मुद्दा – स्मृती बिश्वास

>>  दिलीप ठाकूर

आपल्या देशातील चित्रपटसृष्टीतील अलिखित नियम फार विचित्र आहेत. येथे झगमगाटात असलेला कलाकार चित्रपटाचे जग, प्रसार माध्यमे व चित्रपट रसिक यांचे कायमच लक्ष वेधून घेत असतो, पण एकदा का तो वयपरत्वे उताराला लागला, आपले खासगी आयुष्य जगू लागला की, त्याच्याकडे फारसे कोणाचे लक्ष जात नाही आणि अचानक एके दिवशी त्या कलाकाराच्या निधनाची बातमी येते आणि आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला चित्रपटसृष्टीच्या चौफेर इतिहासातील एका कर्तृत्ववान कलाकाराची माहिती व महती समजते. एकेकाळी ‘मॉडर्न गर्ल’ म्हणून चर्चेत राहिलेल्या अभिनेत्री स्मृती विश्वास – नारंग यांचे नाशिक येथे वयाच्या 100व्या वर्षी नाशिक रोड येथील निवासस्थानी निधन झाले तेव्हा काहीसे तसेच झाले.

स्मृती बिश्वास म्हणजे चित्रपटसृष्टीचा एक खूप मोठा फ्लॅशबॅक. 1930 ते 1960 या काळात हिंदी, बंगाली चित्रपटसृष्टीत त्यांचा वावर होता. त्या काळात प्रसार माध्यमांची संख्या फारशी नसल्याने पडद्यावरचे कर्तृत्व जास्त महत्त्वाचे असे. तेच कलाकाराला त्याची ओळख मिळवून देत असे. स्मृती बिश्वास यांनी 1930 मध्ये ‘संध्या’ या बंगाली चित्रपटातून बालकलाकार म्हणून चित्रपट क्षेत्रात पाऊल टाकले, तर 1960 मध्ये ‘मॉडर्न गर्ल’ हा शेवटचा हिंदी चित्रपट केला. पृष्णधवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटाच्या काळातील त्या अभिनेत्री होत. जवळपास नव्वदहून अधिक बंगाली – हिंदी चित्रपटांतून त्यांनी काम केले. स्मृती बिश्वास यांनी स्वातंत्र्यापूर्वी काही काळ लाहोर येथेही चित्रपटसृष्टीत काम केले होते. अखंड हिंदुस्थानच्या काळात लाहोर हेदेखील हिंदी चित्रपट निर्मितीचे एक प्रमुख महत्त्वाचे पेंद्र होते. स्मृती विश्वास या बंगाली होत्या, तर त्यांचे पती चित्रपट निर्माते एस. डी. नारंग होते. त्यांच्या पश्चात दोन मुलं आहेत. चित्रपटसृष्टीपासून दूर गेल्यावर त्यांना अतिशय गरिबीत दिवस काढावे लागले. अशा पडद्याआड गेलेल्या कलाकाराकडे चित्रपटसृष्टी फारसे लक्ष देत नाही हे अनेकदा तरी दिसून येते. स्मृती बिस्वास यांनी एकेकाळी देव आनंद, गुरुदत्त, व्ही. शांताराम, बिमल रॉय, मृणाल सेन, बी.आर. चोप्रा आणि राज कपूर यांच्या चित्रपटांमध्ये लहानमोठय़ा भूमिका साकारल्या. किशोर कुमार आणि भगवानदादा या दोघांसह अनेक चित्रपटांतून त्यांनी भूमिका साकारल्या. चित्रपटसृष्टीत मानाच्या मानल्या जात असलेल्या फिल्मफेअरची कव्हर गर्ल म्हणूनही त्यांना एकदा स्थान मिळाले. स्मृती बिस्वासने चित्रपट निर्माते व दिग्दर्शक एस. डी. नारंग यांच्याशी लग्न करून अकाली निवृत्ती घेतली. लग्नानंतर लगेच त्यांनी अभिनय संन्यास घेतला याचं कारण लग्नाच्या दिवशी नारंग यांनी ‘‘मला अभिनेत्री नाही, तर पत्नी हवी आहे’’ असे ठामपणे सांगितले.

कालांतराने चित्रपटसृष्टीपासून खूपच दूरवर गेलेल्या स्मृती बिस्वास यांना अंजू महेंद्रूने शोधून काढले. त्यानंतर चित्रपट निर्माते शिवेंद्रसिंग डुंगरपूर यांनी त्यांना मदत केली. चित्रपटसृष्टीतील सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनकडून (CINTAA) स्मृती बिस्वास यांच्यासाठी निधी उभारण्याचाही प्रयत्न झाला.

एका मुलाखतीत स्मृती बिस्वास यांनी म्हटले होते की, “माझ्या नवऱयाला आपल्या मुलांसाठी आई हवी होती म्हणून मी होकार दिला आणि तिसऱया मजल्यावरील माझ्या घरात आमचा एक मोठा सेट होता – एक सीन शूट करण्यासाठी आणि दुसरा नृत्यासाठी. हेमा मालिनी, रेखा, हेलन, रिना रॉय, राजेश खन्ना आणि सुनील दत्त तिथे अनेकदा यायचे.’’

एस. डी. नारंग हे व्यावसायिक चित्रपटाचे निर्माते होते. त्यांनी जितेंद्र आणि बबिता यांच्यासोबत ‘अनमोल मोती’ (1969) हा भारतातील पहिला ‘अंडरवॉटर चित्रपट’ म्हणून ओळखला जाणारा चित्रपट निर्माण केला, पण त्याचे बरेचसे चित्रीकरण जुहू येथील त्यांच्या बंगल्यातील स्विमिंग पूलमध्ये करण्यात आले, अशीही एक आठवण त्यांनी सांगितली होती. मात्र हा चित्रपट अपयशी ठरला. स्मृती बिस्वास यांनी भूमिका साकारलेल्या चित्रपटांत ‘भागमभाग’, ‘ताज’, ‘मर्यादा’, ‘तलवार’ अशा अनेक चित्रपटांचा समावेश होतो.