अरुणाचल प्रदेशात आमदार तिरोंग अबोंसह 11 जणांची गोळय़ा घालून हत्या

सामना ऑनलाईन। इटानगर

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्प्याला 48 तास उलटत नाहीत तोच एका आमदारासह त्याच्या कुटुंबातील 11 जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना अरुणाचल प्रदेशातील तिराप जिह्यातील बोगापाणी गावात घडली. या हल्ल्यामागे नॅशनल सोशलिस्ट काऊन्सिल ऑफ नागालँड (एनएससीएन) या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. परंतु अधिकृतरीत्या सरकारने तशी घोषणा केलेली नाही.
अरुणाचल प्रदेशातील खोंसा पश्चिम मतदारसंघातील नॅशनल पिपल्स पार्टीचे आमदार तिरोंग अबो यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. तिरोंग आपल्या बोगापाणी गावात आल्यानंतर त्यांच्या गाडीवर काही अज्ञातांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. यात तिरोंग यांच्यासह 11 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर गाडी पेटवून दिली. मरणाऱयांमध्ये दोन सुरक्षारक्षकांचाही समावेश आहे.

दोषींवर कडक कारवाई करणार
मेघालयचे मुख्यमंत्री कोनराद संगमा यांनी या घटनेप्रकरणी दुःख व्यक्त केले असून पंतप्रधान कार्यालय आणि गृह मंत्रालयाला या हल्ल्याला जबाबदार अज्ञातांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. संगमा यांनी आपल्या ट्विटद्वारे या घटनेचा निषेध केला आहे. अरुणाचलचे गृहमंत्री कुमाव वाई यांनीही या अबो यांच्यावर आणि परिवारावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.