अरुण रहाणे

प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत कलासाधना हेच जीवन मानणारे संवेदनशील रंगकर्मी, प्रख्यात नेपथ्यकार, कलादिग्दर्शक अरुण रहाणे यांचे अकाली जाणे नाटय़ व चित्रपटसृष्टीसाठी मोठी हानी आहे. रहाणे यांनी ५५हून अधिक मराठी चित्रपट, तीन हिंदी चित्रपटांसह मालिकांचे कलादिग्दर्शन केले, ३८हून अधिक नाटकांसाठी नेपथ्यकार म्हणून जबाबदारी सांभाळत या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविला होता. त्यांनी ‘राजमाता जिजाऊ’ या चित्रपटातील शिवराज्याभिषेक, वाडा व किल्ले, तसेच ‘तोचि एक समर्थ’ चित्रपटासाठी कागदाचा वापर करून साकारलेला स्वामींचा जुना मठ असे अनेक वास्तववादी सेट सृजनशीलतेचा आविष्कार घडविणारे होते. अरुण रहाणे हे मूळचे नगर जिह्यातील पुणतांबे येथील. वडिलांच्या अकाली निधनानंतर आईने मोठय़ा कष्टाने शेती करीत त्यांना सांभाळले. दहावीपर्यंत पुणतांब्यात शिक्षण घेतल्यानंतर नगरच्या प्रगत महाविद्यालयातून फाउंडेशन, त्यानंतर ‘अभिनव’मधून जी.डी.आर्ट शिक्षण पूर्ण केले. वडिलांकडून चित्रकलेचा वारसा त्यांना मिळाला, पुढे महाविद्यालयीन जीवनातच त्यांची नेपथ्य कलेची ओढ वाढली. त्याच ध्यासातून उत्तम नेपथ्य साकारत राज्य नाटय़ स्पर्धेत सलग पाच वर्षे त्यांनी पारितोषिकांवर मोहोर उमटवली. पुढे १९८१ला ते नाशिकमध्ये दाखल झाले. दिवसभर कंपनीत वॉचमन आणि रात्री साईन बोर्ड पेंटिंगचे काम करीत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष केला. नेपथ्यकलेची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. १९८३मध्ये त्यांनी रंगभूषाकार माणिक कानडे, हरिभाऊ जाधव, किशोर भवाळकर यांच्यासह सन्मित्र संस्था स्थापन करून नाटय़ क्षेत्रात पदार्पण केले. अनेक नाटके सादर केली. ‘खजिन्याची विहीर’ नाटकाचे नेपथ्य पाहूनच त्यांच्याकडे चित्रपटाच्या कलादिग्दर्शनाची संधी चालून आली. तोचि एक समर्थ हा त्यांचा कलादिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता. सावरखेड एक गाव, राजमाता जिजाऊ, जय सप्तशृंगी माता, सनई चौघडे, जत्रा, कवडसे, बकुळा नामदेव घोटाळे, ब्लाईंड गेम, निशाणी डावा अंगठा, उमंग, ऑक्सिजन, वंशवेल यांसह ५५हून जास्त चित्रपटांचे कलादिग्दर्शन केले. नाशिकचे नाव मराठी चित्रपटसृष्टीत उंचावण्यासाठी आणि नाशिकमध्ये चित्रपट महामंडळाचे कार्यालय व्हावे यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे.