ऑस्ट्रेलियाचा मालिका विजय

सामना ऑनलाईन । पर्थ

जोश हेजलवूडच्या भन्नाट गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला दुसऱया डावात ७२.५ षटकांत २१८ धावांत गुंडाळून तिसरी कसोटी एक डाव व ४१ धावांनी जिंकून पाच सामन्यांची अॅशेस कसोटी क्रिकेट मालिका आधीच ३-० अशी खिशात टाकली. द्विशतकी खेळी करणारा स्टीव्हन स्मिथ या सामन्याचा मानकरी ठरला. मागील अॅशेस मालिका इंग्लंडने ३-२ फरकाने जिंकली होती. यावेळी मात्र त्यांना या प्रतिष्ठेच्या मालिकेत पराभवाच्या हॅट्ट्रिकची नामुष्की पत्करावी लागली.

पावसाच्या व्यत्ययामुळे पाचव्या व अखेरच्या दिवसाचा खेळ उशिराने सुरू झाला. यजमान इंग्लंडने ४ बाद १३२ धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडने सुरुवातीलाच एका अफलातून चेंडूवर जॉनी बेअरस्टॉचे (१४) दांडके उडवून इंग्लंडला जबरदस्त धक्का दिला. त्यानंतर फिरकीपटू नॅथन लायनने मोईन अलीला (११) पायचीत बाद करून ऑस्ट्रेलियाला आणखी एक यश मिळवून दिले. डेव्हिड मलानने (५४) अर्धशतकी खेळी करून खेळपट्टीवर उभे राहण्याचा प्रयत्न केला. मात्र हेजलवूडने त्याला यष्टीमागे टीम पेनकरवी झेलबाद करून इंग्लंडच्या फलंदाजीतील हवाच काढून घेतली. मग क्रॅग वोव्हरटोनही (१२) हेजलवूडचाच बळी ठरला. त्यानंतर पॅट कमिन्सने स्टुअर्ट ब्रॉड (०) व ख्रिस वोक्स (२२) यांना यष्टीमागे झेलबाद करून इंग्लंडचा दुसरा डाव २१८ धावांवर संपवीत रुबाबदार विजय मिळविला. हेजलवूडने ४८ धावांत ५ बळी टिपले, तर नॅथन लायन व पॅट कमिन्स यांनी २-२ गडी बाद केले. मिचेल स्टार्कने एक फलंदाज बाद केला. पहिल्या सामन्यात दहा गडी राखून जिंकणाऱया ऑस्ट्रेलियाने दुसरी लढत १२० धावांनी जिंकली होती.