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस. या पृथ्वीवरचा तो माझा रक्ताचा एकमेव नातेवाईक होता. त्या रात्री घरी येऊन मी प्लास्टिकच्या कॅलेंडरवर जी 28 ऑगस्ट ही तारीख केली ती आज अठ्ठेचाळीस वर्षांनंतरही मी बदललेली नाही. बायकोचा वाढदिवस मात्र मी प्रयत्नपूर्वक विसरलोय. चौथी तारीख 6 एप्रिल 1980. त्या दिवशी मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी घोडचूक करून बसलो होतो. मी माझ्या नावानिशी दिलेल्या पहिल्या पानावरील बातमीने मला व माझ्या पेपरला गाळात ढकललं. मी बातमीला आवर्जून माझं नाव दिलं होतं. कारण तिच्यामुळे मला दिगंत कीर्ती मिळेल अशी माझी धारणा होती. पण प्रत्यक्षात मी बाराच्या भावात गेलो व माझ्या पेपरची अनन्वित बदनामी झाली.

‘रेप मोस्ट फाउल’ या शीर्षकानं प्रसिद्ध झालेल्या बातमीचा सारांश असा होता – एका युवतीवर बलात्कार झाला. ती घरी आली. कुठे होतीस या घरच्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळून ती म्हणाली, ‘आधी आंघोळ करून येते. मग सांगते.’ ती आंघोळीला म्हणून गेली आणि स्वतःला पेटवून घेतले. तिचा मृत्यू झाला.

या बातमीनं अवघ्या देशावर जणू बॉम्ब पडला, पण मी हीरो व्हायचो, तो व्हिलन झालो. कारण ती बातमी खोटी ठरली. बा SSपरे! माझ्यावर तोंड लपवून फिरायची वेळ आली, पण पेपर कुठे व कसे तोंड लपवणार? जाईन तिथं ही बातमी सावलीसारखी माझ्या पाठीमागे येत होती. एकदा मी टॅक्सीतून कुठेसा चाललो होतो. एकाएकी ड्रायव्हरने मला विचारले, ‘साब, वो बांद्रा रेप की न्यूज सच है क्या?’

‘ये सवाल तुम मुझे छोडकर दुनिया में और किसी को भी पुछो!’ मी म्हणालो.

ड्रायव्हर माझ्याकडे नुसताच आ वासून बघत राहिला. त्या बातमीचा जनक त्याच्या टॅक्सीत बसलाय हे त्याला बिचाऱयाला कसं कळावं?

आता सांगायला लाज वाटते, पण सांगावे लागणारच. एका प्रसिद्ध मराठी विनोदी लेखकाने ती बातमी मला पुरवली होती. ती खरी असल्याचे त्याने मला गळय़ाशपथ सांगितलं होतं. पण मला थोडी अक्कल नको होती का? हे सगळय़ा जगाला मी त्या बातमीद्वारे बोंबलून सांगण्याची काय गरज होती? बातमीचा ‘सोर्स’ विनोदी लेखक? पोलीस वगैरे काही गोष्ट नसते का? विनोदी लेखकाच्या वक्तव्यावर फार तर हसायचं (हसू तर त्याच्या लिखाणावरही यायचं नाही.) पण त्याची सनसनाटी बातमी कोण करेल? मीच तो गाढव!

पोलीस चौकशीत विनोदी लेखक म्हणाले, ‘मी ते नाटकाचे पॉइंटस् काढले होते. याने मागून घेतले. मी म्हणालोदेखील की हे तुझ्या काय कामाचे…?’

विनोदी लेखकाचे धादांत खोटं विधान ऐकून ही धरणी दुभंगून मला पोटात का घेत नाही असे मला झाले. या विनोदी लेखकाचा सूड म्हणून मी पुढे विनोदी लिहायला लागलो असेन का?

सरकारने माझ्यावर (व अर्थातच वृत्तपत्रावर) खटला भरला. जोडीने माझी खातेनिहाय चौकशी सुरू झाली. अरे रामा! चौकशीआधी मला अन्न जायचं नाही व चौकशीनंतर अन्नावरची वासनाच उडायची. दरम्यानच्या काळात माझी पत्रकारिता (?) चालूच होती. पोलिसांनी मला फैलावर घेतले. मला वेडेवाकडे, आडवेतिडवे प्रश्नही विचारले, पण मला एकदाही बोट लावले नाही. वर चहाही पाजला. हा गुन्हेगार नाही हे (फक्त) पोलिसांनी ओळखले होते. गॉड ब्लेस देम!

खातेनिहाय चौकशीत माझ्यावरील ‘ग्रॉस निग्लेट’ (सरासर दुर्लक्ष वा हेळसांड) हा आरोप सिद्ध झाला. त्याबद्दल शिक्षा म्हणून पस्तीस रुपयांचे माझं वार्षिक ‘इक्रिमेंट’ तीन वर्षांसाठी थांबवण्यात आलं होतं.

माझ्या स्मृतीनुसार महाराष्ट्र सरकारनं आमच्या विरुद्ध ‘इंडियन पिनल कोड’च्या 505 (1) कलमाखाली खटला भरला होता. माझ्यावर आरोप होता – Inciting people to revolt against the state.’ म्हणजे देशाविरुद्ध उठाव करण्यासाठी लोकांना भडकवणे.

अन् माझा दिवंगत सहकारी दिनकर रायकर व ‘बॉम्बे युनियन ऑफ जर्नांलिस्ट’ यांच्या निःस्वार्थी प्रयत्नांमुळे तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांनी खटला मागे घेतला. मी सुटलो.

माझा एक मित्र म्हणाला, ‘‘तू खोटी बातमी दिलीस तर एवढा गदारोळ झाला. उद्या खरी बातमी दिलीस तर काय होईल?’’