INDIA अभेद्य! अरविंद केजरीवाल यांची काँग्रेससाठी कौतुकास्पद पोस्ट, कायम पाठिंबा देण्याचा दिला शब्द

arvind-kejriwal-rahul-gandhi

 

INDIA ही विरोधकांची वज्रमूठ तोडण्यासाठी भाजपकडून भांडणं लावण्याचा आटापिटा सुरू असतानाच विरोधकांची एकजूट अभेद्य असल्याचं समोर आलं. दिल्लीत काँग्रेस आणि आप यांच्यात भांडणं लावण्याचा भाजपचे प्रयत्न फसल्याचं दिसत आहे.

दिल्ली सेवा विधेयकावरून संसदेत जोरदार चर्चा झाली. यावेळी काँग्रेस ‘आप’च्या भूमिकेला साथ देणार का अशी शंका होती. मात्र काँग्रेसने ‘आप’ला साथ दिली आणि त्याला प्रतिसाद देत ‘आप’ने आता मिळालेल्या पाठिंब्यासाठी काँग्रेसच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी संसदेत दिल्ली सेवा विधेयकाला विरोध केल्याबद्दल ‘दिल्लीच्या 2 कोटी जनतेच्या वतीने कृतज्ञता’ व्यक्त केली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि मनमोहन सिंग यांना लिहिलेल्या तीन स्वतंत्र पत्रांमध्ये आम आदमी पक्षाच्या (आप) अध्यक्षांनी ‘संसदेच्या आत आणि बाहेर दिल्लीतील लोकांच्या हक्कांचे’ रक्षण केल्याबद्दल त्यांचे कौतुक केलं.

केजरीवाल म्हणाले, ‘संसदेच्या आत आणि बाहेर दिल्लीतील लोकांच्या हक्कांचे समर्थन केल्याबद्दल मी मनापासून कौतुक करू इच्छितो. मला खात्री आहे की आपल्या राज्यघटनेच्या तत्त्वांप्रती तुमची अतुलनीय निष्ठा अनेक दशके स्मरणात राहील’, असं केजरीवाल म्हणाले.

केजरीवाल यांनी पत्रात काँग्रेसला ‘संविधानाचा अवमान करणार्‍या शक्तींविरुद्धच्या लढाईत सतत पाठिंबा देण्याचा’ शब्द दिला आहे.

मनमोहन सिंग यांना लिहिलेल्या पत्रात केजरीवाल म्हणतात की, ‘संसदेतील पाठिंब्यानं देशाची लोकशाही आणि संघराज्य संरचना सर्व अडचणींपासून वाचवण्याची खात्री समोर आली आहे’.

‘तुमच्या वयाच्या आणि आजारी असताना देखील शारीरिक अडचणींना न जुमानता तुमच्या उपस्थितीनं शांतता, कृपा आणि हिंदुस्थानची लोकशाही आणि संघराज्य संरचना टिकवून ठेवण्याच्या दृढ निश्चयाची कहाणी सांगितली. राज्यसभेतील तुमची उपस्थिती देखील लोकशाही कमकुवत करण्यासाठी काम करणार्‍या सर्व शक्तींना स्पष्ट संदेश देणारी होती की अशा कोणत्याही प्रयत्नांना वय आणि पक्षाच्या ओलांडून राजकीय नेत्यांकडून तीव्र प्रतिकार केला जाईल’, असं पत्रात म्हटलं आहे.

त्यांनी असंही लिहिलं आहे की मनमोहन सिंग यांची ‘आपल्या राज्यघटनेच्या तत्त्वांप्रती असलेली अतुलनीय बांधिलकी अनेक दशके स्मरणात राहील आणि संसद सदस्यांच्या आगामी पिढ्यांना प्रेरणा देईल’.

राज्यसभेने सोमवारी दिल्ली सरकारचे NCT (सुधारणा) विधेयक, 2023 मंजूर केले. राष्ट्रीय राजधानीतील नोकरशहांवर केंद्र सरकारचे अधिकार देणारे हे विधेयक वरच्या सभागृहात बाजूने 131 आणि विरोधात 102 मते पडून मंजूर करण्यात आले.

काँग्रेसने आपल्या खासदारांना तीन ओळींचा व्हीप जारी केला होता, ज्यात त्यांना 7 ऑगस्ट रोजी विधेयक मांडले जाईपर्यंत राज्यसभेत उपस्थित राहण्यास सांगितले होते.