दिशाभूल करायला आम्ही लहान मुलं नाहीत, असदुद्दीन ओवैसी यांचा मोहन भागवत यांच्यावर निशाणा

सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज रविवारी विजयादशमी निमित्ताने अवघ्या 50 लोकांच्या उपस्थितीत संघाच्या कार्यकर्त्यांना संबोधन केले. यावेळी त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला होत असलेल्या विरोधावर भाष्य केले. ‘नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून काही लोक मुसलमान समाजाची दिशाभूल करत आहे’, असे विधान मोहन भागवत यांनी केले. यावर आता एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी प्रत्युत्तर दिले असून ‘दिशाभूल करायला आम्ही लहान मुलं नाहीत’, असा टोला लगावला आहे.

नागरिकत्व सुधारणा कायदा संसदेच्या दोन्ही सभागृहात पास झाला आहे. यावेळी संसदेत कायद्याला विरोध करणारे देखील होते. राजकारणात असे होत असते. तसेच देशात मुस्लिमांची संख्या वाढू नये यासाठी हा कायदा आणला असे वातावरण तयार करून मुसलमान समाजाची दिशाभूल केली. यामुळे विरोधात प्रदर्शन देखील करण्यात आले, असे मोहन भागवत म्हणाले.

ओवैसी यांचे प्रत्युत्तर

दिशाभूल करायला आम्ही लहान मुलं नाहीत..भाजपने सीएए आणि एनआरसीचा अर्थ सांगितलेला नाही, असे ओवैसी म्हणाले. जर हा कायदा मुसलमानांच्या बाबत नसेल तर यातून धर्माच्या बाबतीतील संदर्भ हटवण्यात येईल का? असा सवाल त्यांनी केला. तसेच जोपर्यंत हा कायदा आम्हाला नागरिकत्व सिद्ध करायला लावेल तोपर्यंत आम्ही याला विरोध करत राहू असेही ते म्हणाले.

धर्माच्या आधारावर नागरिकत्व सिद्ध कराव्या लागणाऱ्या कोणत्याही कायद्याचा अमहू विरोध करू, असेही ओवैसी म्हणाले. तसेच कायद्याविरोधात आंदोलनादरम्यान आरजेडी, काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांनी साधलेले मौन विसरू शकत नाही, असेही ते म्हणाले.

मोहन भागवत यांचे भाषणातील मुद्दे –

– चीननं आपल्या सीमेवर जो व्यवहार केलाय त्यांचा स्वभाव विस्तारवादी आहे हे सर्वांना माहित आहे. त्यांनी अनेक देशांसोबत वाद केला आहे, हिंदुस्थानने चीन ला सडेतोड उत्तर दिले आहे.

– शेजारी राष्ट्रांसोबत संबंध आणखी दृढ करावे लागतील. आपण सर्वांशी मैत्री, कुणाशी भांडण्याचा स्वभाव आपला नाही. मात्र आपल्या स्वभावाला आपली दुर्बलता समजणं चूक आहे.

– संपूर्ण जगावर कोरोनाचं सावट आहे. कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. मात्र सावध राहणं गरजेचं आहे. नियमांचं पालन करणं आवश्यक आहे.

– देशात राहणाऱ्या लोकांमध्ये स्पर्धा असावी युद्ध नसावे. समाजात कटुता निर्माण होऊ नये. धर्मनिरपेक्षेतेचं नाव पुढे करुन समाज तोडू नका.

– हिंदू राष्ट्र हा शब्द संघ जेव्हा वापरतो तेव्हा त्यामुळे सत्तापिपासूपणा नसतो. त्यामध्ये सत्ता मिळवण्याची लालसा नसते तर सर्वसमावेशक अर्थाने हा शब्द संघ वापरत असतो.

– हिंदू शब्दावरुन वाद निर्माण समाजात दुरावा निर्माण करतात. संघाला काही कारण नसताना बदनाम केलं जातं आहे. संघाबाबत कोणत्याही चुकीच्या गोष्टी  पसरवण्याच्या आधी संघाची विचारधारा समजून घ्या.

आपली प्रतिक्रिया द्या