घे भरारी

79

भक्ती चपळगावकर

तुषार कुलकर्णी,डेप्युटी चीफ पायलट, आर्यन एव्हिएशन

तुषार आणि माझी मैत्री अक्षरशः आकाशात झाली. ग्लायडर विमानात बसून सह्याद्रीत विहार करण्याची कल्पना मनाला भावली होती, पण मनात धाकधूक होती; मात्र तुषारने पहिल्या मिनिटातच माझी भीती घालवली. पवना नदीवरून उड्डाण करत असताना तुषारशी माझ्या गप्पा रंगल्या. जगप्रसिद्ध ‘जझिरा एव्हिएशन’च्या मुख्य प्रशिक्षकाचे पद मिळवणारा हा पहिला मराठी माणूस. आकाशात भरारी घेण्याच्या वेडापायी वेगळी वाट चालणाऱया ग्लायडर पायलट तुषार कुलकर्णीची घेतलेली ही भेट…

जॉय राईडसाठी तू सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांना आकाशात विहार करवतोस, तुझ्या संगतीला दिवसभर उगवतीचा आणि मावळतीचा सूर्य असतो, पण करीयरचा हा रस्ता तू कसा स्वीकारलास?

माझे वडील एअरफोर्समध्ये होते. मी अगदी लहान असताना आम्ही दिल्लीतल्या पालम एअरफोर्स स्टेशनच्या परिसरात राहायचो. मी नुकताच चालायला लागलो असेन, मी आईला घेऊन तिथल्या एका मंदिरापाशी जाण्याचा आग्रह करायचो. आईला वाटायचं, मला मंदिरातला प्रसाद हवाय, पण तिथून आकाशात झेपावणारी विमानं बघायचा मला नाद होता. पुढे बोलायला लागलो, ते हेच बोलायला लागलो की मराठी लोकांना घेऊन मी विमान चालवणार. माझं हे बोलणं ऐकून माझ्या आजूबाजूचे लोक हसायचे, पण पालम, श्रीनगर, जोधपूर, आसामसारख्या ठिकाणी राहावं लागल्यामुळे मराठी माणसाचं दर्शन दुर्लभ असायचं आणि म्हणूनही एक वेगळी ओढ मला आपल्या माणसांबद्दल होती. मी लहान असल्यामुळे माझं बोलणं लोक मनावर घेत नसत, पण पुढे मोठा झाल्यावरही माझ्या मनात ही भावना दृढ झाली की, आपण आपल्या मराठी माणसांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आयुष्यातला फार मोठा काळ मी महाराष्ट्राबाहेर राहिल्यामुळे इतर समाज आपल्या समाजासाठी किती काम करतात हे मी जवळून बघितलं होतं, पण मराठी माणूस सगळय़ांसाठी करतो, मराठी माणसापुरता राहत नाही हेही मी बघितलं होतं.

पहिल्यांदा तू कधी विमानात बसलास?

वडिलांची बडोद्याला एनसीसीच्या एअरफोर्स विंगमध्ये बदली झाली. त्यावेळी मी ज्युनियर डिव्हिजन कॅडेट म्हणून जॉईन केलं. त्यांच्याबरोबर मला एरोमॉडेलिंग, ग्लायडिंगसारख्या गोष्टींची ओळख झाली. एरोमॉडेलिंग म्हणजे तुम्ही लहान विमान तयार करून उडवू शकता, त्याचबरोबर ग्लायडिंगची ओळखही याच काळात झाली. ग्लायडरबद्दल खूप वेगळी कल्पना हिंदुस्थानींमध्ये आहे. आपल्याला पॅराशूट पण ग्लायडर वाटतं, हँडग्लायडर पण ग्लायडर वाटतं. ग्लायडिंग या प्रकाराची माहिती आपल्याला जरा कमीच आहे. आता आपण ज्या विमानात बसलो आहोत हे जगातलं सगळ्यात कॉम्प्लेक्स एअरक्राफ्ट पण ग्लायडरच आहे.

ग्लायडर विमान आणि इतर विमानांत काय फरक असतो…

एअरक्राफ्टचे अनेक प्रकार असतात. त्याची व्याख्या air supported vehicle अशी करता येते. त्यामुळे ग्लायडर असो वा फायटर विमान वा बोईंग, हे सगळे विमानाचेच प्रकार आहेत. आता ग्लायडर विमानाबद्दल बघूया. बऱयाचदा ग्लायडर विमानाला इंजिन नसतं. पण आता आपण ज्या विमानात बसलो आहोत, त्या विमानाला इंजिन आहे. इंजिनचा वापर न करता ग्लायडर आकाशात पुष्कळ वेळ तरंगू शकतं. ग्लायडरला अजून एक प्रतिशब्द आहे, तो म्हणजे Sail plane. खरं नाव ते असायला हवं होतं.

तुझ्या करीयरच्या प्रवासाबद्दल काही सांगशील का?

