आसारामबापूला बलात्कारप्रकरणी दिलासा नाहीच,उच्च न्यायालयाने फेटाळले अपील

247

स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसारामबापूने अल्पवयीन मुलीकर बलात्कारप्रकरणी झालेली जन्मठेपेची शिक्षा रद्द व्हावी यासाठी केलेले अपील राजस्थान उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपीठाने आज फेटाळून लावले. आसारामकडून दाखल करण्यात आलेली अपील याचिका न्यायालयाने दुसऱयांदा फेटाळली.

राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती  संदीप मेहता आणि न्यायमूर्ती विनीत कुमार याच्या खंडपीठाने आसारामविरोधात निर्णय दिल्यामुळे आसारामला झटका बसला आहे. दरम्यान, सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात आसारामकडून आणखी एक याचिका राजस्थान उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर पुढील वर्षी जानेवारीमध्ये सुनावणी होणार आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी विशेष एससी-एसटी न्यायालयाने गेल्या वर्षी आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

लैंगिक अत्याचारप्रकरणी उत्तर प्रदेशातील शहाजहांपूर येथील एका अल्पवयीन मुलीच्या तक्रारीकरून आसारामला अटक करण्यात आली होती. अध्यात्माचा अभ्यास करण्यासाठी या मुलीने आसारामबापूच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील आश्रमात प्रवेश घेतला होता. दरम्यान, या मुलीच्या तक्रारीनुसार आसारामने तिला जोधपूरमधील मनाई भागातील आपल्या आश्रमात बोलावून घेतले होते, तसेच तिथे तिच्यावर 15 ऑगस्ट 2013 रोजी रात्री बलात्कार केला होता.

आसारामबापूनंतर त्याचा मुलगा नारायण साई हादेखील बलात्काराच्या एका प्रकरणात दोषी आढळला होता. बलात्कार, अनैसर्गिक सेक्स, जीवघेणा हल्ला आणि धमकी दिल्याप्रकरणी सुरतच्या सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सुरत येथील दोन महिला भाविकांनी या पितापुत्रांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या