नाटक हाच माझा श्वास

मंगेश दराडे

व्यक्तिरेखा लहान असो वा मोठी, प्रत्येक भूमिकेत वेगळेपण आणून ती भूमिका अधिक जिवंत करणारे सशक्त अभिनेते म्हणजे अरुण नलावडे. आगामी ‘ताटवा’ या चित्रपटात अभिनयासोबत त्यांच्या दिग्दर्शनाचेही वेगळेपण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपट आणि मालिकांच्या बिझी शेडय़ूलमधूनही त्यांनी रंगभूमीकडे दुर्लक्ष केले नाही. रंगभूमी हाच आपला ‘श्वास’ असल्याचे ते आवर्जून सांगतात.

गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटांत नवनवीन विषय मांडण्याचे धाडस निर्माते दाखवत आहेत. असाच वेगळ्या धाटणीतला चित्रपट ‘ताटवा’. या चित्रपटात दुर्लक्षित अशा पाथरवट समाजातील समस्यांवर भाष्य करण्यात आले आहे. नावाप्रमाणेच चित्रपटाचे कथानकही वेगळे असणार यात शंका नाही.

कथानकाविषयी अरुण नलावडे म्हणतात, ‘ताटवा’ या शब्दाचा अर्थ कुंपण असा होतो. दुर्लक्षित अशा पाथरवट समाजातील समस्यांवर हा चित्रपट भाष्य करतो. या समाजातली होतकरू मुलगी शिक्षणामुळे सगळी कुंपणं तोडून पुढे जाते असे चित्रपटाचे कथानक आहे. यात मी त्या मुलीला शिल्पकलेचे प्रशिक्षण देणाऱया प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे. चित्रीकरणाच्या अनुभवाविषयी ते म्हणाले की, चंद्रपूरच्या ४०ते ४५ अंश सेल्सियसच्या रखरखत्या उन्हात चित्रपटाच्या संपूर्ण युनिटने काम केले. वेगळेपण म्हणजे स्थानिक कलाकारांनीही यात भूमिका केल्यात.

या चित्रपटात अभिनयासोबत दिग्दर्शनातही अरुण नलावडे यांनी दिग्दर्शनाचीदेखील धुरा सांभाळली आहे. दिग्दर्शनाबाबतच्या अनुभवाबाबत ते सांगतात की, दिग्दर्शक म्हणून हा माझा चौथा चित्रपट. सुरुवातीला मी या चित्रपटात फक्त अभिनय करणार होतो; परंतु निर्मात्या डॉ. शरयू पाझारे यांनी, ‘तुम्हीच या सिनेमाचे दिग्दर्शन करणार का?’ असे विचारले. विषयात नावीन्य असल्यानेच मी दिग्दर्शनाला होकार दिला. चित्रपट असो वा मालिका, त्यांच्या प्रत्येक भूमिकेत वेगळेपण जाणवते. एखादी भूमिका निवडताना ती भूमिका आपल्या अभिनयाचा कस लावणारी असेल तरच ती स्वीकारण्यात खरी गंमत असल्याचे त्यांनी नमूद केले.

चित्रपट, मालिका, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये अरुण नलावडे यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. यापैकी तुमचे आवडते माध्यम कोणते हे विचारल्यावर एका क्षणाचाही विलंब न लावता नाटक हाच आपला ‘श्वास’ असल्याचे ते नम्रपणे सांगतात. प्रत्येक माध्यमाची काम करण्याची पद्धत वेगळी असली तरी नाटकात काम करायला आपल्याला आवडत असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्याच्या मालिकांबद्दल विचारले असता ते म्हणाले की, पूर्वीच्या आणि आताच्या मालिकांमध्ये खादी आणि टेरिकॉटमधला फरक आहे. पूर्वी मालिकांमध्ये सुरुवात ते शेवट छान गोष्ट असायची आता मात्र ऐन वेळी स्क्रिप्टमध्ये बदल केले जातात.

मालिकांच्या कार्यपद्धतीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. सध्या मालिकांमधले कलाकार हे यंत्रासारखे काम करतात. पूर्वीच्या मालिकांमध्ये लेखक-दिग्दर्शकाला स्वातंत्र्य होते. आता हे स्वातंत्र्य हरवले असून डेली सोपच्या गणितात अनेक कलाकार आणि तंत्रज्ञांची  क्रिएटिव्हीटी हरवत चाललीय अशी खंत व्यक्त करतानाच कामाच्या अतिरिक्त ताणामुळे कलाकारांची प्रकृती ढासळत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

चित्रपटांच्या बजेटपेक्षा त्याची गोष्ट कोटय़वधींची असावी

श्वासनंतर आज मराठी चित्रपट कुठे आहे याबाबत विचारले असता सध्याच्या मराठी चित्रपटांच्या एकूणच परिस्थितीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. मराठीत नावीन्यपूर्ण विषय, नवनवीन प्रयोग होत असले तरी आज मराठी सिनेमा ९० टक्के खर्चामध्ये अडकला असून बजेटच्या तुलनेत रिकव्हरी होत नसल्याची खंत व्यक्त करत निर्मातेच टिकले नाहीत तर सिनेमा येणार कुठून असा सवाल त्यांनी उपस्थित केला. चित्रपटाच्या बजेटपेक्षा चित्रपटाचा विषय कोटय़वधींचा असावा. तरच लोक आवर्जून गर्दी करतील, असेही नलावडे सांगतात.

नाटकाचा व्यायाम गरजेचा

कलाकाराने व्हर्सटाइल असायला हवे. मालिका आणि सिनेमांमध्ये काम करण्यापूर्वी नवोदित कलाकारांनी नाटकात काम करणे गरजेचे आहे. रंगभूमी नवोदित कलाकारांना एक प्रकारे व्यायाम देण्याचे काम करते. संवादफेक, देहबोलीचा योग्य वापर अशा गोष्टी नाटकांतूनच शिकायला मिळतात. थेट मालिकांमध्ये काम करणाऱया कलाकारांना इंडस्ट्रीत टिकणे अवघड असल्याचे मत नलावडे यांनी व्यक्त केले.