सत्येंद्र जैन हेच खरे हिरो; अरविंद केजरीवाल यांनी गळाभेट घेत व्यक्त केल्या भावना

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एलएनजेपी रुग्णालयात दाखल असलेले दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची रविवारी भेट घेतली. जैन आणि केजरीवाल यांची भेट तब्बल एका वर्षांनंतर होत आहे. मनी लॉडरिंग प्रकरणात एक वर्ष न्यायालयीन कोठडीत काढल्यानंतर जैन यांना नुकताच 6 आठवड्यांसाठी जामीन मिळाला आहे.

केजरीवाल यांनी या भेटीचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करत जैन हेच खरे हिरो आणि शूर असल्याचे म्हटले आहे. यावेळी केजरीवाल यांनी जैन यांची गळाभेट घेतली आहे. जैन यांना गुरुवारी चक्कर आल्यानंतर तिहार कारागृहात ते पडले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अहवालानंतर जैन यांना 42 दिवसांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

सत्येंद्र जैन यांना ईडीने मनी लॉडरिंगप्रकरणी 30 मे 2022 रोजी अटक केली होती. त्यानंतर ते तिहार कारागृहात आहेत. वर्षभरानंतर आता त्यांना 6 आठवड्यांचा अंतरिम जामीन मिळाला आहे. त्यानंतर केजरीवाल यांनी रविवारी त्यांची भेट घेतली. तेच खरे हिरो आणि शूर असल्याची भावनाही केजरीवाल यांनी व्यक्त केली.