
>>सुरेश चव्हाण
‘नेत्रदान’ हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. मात्र आपल्या समाजाला अजूनही याची फारशी जाणीव झालेली नाही. गडहिंग्लज तालुक्यातील ‘अत्याळ’ या गावातील लोकांमध्ये ही जाणीव जागृत झाली. 2012 सालापासून ‘अंधांना डोळे व डोळसांना दृष्टी’ या ब्रीदवाक्यावर आधारित सुरू असलेल्या या चळवळीच्या माध्यमातून आजवर 100 जणांचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे. परस्परांपासून दुरावणारी गावागावांतील माणसं एकमेकांना जोडली जावीत हा या चळवळीचा गाभा आहे.
गडहिंग्लज तालुक्यातील अत्याळ गावात ‘एक गाव, एक गणपती’ या उपक्रमांतर्गत गणेशोत्सव साजरा केला जातो. या उत्सवासाठी गाव एकत्र येते, पण हे एकत्र येणे त्या उत्सवापुरतेच मर्यादित असायचे. याचदरम्यान काही गावकऱयांच्या मनात गावाची वेगळी ओळख निर्माण करणारा कायमस्वरूपी काहीतरी उपक्रम राबवला जावा असा विचार पुढे आला व त्यातूनच ‘नेत्रदान चळवळी’च्या संकल्पनेचा उदय झाला. गावाला पुरोगामी विचारांचा वारसा आहे, पण आपल्या पिढीनेही त्यात भर घातली पाहिजे, हा मुद्दा गावकऱयांना पटवून देण्यात आला. तेव्हा लगेच 29 ऑक्टोबर 2012 रोजी ज्येष्ठ विचारवंत अॅड. गोविंद पानसरे यांच्या उपस्थितीत चळवळीला सुरुवात करण्यात आली.
कोणत्याही सामाजिक कार्याची सुरुवात व्यक्ती किंवा संस्था पातळीवर होते, पण नेत्रदान चळवळीसाठी विचार करण्यात आला तो असा की, व्यक्ती किंवा संस्थेला महत्त्व न देता गावपातळीवर कामाची उभारणी करायची. प्रत्येक ग्रामस्थ या चळवळीचा कार्यकर्ता असे सूत्र ठरविण्यात आले. नेत्रदानात शासकीय अथवा सेवाभावी संस्थांचे काम संकल्पपत्र (फॉर्म) भरून घेण्यापर्यंतच थांबत होते, परंतु अत्याळकरांनी प्रबोधनाच्या माध्यमातून त्यापुढचे काम करण्याचा निर्धार केला. चळवळीसाठी गडहिंग्लज येथील नेत्ररोगतज्ञ डॉ. सदानंद पाटणे यांचे तांत्रिक सहकार्य मिळाले. त्यांचे हे योगदान मोलाचे आहे.
अवयवदानाबाबत समाजाची मानसिकता लक्षात घेता पहिल्या वर्षभरात एका नेत्रदानाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, परंतु चळवळीच्या उद्घाटनानंतर दुसऱयाच दिवशी माजी सरपंच जयसिंग पाटील यांच्या मातोश्री पद्मावती यांचे निधन झाले. सामाजिक वारसा लाभलेल्या जयसिंग पाटील यांनी आपल्या आईचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. हाच निर्णय चळवळीसाठी महत्त्वाचा ठरला. या नेत्रदानातून ग्रामस्थांचे प्रबोधन होऊन गैरसमज दूर झाले. वर्षभरात एकापाठोपाठ सात ग्रामस्थांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. ग्रामस्थांचे ऐक्य आणि चळवळीवरील विश्वासामुळे ही चळवळ इतर गावांतही पसरली आहे. अत्याळशेजारच्या करंबळी, बेळगुंदी, भडगाव, कौलगे, ऐनापूर, सरळी या गावांमध्ये चळवळीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. मरणोत्तर नेत्रदान चळवळीच्या माध्यमातून अंधांना दृष्टी देण्याचे काम सुरू आहे, पण दुसऱया पातळीवर माणसाला माणूस जोडण्याचेही काम सुरू आहे. व्यक्ती, संस्था या पारंपरिक साचाला फाटा देऊन गावपातळीवर राबवलेली कदाचित ही पहिली चळवळ असावी.
