आशा बगे यांना साहित्यव्रती पुरस्कार जाहिर

30

महेश उपदेव । नागपूर

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने प्रथमच देण्यात येत असलेला ‘साहित्यव्रती’ हा पुरस्कार प्रख्यात कथालेखिका आशा बगे यांना दिला जाणार आहे.
विदर्भ साहित्य संघाचे आणि अभा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले प्राचार्य राम शेवाळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणार हा पुरस्कार शेवाळकर कुटूंबीयांकडून प्रायोजित केला गेला आहे. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र असे स्वरूप असलेला हा पहिलाच पुरस्कार. मराठी कथेचे क्षेत्र आपल्या लेखनाने समृद्ध करण्याच्या कार्याच्या गौरवार्थ अशा बगे यांना देण्याचा निर्णय महामंडळाच्या या संबंधातील समितीने घेतला आहे. या समितीत महामंडळाचे अध्यक्ष डॉ़ श्रीपाद जोशी, उपाध्यक्ष सुधाकर भाले, कार्यवाह डॉ इंद्रजित ओरके, कोषाध्यक्ष डॉ विलास चिंतामण देशपांडे, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, डॉ उज्वला मेहेंदळे, प्रकाश पायगुडे यांचा समावेश होता. आशा बगे यांना महाराष्ट्र सरकारचे तीन पुरस्कार कथा संग्रह व कादंबरीला लाभले असून, ‘भूमी’ या कादंबरीलाच साहित्य अकादमीचा २००६ या वर्षीचा पुरस्कारही लाभला आहे. यासोबतच, विदर्भ साहित्य संघाचा ‘जीवनव्रती’ हा पुरस्कारही त्यांना लाभला असून, शांताराम कथा पुरस्कार, केशवराव कोठावळे, आपटे नगर वाचनमंदिर, गोनी दांडेकर, डॉ अवा वर्टी, काकासाहेब गाडगीळ, सल गद्रे मातोश्री, कमलाबाई ओगले, पुभा भावे असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या