विज्ञान-रंजन – सूरमय कला-विज्ञान

>> विनायक

उत्सवाच्या  दिवसांत वाद्यांचा गजर हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. एकूणच मानवी संस्कृतीमध्ये जगभर विविध प्रसंगी गायन-नर्तन या गोष्टींचा अंतर्भाव असतो. अगदी लोकनाटय़ाच्या आरंभी ‘गणपती आला आणि नाचुनि गेला’ अशी संकल्पना असते. प्राचीन कथांमध्येही तुंबरू, यक्ष, किन्नर नृत्यगान करतात असं म्हटलेलं असतं. शिवतांडवाच्या वेळी नटेश्वराच्या हाती तडतडणारा डमरू असतो, तर सरस्वती आणि नारद यांच्या हाती वीणा, एकतारी असते. अनेक पारंपरिक मिरवणुकांमध्ये ढोल-ताशा, लांब आकाराची सनई वाजते. लग्नकार्यात सनई-चौघडा असतो. खंडोबाचे गुणगान संबळेच्या साथीने होते. बऱ्याच ठिकाणी पूजेपूर्वी शंख फुंकला जातो. एवढंच काय, युद्धकाळात सैन्याला प्रोत्साहन देणाऱ्या रणभेरीही वाजतात. रणांगणावरही शंखनादाने प्रारंभ करण्याची महाभारतीय कल्पना ठाऊकच आहे. नादवाद्यांचा इतिहास हजारो वर्षांपासूनचा आहे.

माणूस समूहात असो नाहीतर एकटा, एखाद्या वाद्याचे सूर त्याला मोहात पाडतात. समूहात ते स्फूर्ती देतात, तर एकांतात सोबत करतात. आत्मानंद देतात. गाई चरायला नेणारा गुराखी पावा वाजवतो आणि त्याचे सूर त्या मुक्या जनावरांनाही कळतात. सृष्टीचं, पशुपक्ष्यांचं निसर्गाचंही ‘संगीत’ असतंच. वेळूच्या बनातून वाऱ्याने आपोआप निर्माण केलेले ‘बासरी’चे सूर प्राण्यांनाही जाणवतात. डॉल्फिनसारखे बुद्धिमान जलचर संगीताला प्रतिसाद देतात आणि ध्वनी संवेदनांची अनुभूती घेणाऱ्या वनस्पतींवरही त्यांचा इष्ट परिणाम होतो असं म्हणतात. म्हणूनच अलीकडे सुरांचा ‘थेरपी’ किंवा उपचार पद्धती म्हणूनही वापर केला जातो.

या सप्तसुरांच्या कलेमागेही निश्चित विज्ञान दडलेलं असतं. कला आणि विज्ञान विभाग हे अभ्यासक्रमापुरते ठीक असले तरी जीवनाच्या प्रत्येक गोष्टीमागे समजणारे तर कधी आजपर्यंत न समजलेले विज्ञान असते. त्याचाच शोध संशोधक घेत असतात. म्हणून तर कालपर्यंत ‘अगम्य’ वाटणाऱ्या गोष्टी आज सहज स्वीकारल्या जातात. ‘ग्रहण’ ही काही भयंकर गोष्ट नसून सूर्य-पृथ्वी-चंद्र यांचा सहज घडलेला ‘खेळ’ आहे हे आता सर्वसामान्यांच्याही लक्षात येतं. त्याचबरोबर समाजोपयोगी वैज्ञानिक संशोधन कलात्मक पद्धतीनेच सादर होत असतं. वर्णपटाचे सात रंग विज्ञान सिद्ध करते, पण त्याचा सुयोग्य मेळ घालून त्यातून चितारलेले चित्र ही कलाकृती ठरते. वाहनाची चॅसी आणि इंजिन विज्ञान बनवतं, पण आकार देखणा असल्याविना वाहन ग्राहकापर्यंत पोहेचणारच नाही. तेव्हा कला आणि विज्ञान यांचं हे ‘अद्वैत’ समजून घेतलं तर बरेच वाद टळतील. अगदी शाईने लिहिणं, कॉम्प्युटरवर ‘ऑपरेट’ करणं किंवा भाषण-संभाषण करणं यामागे कला आणि विज्ञानही आहेच. त्यातून एकच ‘शाई’ वापरून दोन लेखकांची वेगळी ‘शैली’ तयार होते आणि भाषेतले तेच शब्द वापरून वक्ता आपले भाषण खुलवत असतो. विज्ञान आणि रंजन यांचा मिलाफ जीवनात कळत-नकळत, पण ठायी ठायी आढळतो.

