धोनी अन् मी वर्ल्ड कपबाबत विचार करत नाही

18

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

आगामी २०१९च्या वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेबाबत आपण कुठलाही विचार करत नसल्याचे स्पष्टीकरण हिंदुस्थानचा सर्वात बुजुर्ग वेगवान गोलंदाज आशीष नेहराने दिले. याचबरोबर माझ्यापेक्षा केवळ दोन वर्षांनी लहान असलेला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीही आगामी वर्ल्ड कपबाबत विचार करत नाही, असेही तो म्हणाला.

मागील १५ महिन्यांपासून ‘टीम इंडिया’च्या टी-२० संघाचा कायम सदस्य असलेला ३८ वर्षीय नेहरा म्हणाला, अनुभवी खेळाडू या नात्याने संघात शांततापूर्ण वातावरण ठेवण्याची जबाबदारी माझी आणि धोनीची आहे. धोनीचा फिटनेस अजूनही जबरदस्त आहे. आगामी विश्वचषक स्पर्धेस दोन वर्षांचा कालावधी आहे. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास आमचे वय बघता या स्पर्धेबाबत आम्ही विचार करत नाही. संघनिवड समितीला आमची कामगिरी आणि फिटनेस चांगला वाटला तरच आम्हाला वर्ल्ड कप संघात स्थान मिळेल. मात्र, दोन वर्षांनंतर होणाऱया स्पर्धेबाबत विचार करण्याचे आमचे वय नक्कीच नाही. पण ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’मध्ये खेळण्याची माझी इच्छा आहे. युवा गोलंदाजांना अनुभवाची शिदोरी वाटण्यासाठी मी नेहमीच उपलब्ध असेन, असेही नेहराने सांगितले.

टी-२० क्रिकेटमध्ये आशीष नेहराने फिटनेस आणि आपल्या वेगाने क्रिकेटशौकिनांना चांगलीच भुरळ घातली. नव्या दमाचा आशीष नेहरा ज्या वेगात गोलंदाजी करत नव्हता, त्यापेक्षा अधिक वेगात आताचा बुजुर्ग आशीष नेहरा गोलंदाजी करतोय. आगामी ‘आयपीएल’ टी-२० स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी आपण मेहनत घेत असल्याचे आशीष नेहराने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या