मला एअरफोर्समध्ये फायटर पायलट व्हायचं होतं, त्याच्यासाठी मी जीवाचं रान केलं. पण नेमकं इंटरह्यूच्या आधी पुण्यात माझी स्कूटर उलटली. माझा हात जायबंदी झाला. सैनिक म्हणून करावे लागणारे प्रशिक्षण मला पूर्ण करता येणार नव्हते. माझे एअरफोर्समध्ये जायचे स्वप्न भंगले. माझ्या आयुष्यात मला बसलेला तो सगळय़ात मोठा धक्का होता. ज्याचे स्वप्न लहानपणापासून बघितले, ते आपण पूर्ण करू शकत नाही, याचे कधीही भरून न येणारे दुःख होते, पण आईवडिलांनी खूप आधार दिला. त्यांच्या प्रेरणेमुळे मी ग्लायडिंगचं प्रशिक्षण घेतलं. माझ्या कामाच्या निमित्ताने मी दुबईला गेलो. जझिरा एव्हिएशनचा चीफ फ्लाइंग इन्स्ट्रक्टर बनणारा मी पहिला हिंदुस्थानी झालो याचा मला खूप अभिमान आहे. या क्लबकडे पासष्ट छोटी विमानं आहेत आणि हा अतिशय प्रतिष्ठत क्लब आहे. जगभरातले पायलट हे पद मिळवण्याच्या शर्यतीत होते. पण त्यानंतर लवकरच मी हिंदुस्थानात परतण्याचा निर्णय घेतला, एकतर माझी आई आजारी होती आणि दुसरं म्हणजे आपल्या देशात फ्लाइंग इन्स्ट्रक्टर म्हणून काम करण्याची मला खूप इच्छा होती. मग मी झारखंडला जाऊन तिथल्या मुलांना फ्लाइंगचे प्रशिक्षण दिले. त्यातल्या काहीजणांना प्रशिक्षक बनवलं. आज मी ऍम्बी व्हॅलीत येणाऱया पर्यटकांना घेऊन विमानात भरारी घेतो. त्याचबरोबर मी पुणे ग्लायडिंग सेंटरमध्येही ऑनररी इन्स्ट्रक्टर म्हणून काम करतो.

पुण्यात ग्लायडिंग सेंटर आहे आणि तिथे इतक्या माफक फीमध्ये तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता किंवा ग्लायडिंग अनुभवू शकता हेच बऱयाचजणांना माहिती नाही…

हो आणि गंमत म्हणजे, हे केंद्र शंभरएक वर्षांपूर्वी सुरू झालेले आशिया खंडातले सगळ्यात पहिले ग्लायडिंग सेंटर आहे. औंधचे राजे पंतप्रतिनिधी कुलकर्णींनी ते सुरू केलं. आता त्याचा ताबा डीजीसीआयकडे आहे. आधी ते फुरसुंगीला होतं, ते नेहरूंनी केंद्राच्या अखत्यारीत आणून हडपसरला सुरू केलं. सध्याचे त्याचे प्रमुख कॅप्टन शैलेश चारबे हेही महाराष्ट्रीयन आहेत ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, पण हे केंद्र व्यावसायिक नसल्यामुळे त्याची कुठे जाहिरात होत नाही. त्याचबरोबर डीजीसीआयला ग्लायडिंगबद्दल आस्था नाही हेही एक महत्त्वाचे कारण त्यामागे आहे. चंद्रावर पाऊल ठेवणारे नील आर्मस्ट्रॉंग असो वा हडसन नदीत विमान उतरवून शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवणारे कॅप्टन सॅमी असोत, हे दोघेही ग्लायडर पायलट होते ही गोष्ट नाकारता येणार नाही. अमेरिकेसारख्या देशात प्रत्येक पायलटला ग्लायडिंगचे प्रशिक्षण आवश्यक असते, पण आपल्याकडे ग्लायडिंगला कमी दर्जा दिला जातो. मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते की, तुम्हाला ग्लायडिंगचा अनुभव हवा असेल तर पुण्यातल्या या सेंटरमध्ये फक्त एकशे सत्त्याऐंशी रुपयांत तुम्हाला तो मिळू शकेल. त्याचा फायदा अवश्य घ्या. एकदा आकाशात भरारी घेतलीत की, तेच तुम्हाला पुनः पुन्हा भेटण्यासाठी खुणावू लागेल.
तुषारशी गप्पा सुरू होत्या. त्या दरीखोऱयातला कोपरान्कोपरा तुषार मला दाखवत होता. खाली पवना नदीवर संध्याकाळची आल्हाददायक किरणे अंथरली होती. माझी आकाशातली भरारी संपायची वेळ झाली होती. मावळतीच्या सूर्याला बरोबर घेऊन आमचे विमान तुषारने धावपट्टीच्या दिशेने वळवले. …

आपली प्रतिक्रिया द्या