कुंभमेळाच्या धर्तीवर आषाढी वारीचे व्यवस्थापन, खाजगी कंपनीची नियुक्ती

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

कुंभमेळ्याचे व्यवस्थापन पाहणाऱ्या रेझीलेंट इंडिया या आंतरराष्ट्रीय खाजगी कंपनीला पंढरपूरच्या आषाढी वारीचे नियोजन करण्यासाठी पाचारण करण्यात आले असून यंदाची वारी नेहमीपेक्षा अधिक सुखकर होईल अशी अपेक्षा पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी व्यक्त केली.

आयुक्तांनी गुरूवारी पंढरपूरचा दौरा केला. तत्पूर्वी त्यांनी पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील पालखी मार्ग, पालखी तळांची देखील पाहणी केली आहे. आषाढी एकादशी १२ जुलै रोजी असून आता अनेक संतांच्या पालख्यांचे पंढरीकडे प्रस्थान झाले आहे तर  आळंदी व देहूतून संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महाराज पालखी सोहळे पुढील आठवड्यात पंढरीकडे निघणार आहेत. या धर्तीवर म्हैसेकर यांनी पंढरपूरमध्ये आढावा बैठक घेतली.

यात्रा कालावधीत होणार्‍या गर्दीचे विभाजन करून याचे व्यवस्थापन करण्याची ही पध्दत असून चार ही कुंभमेळ्यात राजीव चौबे यांची रेझीलेंट ही कंपनी हे काम करते. चौबे व त्यांचे सहकारी सध्या पंढरपूरमध्ये फिरून आषाढीची माहिती घेत आहेत व याचे नियोजन करत आहेत.

विभागीय आयुक्तांनी आज पंढरपूर शहरातील सर्व गर्दीच्या ठिकाणांसह चंद्रभागा वाळवंट, ६५ एकर परिसर आदीची पाहणी केली व यानतंर बैठक बोलाविली. यास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे व इतर अधिकारी उपस्थित होते.

आषाढी यात्रा २०१९ ची प्रशासनाने जय्यत तयारी केली असून पालखी मार्गावर ३० हजार राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सक्रिय राहणार आहेत. बंदोबस्तासाठी पाच हजार पोलीस पंढरपूर शहरात यात्रा कालावधीत असतील तर वाहतूक  नियंत्रणासाठी गामा कमांडोची नियुक्ती होणार आहे. आषाढीत अडीच हजार गृहरक्षक दलाचे जवान तैनात राहतील तर वाखरी  तळावर जेथे सर्व पालख्या येत असतात तेथे दीड हजार स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येत आहे.

बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आषाढी  सोहळ्याबाबतच्या तयारीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. त्यांनी सांगितले की शासनाच्या विविध चौदा विभागांना कामांची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. पालख्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक असणार्‍या सर्व सुविधा पुरविण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यांसाठी टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी ७४ विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे.

विभागीय आयुक्त म्हैसेकर यांनी सांगितले की, वारीच्या कालावधीत स्वच्छतेवर भर द्या. त्यासाठी पुरेशी मोबाईल टॉयलेट  पालखी तळावर ठेवावीत. निर्मल वारीसाठी राष्ट्रीय सेवा योजनांच्या विद्यार्थ्यांची मदत घ्यावी. पालखी मार्गावरील रस्ते नीट करुन घ्यावेत. रस्त्यावरील खड्डे पूर्णपणे भरून घ्यावेत. पालखी मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्याचे नियोजन वेळेत करा.आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सर्व संबंधितांची बैठक घेतली जावी. त्यासाठी पुरेसे अग्निशामक टँकर, रुग्ण वाहिका उपलब्ध करुन घ्याव्यात. त्या कोठे ठेवल्या जाणार याबाबत नियोजन केले जावे.पालखी तळावरील वीज पुरवठ्याबाबत काळजी घेतली जावी, अशा सूचनाही डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.