मोदी-ट्रम्प यांची ‘फोन पे चर्चा’, खासदार ओवैसींना झोंबल्या मिरच्या, म्हणाले…

4467

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी तब्बल अर्धा तास फोनवर चर्चा केली. मोदी-ट्रम्प यांच्या चर्चेचा ठसका एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना लागला आहे. ओवैसी यांनी मोदी आणि ट्रम्प यांच्या चर्चेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, कश्मीर हा नेहमीच हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन देशांमधील द्विपक्षीय मुद्दा राहिला आहे. हिंदुस्थानने आपला इरादा नेहमीच स्पष्ठ ठेवला आहे. यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा केली. ट्रम्प यांना फोन करणे आवश्यक होते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

‘फोन पे चर्चा’
जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटविल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी वारंवार युद्धाची भाषा केली आहे. त्यामुळे हिंदुस्थान-पाकिस्तान दरम्यान तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून अर्धा तास संवाद साधला. यावेळी मोदींनी पाकिस्तानकडून वारंवार चिथावणीखोर वक्तव्ये केली जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. काही नेत्यांकडून हिंदुस्थानविरोधात चिथावणी देणारी वक्तव्ये केली जात आहेत. अशी वक्तव्ये दोन्ही देशांसाठी योग्य नसल्याचे मोदींनी ट्रम्प यांना सांगितले.

इम्रान खान यांचाही फोन
याआधी कलम 370 प्रकरणी रडक्या पाकड्यांनी अमेरिकेची मदत मागितली होती. पंतप्रधान इम्रान खान यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून 12 मिनिटं चर्चा केली. कश्मीर मुद्द्यावर अमेरिकेने लक्ष द्यावे अशी मागणी इम्रान खान यांनी केली होती. परंतु पाकिस्तानच्या या मागणीला अमेरिकेने केराची टोपली दाखवत हा दोन देशांमधील मुद्दा असून तो चर्चेने शांततेत सोडवावा असे म्हटले होते.

आपली प्रतिक्रिया द्या