गणपती उत्सव सुरू आहे. अनेक ठिकाणी ढोल-ताशे वाजत असतील. काही ठिकाणी गेल्या पन्नास वर्षांत आलेली विदेशी वाद्यंही ऐकू येतील. यातील आवश्यक डेसिबलची मर्यादा पाळण्याचं आवाहन सारेच करतील. सुस्वरांनी स्वरमेळ असेल तर वातावरण भारावून जातं. तसा सध्याचा उत्सवी काळ आहे.

आपल्या देशातलं आदिवाद्य म्हणजे शिवशंकराच्या हातातील डमरू असं मानलं जातं. प्राण्याच्या चामडय़ाचा वापर करून जी वाद्यं बनवतात त्यात डमरू, ढोल, चौघडा, ढोलकी, मृदंग, तबला अशी अनेक वाद्यं येतात. हल्ली बॉन्गो-कोन्गोसाठी सिंथेटिक कापडाचाही वापर होतो. वीणा, एकतारी, सतार, संतूर, गिटार, सरोद अशी वाद्यं धातूच्या तारांनी बनतात. या सर्वांमध्ये ताणलेल्या कातडय़ावर किंवा तारेवर मंद आघात करून (तार छेडून) ‘रेझोनन्स’च्या तत्त्वावर ध्वनी आणि त्यातून स्वर निर्माण केले जातात. सारंगी आणि व्हायलिनसारखी तंतुवाद्यं तर अक्षरशः ‘गातात’. यातलं वैज्ञानिक तत्त्व आवश्यक असलं तरी त्यातून निर्माण होणारा आविष्कार ही कला असते. वाद्य हाती दिलं म्हणून ते सहज कुणाला वाजवता येईल असं नाही.

आदिवाद्यांपैकी असलेली बासरी (बासुरी, पावा) आदिवासींचा तारपा, नंतरच्या काळातील तुतारी, शिंग, सनई, बॅगपाइप अशी अनेक वाद्यं प्रमाणित फुंकर घालून श्वासशक्तीवर कौशल्याने वाजवणारे कलाकार असतात. त्यामध्ये वाद्यात हवा किती भरायची आणि छिद्रांवर ताबा ठेवत ती वाद्यातून किती सोडायची यावर स्वरनिर्मिती, मंजुळता ठरते. ते साधलं की, बासरीही गाते!

स्वरनिर्मितीसाठी हवा भरणाऱ्या चुणीदार पडद्याचा वापर करून पेटी म्हणजे संवादिनी वाजते. तसंच ‘ऍकॉर्डियन’ हे आता अस्तंगत होत चाललेलं वाद्यही वाजतं. यात सूरनिर्मितीसाठी पुन्हा हवेचा योग्य भरणा आणि उत्सर्जन ही वैज्ञानिक गोष्ट असली तरी पेटीवरच्या ‘कळा’ योग्य प्रकारे जाणून त्यातून संतोतंत सूरनिर्मिती करणं ही वादकाची कला असते. आपल्याकडे गोविंदराव टेंबे, गोविंदराव पटवर्धन, तुळशीदास बोरकर अशा अनेक कलाकारांनी संवादिनीची गोडी रसिकांना लावली. थिरकवांपासून, झाकीर हुसेनपर्यंत तबला नवाजांनी तबला बोलका केला. ‘चलो मच्छिंदर गोरख आया’ हे बोल तर नाथपंथीयांनी मृदंगातून काढले. ‘टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग’ या पद्धतीने विठ्ठलाच्या दारी अभंग रंगले. पन्नालाल घोष ते हरिप्रसाद चौरसियांपर्यंत अनेकांनी श्रीकृष्णाची बासरी जनसामान्यांपर्यंत पोहोचवली. आता सिंथसायझर, ऑक्टापॅडसारख्या आधुनिक वाद्यांमधूनही उत्तम स्वरमेळ उमटतोच. विज्ञान आणि कलेचा प्रवास असा साथसंगतीने चालतो. आपण ‘सा-रे-ग-म-प-ध-नी’ असे सात सूर शिकतो, तर पाश्चात्त्य शास्त्रीय संगीतातही तेच बेसिक स्वर ‘डो-रे-मी-फा-तो-ला-टी’ असे होतात. हे सुरांचं वैश्विकत्व जाता जाता लतादीदींनी अमर केलेलं. शांता शेळके यांचं हृदयनाथांनी संगीत दिलेलं ‘गणराज रंगी नाचतो’ हे गाणं आठवणं या वेळी योग्य ठरेल.