जरा तरी लाज शिल्लक असेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा – अरविंद सावंत

बदलापूरच्या घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसेनेतर्फे आज अनेक ठिकाणी जन आक्रोश आंदोलनं केली जात आहेत. या आंदोलनाच्या ठिकाणी बोलताना शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे.

” जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना महिलेचा नजराणा देण्यात आला होता. त्यावेळी शिवरायांनी तिची साडी चोळीने ओटी भरून तिला सन्मानाने घरी पाठवलं होतं. हे आमच्या महाराष्ट्राचे संस्कार आहेत. त्या महाराष्ट्रात दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत. एक दिवस जात नाही, आता तर लहान मुली. बदलापूरची घटना महाराष्ट्राला, सरकारला कलंकित करणारी आहे. हे जर दुसऱ्या राज्यात घडलं असतं तर तुमचे लोकं रस्त्यावर आले असते. कुठे आहेत ते? लाज शरम नाही तुम्हाला. एका बलात्काऱ्याला, खुन्याला तुमच्या मंत्रीमंडळात घेऊन बसता. लाज तुम्हाला नाहीच आहे. जरा तरी लाज शिल्लक असेल तर राजीनामा द्या आणि घरी बसा. इतकं नीच घाणेरडे विकृत प्रकरण महाराष्ट्रात घडतं त्याचं तुम्ही राजकारण करता, अशा शब्दात अरविंद सावंत यांनी फटकारले आहे.

”हा महाराष्ट्राचा विषय आहे. या महाराष्ट्राला तुम्ही इतकं कलंकीत केलं की तुम्ही महिलांना देखील विकत घ्यायला निघाला आहात. आता महिलांनी ठरवायचं की तुम्ही यांची लाडकी बहिण आहात का याचा विचार करा. या दळभद्री लोकांकडून पैसे घ्यायचे का? हे आपलं संरक्षण करू शकत नाही त्यांची भीक तरी कशाला पाहिजे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जरा तरी शिल्लक असेल तर राजीनामा द्यावा, असे अरविंद सावंत म्हणाले.