रंगरंगोटी – रंगदेवतेचे संस्कार

453

>>  उदय तांगडी

रंगभूषा या कलेनेच मला शिकवले. या संस्कारांचे हात धरून काम सुरू आहे. कलाकारांचे भूमिकेत रूपांतर करण्यासाठी रंगभूषा या कलेचा महत्त्वाचा सहभाग असतो. वय, व्यवसाय, लिंग अशा ढोबळ गोष्टींपासून स्वभावातल्या बारीक-सारीक व्यक्तिरेखेच्या अनेक गोष्टी प्रेक्षकांपर्यंत रंगभूषाकार पोहचवतो. माझं लहानपण वरळी बीडीडी चाळीतून झाले. वरळीमधील ‘सूर प्रवाह’ या संस्थेतून काम करू लागलो. तेव्हापासूनच बालनाट्यात काम करत होतो, तेव्हा एका प्रयोगाकरिता आमचे रंगभूषाकार उशिरा आले. मी त्यांना विचारलं की, मी तुम्हाला काही मदत करू का? ते हो म्हणाले आणि माझा ‘रंगभूषाकार’ म्हणून प्रवास सुरू झाला.

देवीदास पितळे यांच्याकडे रंगभूषा शिकण्यासाठी जाऊ लागलो.  आविष्काराच्या ‘दुर्गा झाली गौरी’ या नाटकाने सुरुवात झाली. माझं पहिलं व्यावसायिक नाटक ‘गेला माधव कुणीकडे’. त्यानंतर  ‘जाऊबाई जोरात’ या नाटकाने मला रंगभूषाकार म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली. याचे बाराशेहून अधिक प्रयोग झाले. ‘श्यामची मम्मी’, ‘पाच पांडवांचा बाप’, ‘गंगुबाई मॅट्रिक पास’, ‘आमचं सगळं सात मजली’, ‘कहानी में ट्विस्ट’, ‘पती सगळे उचापती’, ‘बायांनो नवरे सांभाळा’,  ‘घालीन लोटांगण’, ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत संत तुकाराम’ अशी बरीच नाटकं केली आणि करत आहे. बर्‍याच कलाकारांसोबत काम करण्याची संधी मला या कलेमुळे मिळाली. आजही नाट्य स्पर्धेत भाग घ्यायला मला खूप आवडतं. हौशी नाट्य स्पर्धा, कॉलेज मुलांच्या नाट्य स्पर्धा मी अजूनही आवडीने करतो.

नाटकांमध्ये रंगभूषाकाराला खूप काही वेगळं करायला मिळतं आणि त्यासाठी रिटेक नसतो. एक जिवंतपणा असतो. ऐतिहासिक, प्राणी, भूत, चेटकीण, म्हातारा, म्हातारी असे गेटअप करायला खूप आवडतं. नाटक घडण्यासाठी कलाकार तंत्रज्ञासह रंगभूषाकार हा महत्त्वाचा घटक असतो.

uday-tangad-2

एक किस्सा सांगतो की, ‘कहानी में ट्विस्ट है’ या नाटकामध्ये डॉ. गिरीश ओक यांना एका एक्झिटनंतर संपूर्ण बाईचा गेटअप करायचा होता. तो झाल्यानंतर ते रंगमंचावर गेल्यावर प्रेक्षकांमधून टाळ्यांचा कडकडाट होत असे. त्यावेळी खूप समाधान वाटायचे.

माझे गुरू देवीदास पितळे आणि दत्ता भाटकर आमच्या संस्थेसाठी रंगभूषा करायचे, मी त्यांच्याबरोबर आजही काम करत आहे आणि शिकत आहे. त्यांच्याकडून मला बर्‍याच नवनव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. कोणत्याही कलेत गुरूवाचून दैवत नाही! या कलेसाठी माझे हेच गुरू, असं मी मानतो.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या