पैशांच्या वादातून अनेक चांगली सामाजिक कामे मोडीत निघाल्याचा इतिहास आहे. त्यातून बोध घेऊन नेत्रदान चळवळीसाठी ‘झीरो बॅलन्स’चे सूत्र अवलंबले आहे. चळवळीतील उपक्रमांसाठी आगाऊ देणगी गोळा करण्याऐवजी गरजेइतकीच देणगी स्वीकारली जाते. चळवळीच्या विविध कार्यक्रमांमध्ये केवळ प्रमुख पाहुण्यांची खुर्ची व्यासपीठावर असते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ हा भेदभाव गळून पडतो व आपण सारे एक आहोत, ही भावना वाढीस लागते. इथे फक्त नेत्रदात्याच्या कुटुंबीयांचाच गौरव होतो. त्यांच्या त्यागाला सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे. कोणत्याही स्वार्थाशिवाय सामाजिक कार्य करण्याची भावना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये रुजावी हाच यामागील हेतू आहे.
नेत्रदान करण्याची नातेवाईकांची इच्छा नसेल तर नेत्रदान घेता येत नाही. तसेच या चळवळीत मृत व्यक्तीचे संकल्पपत्र (फॉर्म) भरलेले नसतानाही नेत्रदान करता येते. त्यासाठी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांची संमती असणे आवश्यक असते. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी नेत्र बँक, नेत्रदान केंद्र किंवा नेत्रदान चळवळीतील कार्यकर्त्यांकडे नेत्रदानाची इच्छा व्यक्त केल्यानंतर नेत्रदान प्रक्रियेला सुरुवात होते. नेत्रदानाची ही प्रक्रिया अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये पार पडते. हॉस्पिटल किंवा अगदी स्मशानभूमीमध्येही मयत व्यक्तीचे नेत्र घेता येते.
नेत्रदानातून मिळालेली बुबुळं (कॉर्निया) नेत्रपेढीत जमा करून ठेवता येतात. नेत्रदानानंतर पंधरा दिवसांपर्यंत अंध व्यक्तीवर नेत्र प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करता येते. नेत्र प्रत्यारोपणासाठी ही बुबुळं विनामूल्य पुरविली जातात. एका मृत व्यक्तीच्या नेत्रदानातून दोन अंधांना दृष्टी देता येते, पण सर्वच अंध व्यक्तींना नेत्र प्रत्यारोपणातून दृष्टी देता येत नाही. बुबुळं खराब झाल्यामुळे दृष्टी गेलेल्या व्यक्तीलाच नेत्र प्रत्यारोपणाने दृष्टी देता येते. अन्य कारणांनी अंधत्व आलेल्या व्यक्तींना नेत्र प्रत्यारोपणाच्या माध्यमातून दृष्टी देता येत नाही. अशा दृष्टिहीनांचा समाजातील वावर सुकर होण्यासाठी गडहिंग्लज येथे ऑक्टोबर 2022 पासून नेत्रदान चळवळीचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. यामध्ये कार्यशाळा तसेच अंधांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार निर्मिती केंद्रही सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात अंध बांधव एलईडी बल्ब्स, एलईडी माळा, चार्जिंग बल्ब्स तयार करत आहेत. शिवाय अंधांना कापडी पिशवी व कागदी बॅग तयार करण्याचे प्रशिक्षणही दिले जात आहे.
एका व्यक्तीच्या मरणोत्तर नेत्रदानाने एकापेक्षा अधिक व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. त्यामुळे मृत व्यक्तीकडून सत्कार्य घडू शकते. आपल्या देशात दरवर्षी सुमारे एक लाख डोळ्यांची आवश्यकता भासते, तर प्रत्यारोपणासाठी केवळ वीस हजार डोळे नेत्रदानातून उपलब्ध होतात. ही तूट भरून काढत अंधांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये मरणोत्तर नेत्रदानाबाबत जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे.