बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे

2919

महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज घातले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची बुधवारी पहाटे आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, श्री. तेजस ठाकरे उपस्थित होते.

श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे दोन वाजता सुरू झाली. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा मानाचे वारकरी अहमदनगर जिल्ह्यातील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि सौ. अनुसया बढे (मु.चिंचपूर-पांगुळ, ता. पाथर्डी) या दाम्पत्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी केली.

uddhav-thackeray-warkari-felicitation

मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनामुळे जग, देश तसेच महाराष्ट्रावर मोठे संकट आले आहे. कोरोनाचे हे संकट लवकरात-लवकर दूर करून महाराष्ट्र आणि अवघा देश कोरोनामुक्त होऊ दे. राज्यातील शेतकरी, वारकरी आणि अवघ्या विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी आषाढी एकादशीला माऊलींच्या दर्शनाला आलो. बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपणास बळ द्यावे, अशी मागणी श्री विठ्ठलाकडे केल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

badhe-warkari-couple

पंढरपूरच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. त्यासाठी विकास प्रकल्पांना मंजुरी दिली जाईल. त्याबाबतचे प्रस्ताव सादर करावे, असे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी आणि जनतेने आरोग्याच्या दृष्टीने पंढरपुरात येऊ नये. घरातूनच श्री विठ्ठलाचे नामस्मरण व पूजा करावी, असे आवाहन श्री. ठाकरे यांनी भाविकांना केले. वारकरी सांप्रदायाने शासनाच्या वतीने वेळोवळी करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभार मानले. यावेळी पंढरपूर नगरपरिषदेस शासनाच्यावतीने पाच कोटी रुपयांचा अनुदानाचा धनादेश नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

solapur-developement-cheque-uddhav-thackeray

आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांसह सर्व मानाच्या संतांच्या पालख्या मंगळवारी रात्रीच पंढरीत दाखल झाल्या होत्या. पालखी तळावर फुलांच्या पायघडय़ा घालून सर्व संतांचे भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले.

आषाढी वारीसाठी लाखो वारकरी एकत्र आल्यास कोरोनाचा संसर्ग होऊन धोका उद्भवू शकतो, हे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनाने आषाढी वारीचा सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शेकडो वर्षांची वारीची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी वारीला फक्त मानाच्या नऊ पालख्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज मानाच्या नऊ संतांच्या पालख्या फुलांनी सजविलेल्या एसटी बसने रात्री पंढरपूरमध्ये दाखल झाल्या. यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी, संत तुकाराम महाराज संस्थान देहू, संत सोपानदेव महाराज संस्थान सासवड, संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर, संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर, संत एकनाथ महाराज संस्थान पैठण, संत नामदेव महाराज संस्थान पंढरपूर, श्री विठ्ठल-रखुमाई संस्थान कौंडण्यपूर, चांगवटेश्वर देवस्थान सासवड या संतांचा समावेश होता. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगतगुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीसह मानाच्या संतांच्या पालख्या रात्री पालखी तळावर दाखल झाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या