आर्यना सबलेंका माद्रीद ओपनची नवी राणी, जेतेपदाच्या लढतीत अॅश्ले बार्टीवर मात

बेलारुसची आर्यना सबलेंका ही माद्रीद ओपन टेनिस स्पर्धेची नवी राणी ठरली. पाचव्या मानांकित या खेळाडूने अक्वल मानांकित ऑस्ट्रेलियाच्या अॅश्ले बार्टी हिचा पराभव करून महिला एकेरीच्या किताबावर आपले नाव कोरले.

आर्यना सबलेंकाने चुरशीच्या अंतिम लढतीत अॅश्ले बार्टीचा 6-0, 3-6, 6-4 असा पराभव करीत कारकिर्दीतील दहाव्या विजेतेपदाला गवसणी घातली. लाल बजरीच्या कोर्टवर बार्टीने दोन वर्षांत एकही सामना गमावलेला नव्हता. शिवाय दोन आठवडय़ांपूर्वी स्टटगार्टमधील स्पर्धेत एक सेट गमविल्यानंतरही जबरदस्त पुनरागमन करीत सबलेंकाला हरविले होते.

त्यामुळे यावेळी तिलाच जेतेपदासाठी पसंती मिळत होती. मात्र, आर्यना सबलेंकाने सर्वांचे अंदाज चुकवत कारकिर्दीत पहिल्यांदाचा माद्रीद ओपन स्पर्धेचा किताब जिंकण्याचा पराक्रम केला. याचबरोबर सबलेंका आता जागतिक क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम चौथ्या स्थानी झेप घेणार आहे.

ज्वेरेवला दुसऱयांदा विजेतेपद

अलेक्झांडर ज्वेरेवने दुसऱयांदा माद्रीद ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. त्याने किताबी लढतीत नवव्या मानांकित मातियो बॅरेतिनीचा 6-7 (8), 6-4, 6-3 असा पराभव केला. पहिला सेट टायब्रेकरमध्ये हरल्यानंतर त्याने पुढील दोन्ही सेट जिंकून जेतेपदाला गवसणी घातली. ज्वेरेवने या स्पर्धेत तृतीय मानांकित व पाच वेळा ही माद्रीद ओपनचे जेतेपद पटकावणाऱया स्पेनच्या राफेल नदाललाही पराभवाचा धक्का दिला. याचबरोबर दोन वेळा या स्पर्धेत उपविजेता राहिलेल्या डॉमिनिक थिमलाही त्याने हरवून आगेकूच केली होती. माद्रीद ओपनमध्ये अलेक्झांडर ज्वेरेवने आतापर्यंत खेळलेल्या 17 सामन्यांत केवळ दोन पराभव बघितले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या