आषाढी पालखी सोहळ्यासाठी मानाच्या अश्वांचे प्रस्थान

214

सामना प्रतिनिधी । आळंदी

संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी श्रींचे अश्वांचे प्रस्थान अंकली तील राजवाड्यातून मंगळवारी हरीनाम गजरात झाले. अश्वसेवेचे मालक मानकरी श्रीमंत सरकार महादजीराजे शितोळे (अंकलीकर), उर्जीत सिंह शितोळे सरकार, श्रीमंत सरकार कुमार महादजीराजे शितोळे (अंकलीकर), पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर पवार,स्वामी सुभाष महाराज,माउली देवस्थानचे माजी व्यवस्थापक बंडोपंत कुलकर्णी,वेदमूर्ती राहुल जोशी,व्यापारी तरुण मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गुळुंजकर, माहिती सेवा समितीचे खेडचे अध्यक्ष शंकर लोखंडे (माळी) आदीसह अंकलीकर ग्रामस्थ वारकरी उपस्थित होते.

सालाबाद प्रमाणे यावर्षी प्रथमच पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांनी अंकलीकर राजवाड्यात जावून अश्व प्रस्थान सोहळा अनुभवला. मांजरीवाडीत श्रीचे अश्ववांचे स्वागत करून दर्शन घेतले. त्यांनी यावेळी श्रीमंत शितोळे सरकार यांचे समवेत चर्चा करून पालखी सोहळ्याचे नियोजन बाबत त्यांनी माहिती दिली.

अश्वांचे प्रस्थान पुरी अंबाबाई देवीची पूजा ,आरती, श्रीचे अश्वांची पूजा, ध्वज पूजा, अंकलीकर राजवाड्यात आणि श्री विठ्ठल मंदिरात अश्वांची मंदिर प्रदक्षिणा तसेच ग्राम नगर प्रदक्षिणा हरीनाम गजरात झाली .अंकली परिसरातील ग्रामस्थ आणि दिंडी प्रमुख वारकरी या प्रसंगी उपस्थित होते. या प्रसंगी महाप्रसाद वाटप करण्यात आले. श्रीचे अश्वांचे वैभवी प्रस्थान सोहळा अंकलीकर श्रीमंत शितोळे सरकार यांनी प्रथा परंपरांचे पालन करीत उत्साहात पार पडला.

अंकली गावातील राजवाड्यातून श्रींचे अश्वांचे हरीनाम गजरात प्रस्थान झाल्यानंतर अंकली नगर प्रदक्षिणा, महाप्रसाद झाल्यावर मांजरीवाडी,कागवाड मार्गे म्हैसाळ, त्यानंतर सांगली मार्गे सांगलवाडीत पहिला मुक्काम होणार आहे. आळंदी कडे प्रवास करून पुण्य नगरीत दोन दिवसांचे मुक्कामासाठी (१४ व १५ जून ) थांबणार आहेत. पुण्य नगरीतील दोन दिवसांचा पाहुणचार घेत श्रींचे अश्व श्रींचे वैभवी पालखी सोहळ्याचे प्रस्थानसाठी आळंदीला (१६ ) ला हरीनाम गजरात पोहचणार आहेत. येथील वेशीवर श्रींचे अश्वांचे आळंदी देवस्थान आणि सोहळ्यातील प्रथा परंपरांचे पालन करीत स्वागत होईल. तत्पूर्वी पुणे आळंदी मार्गावरील श्रीकृष्ण मंदिरात (बिडकर वाडा) सरदार हरप्रीतसिंह बिडकर परीवाराचे वतीने स्वागत होणार आहे.

११ दिवसांच्या प्रवासानंतर श्रींचे अश्व आळंदी मंदिरात पूजा दर्शन स्वागत झाल्यानंतर येथील फुलवाले धर्मशाळेत मुक्कामी राहणार आहेत. श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे वतीने आळंदीत मालक बाळासाहेब आरफळकर पवार आणि आळंदी देवस्थानच्या वतीने अश्वांचे आगमन झाल्यानंतर स्वागत होईल. श्रीची अश्वांचे प्रवास नियोजन श्रीमंत सरकार उर्जितसिंह शितोळे अंकलीकर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. अश्व चालक व व्यवस्थापक म्हणून तुकाराम कोळी प्रवासात काम पाहणार असल्याचे श्रीमंत सरकार महादजीराजे शितोळे सरकार(अंकलीकर) यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या