काळ्या अमावस्येची शुभ कहाणी

>> आसावरी जोशी 

” देवाघरून  येणारा प्रत्येक दिवस चांगलाच असतो बरे श्याम… ” सानेगुरुजींच्या आईनी छोट्या श्यामला उद्देशून बोललेले वाक्य.. लहानपणी वाचनात आलेले.. पण मनावर मात्र कायमचे कोरले गेलेले.. एवढ्याशा छोट्याशा वाक्यात किती मोठा अर्थ भरलेला आहे.. येणारा प्रत्येक दिवस खरोखरच किती निर्मळ.. नितळ.. आणि कोरी पाटी.. घेऊन येतो.. या दिवसांना तारीख.. वार.. तिथी.. यामध्ये आपण माणसांनी बांधून ठेवले.. केवळ बांधूनच ठेवले नाही तर त्यांना शुभ – अशुभाच्या चक्रात अडकवूनही टाकले.  दिवस वारांचे हिशोब लागावे म्हणून तिथींची निर्मिती झाली. आणि आपण माणसांनी किती सहज या तिथ्यानाही शुभ अशुभाच्या पट्ट्या लावून टाकल्या.. अमावस्या.. माणसांच्या दृष्टीने अत्यंत अशुभ तिथी.. कोणतेही कार्य, किंवा नवीन कामाची सुरुवात अमावास्येला करणे जाणीवपूर्वक टाळले जाते.. अमावस्येची रात्र.. विविध रंजक आणि कपोलकल्पित सांगोवांगीच्या गोष्टीनी झपाटली आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये.

तरीही यात काही अमावस्या खूपच महत्वाच्या असतात. दिवाळीतील अमावस्या.. लक्ष्मीआईने स्वत:च्या पूजनासाठी मुद्दाम अमावास्येचीच निवड केली आहे. सोमवती अमावस्या. आणि उद्या येणारी दीप अमावस्या.. आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस. या अमावास्येला खास दिव्यांची पूजा केली जाते. घरातील सर्व दिवे लख्ख होऊन चकाकत असतात. या पूजेचा नैवेद्यही कणकेच्या दिव्यांचा असतो. संपूर्ण देवघर या दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघालेले असते. या अमावास्येशी अनेक पौराणिक कथा जोडल्या गेल्या आहेत. यादिवशी शंकर, पार्वती आणि कार्तिकेयाची पूजा केली जाते. शिवशंकराचे व्रतही यादिवशी ठेवले जाते. तर विदर्भात यादिवशी स्त्रिया तुळस किंवा पिंपळाला 108 प्रदक्षिणा घालतात. यादिवशी पितरांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविल्यास पितरे आपल्यावर प्रसन्न होतात. यादिवशी आपल्या पूर्वजांच्या नवे दान करणे शुभ मानले जाते. उपवास ठेवल्याने पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळते असे मानले जाते.

दीप अमावास्येला वृक्षारोपण करतात. – यादिवशी झाडे लावल्याने ग्रह दोष दूर होतो असे मानले जाते. म्हणून आपल्याकडे पिंपळ, केली, लिंबू किंवा तुळशीचे रोपटे दारात किंवा शेतात लावले जाते. या अमावास्येला गंगास्नानाचे महत्व फार मोठे आहे, काही भागात तर या दिवशी नदीत माशांना अन्नदान केले जाते.  आपल्याकडे अनेक घरांत दीप अमावास्येला संध्याकाळी लहान मुलांना ओवाळले जाते.

या सर्व पौराणिक प्रथा, परंपरा आपण जरा बाजूला ठेवूया. मला असे वाटते दीपज्योत ही अग्नीतत्वाचे प्रतीक आहे. अग्निप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला दीपपूजन केले जाते. दिवे आपल्या घरातील, मनातील अंधार दूर करून प्रकाश देतात. मनही उजळून निघतात. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.

काही घरांमध्ये ही अमावस्या सामिष भोजनाने साजरी केली जाते. याही बाबतीत एकच म्हणावेसे वाटते की, या निमित्ताने का होईना माणसे एकत्र येतात. एकत्र जेवण्याचा आनंद घेतात. या सामिष भोजनामागेसुद्धा आहाराचा नियम असावाच. पाउस पडत असतो, जड आहाराचा पोटाला त्रास होऊ शकतो. अनायासे श्रावण महिना सुरू होणार असतो, अनेक व्रत वैकल्यांचा हा महिना आहे. कोणत्याही बाबतीत जेव्हा धार्मिक नियम लावले जातात तेव्हा ते सहजच पाळले जातात. त्यामुळे आपसूकच श्रावणात जड, सामिष आहार टाळला जातो. सात्विक, हलका आहार घेतला जातो.

येथे अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. अनेक जलचरांचा हा प्रजोत्पादनाचा कालखंड असतो. निसर्ग आपल्या लेकरांची गरज ओळखूनच जणू हे अमावस्या आणि श्रावणाचे गणित मांडून माणसाला सात्विकतेकडे वळवतो.

कोणत्याही गोष्टीतून चांगले ते वेचणारी आपली संस्कृती आहे. कोणत्याही निमित्ताने का होईना ही अमावस्या सारे अशुभाचे संकेत ओलांडून माणसांना एकत्र आणते, पुढचा पूर्ण महिना सात्विकतेच्या वाटेवर वळवते  हे महत्वाचे…