ओवैसींनी वारिस पठाणच्या तोंडाला लावलं कुलूप, मीडियासमोर बोलण्यास बंदी

603
waris-pathan

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) या पक्षाचे नेते वारिस पठाण याच्या चिथावणीखोर भाषणामुळे पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे अडचणीत आले आहेत. पक्षातील अनेकांनी त्याच्या विधानाविरोधात भूमिका घेतली आहे. देशभरात उमटलेले पडसाद आणि पक्षातील कुरबुरींनंतर अखेर ओवैसी यांनी वारिस पठाण याच्या विरोधात कारवाईचे पाऊल उचलले आहे. वारिस पठाण याला मीडियासमोर बोलण्यास बंदी घालण्यात आली आहे. पक्ष परवानगी देत नाही तोपर्यंत वारिस पठाण याने कोणतीही प्रतिक्रिया देऊ नयेत असे सक्त आदेश त्याला देण्यात आलेले आहेत.

कर्नाटकात गुलबर्गा येथे सभेत बोलताना पठाणचा तोल गेला आणि तो बरळला. 100 कोटींवर (हिंदू) आम्ही 15 कोटी (मुसलमान) भारी पडतील. आम्हाला स्वातंत्र्य दिले जात नसेल तर मिळवावे लागेल, अशी धमकी ‘एमआयएम’चा माजी आमदार वारिस पठाणने दिली. ‘सीएए’, ‘एनआरसी’विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा संदर्भ देऊन वारिस पठाण म्हणाला, ‘ईट का जवाब पत्थर से देंगे’ हे आम्ही शिकलो आहोत, पण त्यासाठी आपल्याला एकत्र यावे लागेल. स्वातंत्र्य दिले जात नसेल तर जबरदस्तीने मिळवावे लागेल. महिलांना पुढे करतो असे आम्हाला म्हणतात. पण आता केवळ महिला बाहेर पडल्या तर तुम्हाला घाम फुटला, मात्र आम्ही (मुस्लिम) सगळे बाहेर पडलो तर तुमचे काय होईल! आम्ही (मुस्लिम) 15 कोटी आहोत. पण 100 कोटींवर (हिंदू) भारी आहोत असे चिथावणीखोर वक्तव्य पठाणने केले.

या विधानानंतर वारिस पठाण याने आपण कोणत्याही धर्माचे नाव घेतले नसल्याचा खुलासा केला होता. मात्र हा मुद्दा यावर संपला नाही. देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी देखील वारिस पठाणच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया दिली. पठाण याला तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली. तसेच AIMIM ही भाजपची B टीम असल्याचेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या